५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र.
दिवस तिसरा (२० नोव्हेंबर २०१९)
‘अननोन फेस’ : चेहरा बदलून वेदना लपविण्याच्या प्रयत्नांचं कलात्मक सादरीकरण
‘अननोन फेस’ या नाटकाची घोषणा होऊन
पडदा उघडतो, तेव्हा एका टुमदार फ्लॅटचा अंतर्भाग रंगमंचावर दिसू लागतो. या फ्लॅटमध्ये एकटीच
राहणारी युवती - रश्मी - फोनवर मैत्रिणीशी बोलत असते. मैत्रीण तिच्या सोबतीला राहण्यासाठी
एका तरुणाला पाठवणार असते आणि रश्मीला तिथं राहायला काही केल्या पुरुष सहनिवासी नको
असतो. तिचं फोनवरून बोलणं पूर्ण होतं न होतं, एवढ्यात एक अठ्ठावीस-तिशीचा युवक आपलं सामानसुमान घेऊन तिथं
राहायला येतो.... आणि ती ‘नको, नको’ म्हणत असतानाच एक मोकळी खोली बघून स्थिरस्थावर होतोसुद्धा!
हे असं झाल्यावर काय
होणार? ती चिडलेली, तर तो हसतमुख. एवढ्यातच
तिला एक फोन येतो. पलीकडची व्यक्ती सांगत असते एका भयानक घटनेबद्दल. आठ वर्षांच्या
मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ती घटना! रश्मी अस्वस्थ होते, भयंकर संतापते, पुरुषी मनोविकृतीबद्दल
खूप बोलते, ऐकवते त्या नव्यानं आलेल्या सहनिवासी तरुणाला. तोही बोलतो, पण काहीसा पड खाल्ल्यासारखं.
थोड्या वेळाने शांतता. तो - संघर्ष त्याचं नाव - टीपॉयवरची वही घेऊन तो चाळू लागतो.
काव्या नावाच्या कवयित्रीनं लिहिलेल्या कविता असतात त्या वहीत. एका कवितेवर तो स्थिरावतो.
‘कुठूनही पाहिलं तरी
स्त्री ही भोग्य वस्तू’ अशी काहीशी कल्पना तीत मांडलेली...! पुन्हा एकदा गरमागरम चर्चा!
एक-दोन दिवसांत दोघांचं
सहवास्तव्य रुळतं. ‘अहो-जाहो’ वरून ‘अरे-अगं’ वर येतात. गंमत म्हणजे त्यानं केलेली कॉफी घेता घेता, संतापाने काही बोलताना
रश्मीच एकदम ‘अरे!’
म्हणून जाते. सूर जुळू लागलेत असं प्रेक्षकांना वाटू लागतं. एवढ्यात ती आतल्या
खोलीत जाते, संघर्ष कुणाशी तरी फोनवर बोलतो, झटकन आपल्या खोलीत जातो, सॅक पाठीवर लावून बॅगा हातात घेऊन तिला काही न सांगता, कळू न देता निघून जातो.
संघर्ष निघून गेल्यावर
बुचकळ्यात पडलेली रश्मी दार लावून मागे फिरताना हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. एकाकी
ती भेदक किंचाळते. तिची किंकाळी ऐकून प्रेक्षागारही थरारून जातं...!
मध्यंतरानंतर बदललेल्या
दृश्यात संघर्ष पुन्हा तिला भेटतो, पण डॉक्टरच्या रूपात. हळूहळू ती दोघं पुन्हा सहजतेनं वागू लागतात.
खरं म्हणजे संघर्ष सहज वागतच असतो, रश्मीही वागू लागते. त्या दोघांच्या एक-दोनदा भेटी होतात. पुन:पुन्हा
संघर्षच्या गायब होण्याने रश्मी अस्वस्थ मन:स्थितीत असतानाच एके दिवशी अचानकपणे तो
येतो. हातात काही तरी घेऊन... ती भेटवस्तू असते. तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेली आणि
मग येतो तो संभाषणाचा टप्पा...
