पुरुषोत्तमशास्त्रींनी
शंभराव्या वर्षात पदार्पण केले,
त्या दिवशीच्या समारंभातील छायाचित्र
|
रत्नागिरीतील
संस्कृतचे गाढे
अभ्यासक पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री यांचे शुक्रवारी (ता. २४)
रात्री निधन झाले. तारखेने येत्या १ मे रोजी, तर तिथीने येत्या ४ मे रोजी बुद्धपौर्णिमेला ते वयाची शंभरी पूर्ण करणार
होते.
कुर्धे (ता. रत्नागिरी) हे पुरुषोत्तमशास्त्री फडके यांचे मूळ गाव. व्याकरणवाचस्पती
दिगंबरशास्त्री जोशी काशीकर गुरुजी यांच्याकडे त्यांचे अध्ययन झाले. १९३२ ते १९४४
या एका तपात त्यांनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या
वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरणचूडामणी आणि काशीच्या संस्कृत विद्यापीठाची
व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळविल्या. त्याशिवाय बडोदे आणि म्हैसूर संस्थानच्या
व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळविली. रत्नागिरीच्या फाटक प्रशालेत १९४२
पासून त्यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. तेथे संस्कृत आणि प्राकृत (अर्धमागधी) या
भाषांचे अध्ययन त्यांनी केले. तसेच १९४७ पासून संस्कृत पाठशाळेत प्रधानाध्यापकपदही
त्यांनी भूषविले. या दोन्ही सेवांमधून ते १९७३ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर
आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी आजीवन
अपरिग्रह व्रत स्वीकारले. या काळात संस्कृतच्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी
अखंड विद्यादान केले.
भगवद्गीता, उपनिषदे, वैदिक वाङ्मय, महाभारत, रामायण, भारतीय संस्कृती अशा अनेक
विषयांवर त्यांनी दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध
योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह विविध विषयांवर सहा पुस्तके त्यांनी लिहिली.
रत्नागिरीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध विधियुक्त स्वाहाकार, वेदांचे
घनपाठ, वेगवेगळे याग आणि होम त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घडवून आणले. शिक्षक
कल्याण निधी, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी संचय सहकारी
सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांनी स्थैर्य प्राप्त करून दिले.
त्यांच्या निष्काम सेवेला मानवंदना म्हणून अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी
विभूषित केले. मात्र उत्तरायुष्यातील अपरिग्रह व्रताच्या काळात त्यांनी कोणताही
आर्थिक लाभ तसेच पुरस्कारही स्वीकारला नाही.
त्यांचे दोन्ही पुत्र उच्चविद्याविभूषित आहेत. लेखिका आशा गुर्जर ही त्यांची
कन्या, तर लेखक रवींद्र गुर्जर हे त्यांचे जामात होत.
सात्त्विकता आणि सज्जनता यांचे खरेखुरे दर्शन घ्यायचे असेल, तर अप्पांच्या (फडकेशास्त्रींच्या) सहवासात यायला हवे, असे गौरवोद्गार पांडुरंगशास्त्री आठवले यांनी काढले होते.
पुण्याच्या
देवदेवेश्वर संस्थानाने पुरुषोत्तमशास्त्री फडके यांना दिलेले मानपत्र
|
No comments:
Post a Comment