Tuesday, 14 April 2015

चैत्रोत्सवानिमित्त मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचे राजोपचारांनी पूजन
लांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचे चैत्रोत्सवाच्या निमित्ताने राजोपचारांनी पूजन करण्यात आले. पाच दिवसांच्या या चैत्रोत्सवात मकरंदबुवा सुमंत रामदासी यांनी सादर केलेल्या कीर्तनसेवेने भाविक मंत्रमुग्ध झाले.मठ येथे नव्यानेच स्थापन झालेल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच झाली. त्यानंतर प्रथमच चैत्रोत्सव मोठ्यात थाटात पार पडला. उत्सवाची सुरवात राजोपचार पूजेने करण्यात आली. ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये तसेच संस्थानांमध्ये मंगलाचरण, गायन, नृत्यू, मिरवणूक इत्यादी चौसष्ट उपचारांनी पूर्वी अशी राजोपचार पूजा केली जात असे. त्याच पद्धतीने पल्लीनाथाची पूजा करण्यात आली. उत्सवात पहिल्या दिवशी रात्री हभप विश्वनाथबुवा भाट्ये यांचे कीर्तन झाले. त्यानंतरची पाच कीर्तने मकरंदबुवा रामदासी यांनी केली. `आपुला तो एक देव करून घ्या रे` या अभंगावर त्यांनी निरूपण केले. भक्तियुक्त अंत:करणापासून निष्काम सेवा केल्याने मठ येथील पल्लीनाथाची सेवा भाविकांनी केल्याने हे मंदिर अल्पावधीत तीर्थक्षेत्र बनल्याचे त्यांनी निरूपणात सांगितले. भक्तिभाव, नि:स्वार्थी सेवा आणि सुयोग्य नियोजनातून कार्य सिद्धीस जाते. आधी मंदिर आणि त्यानंतर उत्सव अशी परंपरा असते. मठ येथे मात्र आधी उत्सव आणि नंतर मंदिर असा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव पार पडला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. कोणत्याही बिदागीविना बुवांनी चार दिवसांची कीर्तनसेवा सादर केली. त्यांच्या सेवेने भाविक मंत्रमुग्ध झाले.

सौ. माधुरी नातू यांच्या भक्तिगीत गायनाने उत्सवाची सांगता झाली.

-  मठ (ता. लांजा) :  लक्ष्मीपल्लीनाथाच्या चैत्रोत्सवात भाविकांच्या गर्दीत कीर्तन सादर करताना मकरंदबुवा सुमंत रामदासी.

No comments:

Post a Comment