Thursday, 29 August 2019

कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा



दीपोत्सव विशेषांकासाठीकोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा


     साप्ताहिककोकण मीडियारत्नागिरीतून गेली तीन वर्षे प्रसिद्ध होत आहे. कोकणातील विविध विषय त्यामध्ये हाताळले जात आहेत.
साप्ताहिकाची सुरुवात दिवाळी अंकापासून झाली. पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला. पहिल्या वर्षी कोकणाचा शतकाचा मागोवा हा विषय घेण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी दिवाळीत प्रसिद्ध झालेल्या कोकणातील वास्तुसौंदर्य विशेषांकाचेही चांगले स्वागत झाले. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात कोकणातील जलसौंदर्याचा आढावा घेण्यात आला. या अंकाची दखल मुंबई वृत्तपत्र लेखक संघाने घेतली आणि उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देऊन गौरव केला.
     यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी साप्ताहिककोकण मीडियाने कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धेचा विषय घेतला आहे.
     संवादाच्या दृष्टीने भाषांना आणि त्यातही बोली भाषांना खूप महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वतःची भाषा, मातृभाषा, स्थानिक भाषा किती महत्त्वाची आहे, हे यावरून स्पष्ट होते.
     मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. ती सुंदर, सङ्कृद्ध भाषा आहेच; पण तिची प्रत्येक बोलीही अतिशय संपन्न आहे. त्यातील प्रत्येक बोलीची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक बोलीचा लहेजा, सौंदर्यस्थळे, रांगडेपणा, भावना थेट व्यक्त करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. मात्र वापर घटल्याने बोलीभाषा मागे पडत चालल्या आहेत. केवळ क्रियापद मराठी आणि बाकीचे शब्द हिंदी, इंग्रजीतून अशी वाक्यरचना अलीकडे सर्वत्र केली जाते. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक जण व्यक्त होत असला, तरी जसे बोलले जाते, तशाच प्रकारे लिहिण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मराठी शब्दांचा अभाव असलेली मराठी लिहिली-वाचली जाऊ लागली आहे. प्रमाणभाषेचीच ही स्थिती असल्याने बोलीभाषाही त्याच मार्गाने जात आहेत. गेल्या काही वर्षांत जगातील इतर सर्व भाषांप्रमाणेच मराठीतीली बोलीभाषा नष्ट होण्याची भीती भाषातज्ज्ञांना वाटते. ती भीती नष्ट करण्याचे सामर्थ्य  बोलीभाषा बोलणाऱ्या सामान्य लोकांमध्ये आहे. हे लक्षात घेऊनच साप्ताहिककोकण मीडियाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोकणात प्रमाण मराठीबरोबरच मालवणी, बाणकोटी, संगमेश्वरी, आगरी, दालदी, सामवेदी इत्यादी चौदा बोलीभाषा बोलल्या जातात. त्यापैकी कोणत्याही भाषेत लिहिलेली कथा या स्पर्धेसाठी पाठविता येईल. बोलीभाषेत लिहिताना निवेदनासाठी कथेमध्ये मराठी भाषेचा वापर केल्यासही चालेल.
     स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जातील. विजेत्या कथा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केल्या जातील. तसेच अन्य उल्लेखनीय कथांचाही प्रसिद्धीसाठी विचार केला जाईल.

स्पर्धेचा तपशील :
* शब्दमर्यादा एक हजार
* पूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पाठवू नये.
* कथा हस्तलिखित स्वरूपात असेल, तर सुस्पष्ट शब्दांत लिहावी.
* टंकलिखित कथाही चालेल.
* युनिकोडमध्ये लिहिलेली कथा ईमेलने पाठविल्यास उत्तम.
* कथालेखकाचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, व्हॉट्सअॅपसह मोबाइल क्रमांक, ईमेल कळवावा.
* कथा पोहोचण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०१९.

कथा टपालाद्वारे पाठविण्यासाठी पत्ता :
साप्ताहिक कोकण मीडिया,
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
कुसुमसुधा’, 697, रामचंद्रनगर (श्रीनगर),
गांधी ऑटोमोबाइल्सच्या मागे,
आकाशवाणी प्रक्षेपण केंद्रासमोर,
खेडशी, रत्नागिरी ४१५६३९.
संपर्क : ९४२२३८२६२१ (व्हॉट्सअॅ)
-मेल : kokanmedia1@gmail.com

............

महत्त्वाची सूचना : ज्यांना कथा स्पर्धेत भाग घ्यावयाचा नसेल, त्यांनी मराठीसह कोकणातील बोलीभाषांमधील आपल्या कथाही दिवाळी अंकासाठी पाठवाव्यात.

याशिवाय....

दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रे, विनोदी कथा, कोकणविषयक लेख, कविता इत्यादी साहित्याचेही स्वागत आहे.


Saturday, 24 August 2019

पत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृत खांडेकर

  मुंबई :   पत्रकारांप्रमाणेच समाजातील अनेक समस्यांबाबत वृत्तपत्र लेखक वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या सदरातून आपले विचार मांडतात. विविध उपाय सुचवतात. त्यामुळे त्यांनाही वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांएवढेच महत्त्व असते. म्हणूनच कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावरच वृत्तपत्र लेखकांच्या पत्रांना स्थान दिले जाते, असे प्रतिपादन ‘नवशक्ति’चे संपादक सुकृत खांडेकर यांनी केले.

      मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ७० वा वृत्तपत्र लेखक दिन आणि ४४ वा दिवाळी अंक पुरस्कार सोहळा ताडदेव व्यायामशाळेतील रुसी मेहता सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सत्तर वर्षांपूर्वी ‘नवशक्ति’चे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये यांनी गिरगावच्या तांबे उपाहारगृहात २२ ऑगस्ट रोजी पहिला वृत्तपत्र लेखक मेळावा भरविला होता. तेच औचित्य साधून यावर्षी श्री. खांडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, कोणतेही वृत्तपत्र हे कोणत्याही संचालकांचे किंवा संपादकांचे नसते तर ते वाचकांचेही असते. त्यातील लेखनाची उर्मी असलेले काहीजण स्थानिक समस्यांसह ज्वलंत आंतरराष्ट्रीय प्रश्नावर नवे विचार देण्याचे काम अतिशय प्रभावीपणे करीत असतात. ७० वर्षांपूर्वी सुरू झालेले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे चाललेले काम निर्विवादपणे समाजोपयोगी आणि दखल घेण्यासारखे आहे. लोकमानसाची दिशा अलीकडे प्रिंट माध्यमांसह इलेक्टॉनिक मीडिया व मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. परंतु लोकमानसाची बूज राखत खऱ्या अर्थाने जनमनाचा कानोसा घेणारा आणि संपादकीय पानावर मानाने मिरवणारा वाचकांच्या पत्रव्यवहाराचा स्तंभ निर्विवाद महत्त्वाचा आहे. दादर येथील महापालिकेच्या शिंदेवाडी शाळेत असलेले कार्यालय महापालिकेने सील केले आहे. संस्थेच्या कार्यात अडचणी आणण्याचा अथवा तो आवाज दाबण्याचा सरकार किंवा प्रशासनाकडून प्रयत्न होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव असेन.

      संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संघाच्या ७० वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख मांडताना मुंबई महापालिका,   राज्य सरकारकडून संस्थेला कसे बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे आणि न्याय मिळत नसल्याविषयी खंत व्यक्त केली. संघाचे साठावे संमेलन पुण्यात भरविण्यासाठी आवश्यक ती मदत मी करेन, असे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर यांनी दिले.

मुंबई - मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी रत्नागिरीच्या `कोकण मीडिया`ला मिळालेला पुरस्कार
`नवशक्ति`चे संपादक सुकृत खांडेकर यांच्याकडून स्वीकारताना संपादक प्रमोद कोनकर. सोबत संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे.

      ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि पत्रलेखन चळवळीत सक्रिय योगदान असलेले नंदकुमार रोपळेकर आणि  दत्ताराम घुगे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाने आयोजित केलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हे विजेते दिवाळी अंक असे - का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक शब्ददीप (पुणे), पु. ल. देशपांडे स्मृती उत्कृष्ट अंक पुण्यनगरी (कोल्हापूर), गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक रायगड माझा (कर्जत), साने गुरुजी  स्मृती उत्कृष्ट अंक उद्याचा मराठवाडा (नांदेड), प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक मुंबई तरुण भारत (मुंबई), पांडुरंग रा भाटकर स्मृती उत्कृष्ट अंक कमलदूत (पुणे), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक लोकजागर (सातारा), कोकण मीडिया (रत्नागिरी), तेजोमय (पुणे), मोहनगरी (पुणे), अक्षरभेट (मुंबई), वास्तव (मुंबई), जीवनज्योत (मुंबई),  (अमेरिका), बदलते जग (कोल्हापूर), शब्दालय (श्रीरामपूर), वसंत (मुंबई), मुक्तछंद (महाड), क्षत्रिय संजीवनी (मुंबई), संयम (भाईंदर), जीवनज्योत (मुंबई), रानभरारी (शहापूर ठाणे), उत्सवप्रभा-ब्लॅक व्हाइट टु कलर (मुंबई), दीपस्तंभ (मुंबई), पृथा (पुणे),

      उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष रमेश सांगळे, सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले. कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी आभार मानले. समारंभाला  नगरसेविका उर्मिला पांचाळ, मराठी विज्ञान परिषदेचे अ. पां. देशपांडे, ताडदेव व्यायामशाळेचे सेक्रेटरी सुरेश सांगळे मराठी साहित्य अकादमीचे प्रकाश भातंब्रेकर, सुप्रसिद्ध विनोदी लेखक सुधीर सुखटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





