Wednesday 1 April 2015

मठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगतालांजा – तालुक्यातील मठ येथील नव्याने स्थापन झालेल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दुर्मिळ पंचकुंडी यज्ञासह मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता रविवारी (ता. 29) झाली.
तीन दिवसांच्या या सोहळ्यात लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले. पहिल्या दिवशी लक्ष्मीपल्लीनाथ, गणपती तसेच महालक्ष्मी या तीन मूर्तींचा जलाधिवास आणि पंचकुंडी हवन झाले. दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायच्या तिन्ही देवतांची ढोलताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये शेकडो भक्त सहभागी झाले. विश्वकर्मा पूजनाच्या वेळी तिन्ही दगडी मूर्ती आणि मंदिराचा दगडी गाभारा साकारणारे कुडाळ येथील शिल्पकार कुडीगार यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी श्रीकृष्ण पंडित यांनी आयोजित केलेल्या कुलोपासकांच्या स्वरसंगम या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने परिसर भक्तिमय होऊन गेला. अखेरच्या दिवशी तिन्ही मूर्तींचा प्राणप्रतिष्ठेचा महत्त्वाचा विधी लक्ष्मीपल्लीनाथाच्या गजरात पार पडला.
पंचकुंडी यज्ञाने हा प्राणप्रतिष्ठा विधी झाला. पन्नास ब्रह्मवृंदांनी विनामोबदला पौरोहित्य केल्याने सुमारे दहा लाख रुपयांच्या निधीची बचत झाली, अशी माहिती आणि दुर्मिळ यज्ञाविषयीची माहिती वेदमूर्ती विश्वास ऊर्फ नाना जोशी यांनी माहिती दिली. विश्वस्त राजू नेवाळकर सूत्रसंचालन केले. संस्थानच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, विश्वस्त शशिकांत गुणे, रवींद्र भाटे इत्यादींनी समारंभाचे उत्तम नियोजन केले.

-    लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारी प्रतिष्ठापित झालेली गणपतीची मूर्ती.

प्रवेशद्वारी प्रतिष्ठापित करण्यात आलेली लक्ष्मीची मूर्ती.

गाभाऱ्यात विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली लक्ष्मीपल्लीनाथाची मूर्ती

No comments:

Post a Comment