Sunday, 29 March 2015

मुहूर्तमेढ...

कोकण मीडिया ब्लॉगवर आपलं सहर्ष स्वागत!

नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस नावाची माध्यमविषयक संस्था सुरू केली आहे. कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याचं म्हणजेच मीडिया कन्सल्टंट म्हणून भूमिका पार पाडण्याचं कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं उद्दिष्ट आहे. संस्थेचं कार्यालय रत्नागिरीत आहे. प्रारंभी रत्नागिरी शहर-परिसर, रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये संस्थेचं कार्यक्षेत्र विस्तारित होईल.

प्रसारमाध्यमांचं महत्त्व वादातीत आहे. आधुनिक काळात आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तकांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियापर्यंत या माध्यमाची व्याप्ती पोहोचली आहे. यापुढेही विविध माध्यमं निर्माण होऊ शकतील. माध्यमांमध्ये झपाट्यानं वाढ होत असली, तरी त्यामध्ये वृत्तपत्रांना समाजात मोठं स्थान आहे. छापून आलेल्या शब्दांवर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येत असतात. त्याच सोडविण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस करणार आहे. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, बातम्या तयार करून देणं (Drafting), सभा, संमेलनं, परिषदा, अधिवेशनांचं वार्तांकन, विविध विषयांवरील वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख, विशेष वृत्तांत तयार करण्यासाठी तसंच गरजेनुसार हे सर्व विविध वृत्तपत्रांसह अन्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली जाईल. या आणि अशा वृत्तपत्रीय कामांबरोबरच स्मरणिका तयार करणं, पुस्तिकांसाठी संकलन, पुस्तकांसाठी प्रेस कॉपी तयार करणं, छायाचित्रण, पत्रकार परिषदांचं आयोजन, इनहाउस जर्नलचं संकलन-संपादन, मुद्रितशोधन इत्यादी स्वरूपाची कामं माफक मोबदल्यात केली जातील.

ज्यांना बातमी द्यायची आहे किंवा ज्यांना माध्यमांशी आणि मुद्रणाशी संबंधित इतर सेवा हव्या आहेत, अशा ग्राहकांना अधिकाधिक समाधानकारक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक सेवा देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा तपशील सातत्यानं संकेतस्थळावर अद्ययावत केला जाणार आहे. त्यामुळे आमच्या संकेतस्थळालाही वारंवार भेट द्यावी, अशी अपेक्षा आहे.

पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी आणि पत्रकारितेचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. मुंबई, कोल्हापूर आणि रत्नागिरीत काम करताना मुद्रितशोधन, वृत्त-वृत्तांतलेखन, विविध विषयांवरच्या पुरवण्यांचं संकलन, लेखन अशा स्वरूपाची कामगिरी मी केली. आकाशवाणीसाठी वृत्तलेखन तसंच विविध मालिकांसाठीही लेखन केलं. काही शासकीय स्मरणिका आणि अंकांचं संकलन-संपादनही मी केलं. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या कामगिरीसाठी स्थानिक ते राज्यपातळीपर्यंतच्या विविध पुरस्कारांनी मला गौरविलं. आजवरच्या अनुभवाच्या आधारे ही पत्रकारितेशी संबंधित व्यावसायिक सेवा सुरू करत आहे.

माध्यमांच्या या युगात देशविदेशातील बातम्या सहज उपलब्ध होत असताना आजूबाजूच्या परिसरातल्या छोट्याशा पण महत्त्वाच्या घटनाही दुर्लक्षित राहतात. या घटनांना बातमीचं मूल्य असतं. ते मूल्य समाजातील व्यक्ती, संस्था-संघटनांचे कर्मचारी-अधिकारी, सदस्यांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्या घटना इतरांपर्यंत पोहोचत नाहीत. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येतात. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, कार्यक्रमांच्या बातम्या तयार करून देताना त्या लिहिणं (Drafting) सर्वांनाच जमतं असं नाही. त्यामुळे अनेकदा व्यक्ती आणि संस्थांना अपेक्षित असलेला महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहतो. अशा संस्था आणि व्यक्तींना बातम्या, वृत्तांत लिहिण्यासाठी त्यांना मदत करणं हा या व्यवसायाचा एक भाग आहे. याशिवाय माध्यमांशी संबंधित इतर सेवाही दिल्या जाणार आहेत. पत्रकारितेतल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आणि वैविध्यपूर्ण कामगिरीच्या आधारे संबंधित ग्राहकांना आवश्यक ती सेवा समाधानकारकरीत्या पुरवणं शक्य होईल, याची खात्री वाटते.

या संस्थेचाच एक भाग म्हणून http://kokanmedia.webs.com नावाचं संकेतस्थळ सुरू केलं आहे. संस्थेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, कामकाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी http://www.facebook.com/kokanmedia हे फेसबुक पेजही सुरू केलं आहे. गुगलवरही https://plus.google.com/105068458184761324445/about  या पत्त्यावर आम्ही उपलब्ध आहोत. आपल्यालाही काही सांगायचं झाल्यास kokanmedia@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर आमच्याशी संपर्क साधता येऊ शकेल.

नवनव्या घडामोडी आणि नवी माहिती घेऊन मी आपल्यासमोर सातत्यानं येईनच. आपल्या सहकार्याची आणि संपर्काची अपेक्षा.

- प्रमोद कोनकर, रत्नागिरी

No comments:

Post a Comment