Thursday 2 April 2015

आरोग्याबाबत आत्मविश्वास जागवणे हीच खरी रुग्णसेवारायपाटण (ता. राजापूर) - आरोग्याबाबत रुग्णाच्या मनात आत्मविश्वास जागवणे हीच खरी रुग्णसेवा होय, असे उद्गार इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक अशोक सेन यांनी काढले.

मुंबईच्या नानावटी रुग्णालयाच्या माध्यमातून इंडियन ऑइल (पश्चिम क्षेत्र) या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आणि नवजीवन विकास संस्थेने येथे नुकत्याच आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रक्कम खर्च करून आरोग्यसेवा कोठेही मिळते, मात्र आस्थेने तपासणी करून त्यांच्या मनातील आत्मविश्वास जागृत करणे, धीर देणे ही कामे करून डॉक्टरने रुग्णाच्या मनाला संजीवनी द्यायची असते, असेही श्री. सेन यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर दिलीप हरी (जनरल मनेजर इंडियन ऑइल), वासुदेव तुळसणकर (सामाजिक कार्यकर्ते), उदय बेडेकर (इंडियन ऑइल), राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एस. एस. चव्हाण, रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. पटेल, परिचारिका सौ. शिंदे इत्यादी उपस्थित होते.

नवजीवनचे विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांनी प्रास्ताविक, तर पाचलच्या सरस्वती लॅबचे मंगेश पराडकर यांनी स्वागत केले. वडचाई व्यायामशाळेचे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबा शेट्ये यांनी सर्व रुग्णांना अल्पोपाहार दिला. शिबिराला अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी महिला रुग्णांना घेऊन येण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली. शिबिर यशस्वी होण्यासाठी राजापूरचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आणि महिला बालविकास अधिकारी सौ. व्हटकर यांनी मोलाची मदत केली.

शिबिराचे संयोजन इंडियन ऑइलचे आरोग्य अधिकारी विजय तावडे यांनी पार पाडले. शिबिरात १४० महिला आणि बालरुग्णांची तपासणी करून औषधांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. शिबिरात सहभागी रुग्णांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या. मुलांना बिस्किट्स, सुका मेवा आणि पॅड, पेन, रंगपेटी असे शालोपयोगी साहित्य तर महिलांना घरसजावटीच्या वस्तू इंडियन ऑइलतर्फे सौ. पूजा काकोडकर यांनी वितरित केल्या. तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन श्री. तावडे यांनी दिले. शिबिराची भोजन व्यवस्था सौ. वैशाली आणि विद्याधर पळसुलेदेसाई यांनी पार पाडली.

रायपाटण (ता. राजापूर) येथील आरोग्य शिबिर


No comments:

Post a Comment