Tuesday, 31 March 2015

लक्ष्मीपल्लीनाथ प्राणप्रतिष्ठा

मठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाचा उद्यापासून प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवसांचा विधी :  कोकणात प्रथमच पंचकुंडी यज्ञ


      लांजा – तालुक्यातील मठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या शुक्रवारपासून (ता. 27 मार्च) होणार आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील धार्मिक विधींमध्ये पंचकुंडी यज्ञाचा समावेश असून गोव्यात सर्रास होणारा अशा स्वरूपाचा यज्ञ कोकणात प्रथमच होत आहे. विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
       चाळीस कुळांचे कुलदैवत असलेले लक्ष्मी-पल्लीनाथ हे ब्रह्मा-विष्णु-महेशाचे एकत्रित तत्त्व असलेले जागृत देवस्थान आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन मठ येथे भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पंचकुंडी प्रकाराने केली जाणार आहे. गोव्यात सर्रास होणाऱ्या या पंचकुंडी प्राणप्रतिष्ठा प्रकारात विशिष्ट पद्धतीने ईशान्य, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशांना कुंडांची स्थापना करून यज्ञ केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा 27 ते 29 मार्च असे तीन दिवस चालणार असून रविवारी (ता. 29) दुपारी महाप्रसादाचे वाटप होईल. सोहळ्यात पहिल्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता हभप विश्वनाथबुवा भाट्ये यांचे कीर्तन, 28 ला रात्री अभंग, भक्तिगीतांचा स्वरसंगम आणि रविवारी (ता. 29) विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन होणार आहे.
       दुर्मिळ पद्धतीने होणार असलेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

...........


गणपती


महालक्ष्मी
................................................................................................................


लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठेला मठ येथील मंदिरात प्रारंभ


      लांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज (ता. 27 मार्च) विधिवत प्रारंभ झाला. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील आजच्या पहिल्या दिवशी पंचकुंडी यज्ञ सुरू झाला. पंचकुंडी यज्ञासाठी ठरावीक मापाचा मंडप उभारण्यात आला. त्यामध्ये ईशान्येला आचार्यकुंड, पूर्वेला चौकोनी कुंड, दक्षिणेला अर्धवर्तुळ कुंड, पश्चिमेला वर्तुळकुंड आणि उत्तरेला पद्मकुंड तयार करण्यात आले. मंडप प्रतिष्ठेनंतर जलाधिवास, अग्न्युत्तारण, स्नानविधी आणि शय्याधिवास इत्यादी विधी करण्यात आले. महालक्ष्मी, गणपती आणि लक्ष्मीपल्लीनाथाच्या मूर्तींवर हे विधी करण्यात आले. त्यानंतर पाचही कुंडांमध्ये हवन करण्यात आले. अशा स्वरूपाचा यज्ञ कोकणात प्रथमच होत असल्याने भाविकांनी समारंभाला गर्दी केली होती. उद्या (ता. 28) दिवसभर विविध धार्मिक विधी आणि रात्री साडेनऊ वाजता अभंग-भक्तिगीतांचा स्वरसंगम हा कार्यक्रम होणार आहे.

प्राणप्रतिष्ठा करावयाच्या मूर्तींना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले.

................................................................................................................

प्राणप्रतिष्ठा केलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाला स्वराभिषेक

मठ येथील कार्यक्रम;  आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मैफलीला उत्स्फूर्त दाद


लांजा : तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आयोजित केलेल्या विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वराभिषेकरूपी मैफलीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

मठ येथे नव्यानेच स्थापन झालेल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच झाला. तीन दिवसांच्या या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी रात्री सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. मारुबिहाग रागातील कल नही आवे, सावरे तो हे बिन देखत जिया या रूपक तालातील बंदिशीने मैफलीची सुरवात झाली. आडाचौताल रागातील तराणा (तन देरानी दीम, तन तदानी) आणि द्रुत तीन ताल (जागू मैं सारी रैना बलमा) यांच्या सादरीकरणाला दर्दी रसिकांनी भरभरून दाद दिली. रागदारीतील या गायनानंतर ताने स्वर रंग व्हावा मग तो रघुनाथ ध्यावा (रामदास स्वामी), बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल (संत तुकाराम), मी राधिका हे प्रेमिका (चित्रपटगीत) या गीतांची पेशकशही रसिकांची मने जिंकून गेली. अवघा रंग एक झाला या भैरवीने मैफलीची सांगता झाली. सौ. अंकलीकर-टिकेकर यांना तन्मय देवचके (हार्मोनियम), विभव खांडोळकर (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), उत्तम करंबेळकर (तालवाद्य), स्वरूपा बर्वे, भक्ती पिलणकर (गायन) यांनी उत्कृष्ट साथ दिली. ध्वनिव्यवस्था उदयराज सावंत यांनी सांभाळली.

सौ. टिकेकर यांची एक मैफल यापूर्वी रत्नागिरीत झाली होती.  त्यावेळी रत्नागिरीतील चित्रकार सुनील वणजू यांनी रेखाटलेल्या त्यांच्या चित्राची प्रतिमा देऊन लक्ष्मीपल्लीनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर यांनी सौ. टिकेकर यांचा सत्कार केला. त्यांच्यासमवेत आलेले त्यांचे पती प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या मैफलीपूर्वी सायंकाळी शैलेश भाटे आणि तरुण कुलोपासकांनी सादर केलेल्या भजनाच्या कार्यक्रमाने मंदिर भारून टाकले.मठ (ता. लांजा) :  गायन सादर करताना सौ. आरती अंकलीकर-टिकेकर आणि साथीदार              (पाठीमागे अभिनेते उदय टिकेकर)


मैफलीला उपस्थित रसिक.

No comments:

Post a Comment