बोलता बोलता चार वर्षांपूर्वी
आपल्या प्रेयसीबाबत घडलेल्या एका थरारक प्रसंगाचं वर्णन संघर्ष तिला ऐकवतो. त्या दुर्दैवी
दिवशी त्याच्या प्रेयसीवर झालेल्या बलात्काराचं... ते कृत्य करणाऱ्या नराधमाला संघर्ष
चोप देऊ लागतो, नराधम पळतो आणि एका ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडून जातो.
पण रश्मी हे सगळं नाकारते.
‘तू त्या वेळी तिथं
नव्हतासच. होता तो यश - माझा प्रियकर.’ आणि एका उन्मादक क्षणी ओरडते, ‘ती मीच होते!’
काही क्षण सन्नाटा!!
शांतपणे संघर्ष म्हणतो, ‘नाही. ती तू नव्हतीस.’ आणि पाकिटातून एका
मुलीचा फोटो काढून दाखवतो. ‘माझाच, माझाच फोटो आहे तो!’ रश्मी बोलते, अभावितपणे सांगून टाकते - ‘मी चेहरा बदलून घेतलाय!’
‘अननोन फेस!’
हे सगळं ठाऊक असल्यानं
आधीपासूनच तिच्यावर प्रेम करणारा संघर्ष, तिच्या मनावरचं ओझं उतरावं, तिचं लादून घेतलेलं एकटेपण संपवावं यासाठी आपण ही सारी धडपड
केल्याचं सांगतो आणि तिला जीवनसाथी होण्याची ऑफर देतो...!
चेहरा बदलून घेतल्यावरही
मनातल्या वेदना कमी होत नाहीत. अत्याचार भोगलेलं शरीर तेच असतं आणि चिरडून गेल्याची
व्यथाही तीच असते.हळुवारपणे कुणी तरी घातलेल्या फुंकरीनं मात्र तिचं जीवन बदलून जातं, अशी कल्पना मांडणारं
हे नाटक उतरलं होतं कविता मोरवणकर यांच्या लेखणीतून. रंगमंचावर आणलं होतं संगमेश्वरमधल्या
कोसुंब गावच्या श्री देवी जुगाई कलामंच या संस्थेनं. स्वानंद देसाई यानं सादर केलेला
संघर्ष आणि श्रद्धा मयेकरनं साकारलेली रश्मी ही दोनच पात्रं. स्वानंदनं प्रकट केलेला
मिश्किलपणा, प्रसंगानुरूप दाखवलेले, शंका येण्याजोगे पुरुषी चोरटेपणाचे भाव, उत्कटता आणि सहजता
यांच्या जोडीला श्रद्धानं हुबेहूब वठवलेली, खूप सोसलेली रश्मी ही दोघं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. स्त्रीत्वाचा
आणि आत्मसन्मानाचा भयंकर कुस्कर झाल्यानं एकटी पडलेली, किंबहुना एकटेपणा आवडू
लागलेली, आतून संतप्त असलेली
आणि शून्यात नजर लावणारी रश्मी प्रत्ययकारी साकारली गेलीय.
‘त्या’ प्रसंगाचं संघर्ष वर्णन
करत असताना खुर्चीवर पाय घेऊन, पायांना घट्ट मिठी घालून भेदरलेल्या चेहऱ्यानं, ती असह्य आठवण नाईलाजानं
ऐकत बसलेली रश्मी, संघर्षने सहजीवनासाठी हात पुढे केल्यानंतर स्तिमित होत त्याच्या मिठीत हरवून गेलेली
आणि बदललेला ‘अननोन फेस’ गळून पडलेली रश्मी....हे सारं प्रत्यक्षच पाहायला हवं असं.
विनायक सावर्डेकर यांचं
दिग्दर्शन अप्रतिम. एक उदाहरण - एका प्रसंगात संघर्ष बाहेर गेल्यावर रश्मीनं दरवाजा
आतून लावून घेतल्याचा ‘ठक्क’ असा त्या शांततेत स्पष्ट ऐकू येणारा आवाज! अशा बऱ्याच जागा प्रभावी
दिग्दर्शनाचा प्रत्यय आणून देतात. प्रेक्षागृहाबाहेर पडताना हे सगळं मनात रेंगाळत राहतं, कलात्मकतेच्या ठशासह!
- राजेंद्रप्रसाद मसुरकर
मोबाइल : ९९६०२ ४५६०१
(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)