Monday, 17 June 2019

रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या निधीची मागणी



रत्नागिरी : कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अवघ्या दोन हजार कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्याची एकमुखी मागणी रत्नागिरीत आज भरलेल्या कोकण रोजगार हक्क परिषदेत करण्यात आली.
गाऱ्हाणे घालून कोकण रोजगार हक्क परिषदेला प्रारंभ करण्यात आला.
कोकणच्या मूलभूत प्रश्नांवर पहिले कोकण रोजगार हक्क आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या २५ जून रोजी मुंबईत आझाद मैदानात दिवसभराचे धरणे आंदोलनही छेडण्यात येणार आहे. त्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी रत्नागिरीत आज कोकण विकास यात्रा आणि पहिली कोकण रोजगार हक्क परिषद भरविण्यात आली. मनीऑर्डरच्या चौकटीतून बाहेर पडून कोकणाचा आंबा, मच्छी आणि पर्यटन या तीन प्रमुख अंगांनी विकास व्हावा आणि हीच मागणी राज्य शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी राजापूर ते मंडणगड या रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही टोकांपासून रत्नागिरीमध्ये जमलेल्या कोकणच्या भूमिपुत्रांनी भर कडाक्याच्या उन्हात हातखंबा ते रत्नागिरी शहर अशी विकास यात्रा काढली. यात्रेचे नेतृत्व समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी केले. यावेळी रत्नागिरीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली, तर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोकणचा आवाज पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
रत्नागिरीजवळच्या हातखंबा येथे विविध क्षेत्रांतील भूमिपुत्र दुपारी एकत्र आले. तेथून विकास यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत संजय यादवराव, उदय लोध,  कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, प्रल्हाद वणजू, युयुत्सु आर्ते, विकास शेट्ये, सचिन शिंदे, पत्रकार सतीश कदम, मकरंद भागवत, हरिश्चंद्र देसाई यांच्यासह उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक सहभागी झाले. हातखंबा येथून मोटरसायकल तसेच मोटारींनी ही यात्रा सुरू झाली. ती मराठा मैदान येथे आली. तेथे कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, अ‍ॅड. विलास पाटणे, माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने, जावेद होडेकर, डॉ. विवेक भिडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय यादवराव यांनी या पक्षविरहित विकास यात्रेचा उद्देश सांगितला. कोकणाची अर्थव्यवस्था, हापूस आंबा, मच्छीमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. गेली अनेक वर्षे कोकणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येथील स्थानिक माणसांना उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी हापूस आणि काजूसाठी ५०० कोटी रुपये, मत्स्य विकासासाठी ५०० कोटी रुपये, तर पर्यटनासाठी १ हजार कोटी रुपये शासनाने कोकणाकरिता १० वर्षांकरिता उपलब्ध करून द्यावेत. त्यातून कोकण समृद्ध होऊन शासनाला कराद्वारे मोठा निधी मिळेल. यासाठी आपण या आंदोलनाच्या रूपाने शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन शासनाच्या विरोधात नाही. परंतु महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणे कोकणाकडे इतक्या वर्षात पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिले गेले नाही. कोकण आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय व पर्यटनातून समृद्ध झाला तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्याची मोठी भर पडेल आणि कोकणी माणूसदेखील समृद्ध होईल.. थायलंडसारख्या भागात कोकणसारखे समुद्रकिनारे आहेत परंतु रत्नागिरीएवढ्या नसलेल्या भागात तेथील शासनाने किनारे पर्यटनाची हानी न करता विकसित केल्याने जगातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक तेथे जातात. कोकणात त्याच पद्धतीचे निसर्गसौंदर्य व कोकणची तशी क्षमता असूनही शासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. कोकण काजू महामंडळाची स्थापना होऊन ६-७ वर्षे झाली, तरी त्याकडे कोणताही निधी नाही. मत्स्य व्यवसाय परदेशी चलन देणारा व्यवसाय असूनही आवश्यक त्या प्रमाणात मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मच्छीमारांच्या अनेक प्रकल्पासाठी चेन्नई येथून परवानग्या घ्याव्या लागत आहेत. पर्यटनासाठी कोकण पर्यटन मंडळ स्थापन करून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यास त्यातून स्थानिक तरुण पर्यटन उद्योगात उतरू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या, सबसिडी आदी गोष्टी शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुळात पर्यटनाच्या बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या चांगल्या विद्यापीठाची गरज असून त्यासाठीदेखील शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. कोकण किनाऱ्यावर सीआरझेडचा बाऊ करून बांधकामे करण्यास परवानगी नाकारण्यापेक्षा त्यातच राहून परवानग्या कशा देता येतील असे सकारात्मक धोरण सरकारी अधिकाऱ्यांनी बाळगणे गरजेचे आहे. समृद्ध कोकणच्या वतीने आझाद मैदानात पुकारण्यात येणारे आंदोलन शासनाच्या विरोधात नसून शासनाने कोकणच्या बाबतीत धोरणे बदलावीत यासाठी आहे. यासाठी संपूर्ण कोकणातील संघटनांनी व कोकणप्रेमी नागरिकांनी एकत्र येणे जरुरीचे आहे, असेही यादवराव यांनी सांगितले. कोकणचा विकासासाठी बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख संजय यादवराव यांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी कोकणच्या पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा कणा असलेल्या हॉटेल व्यवसायासाठी स्थानिक प्रशिक्षित मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी कमी खर्चात स्थानिकांसाठी प्रशिक्षण निर्माण व्हावे, हॉटेल व्यावसायिकांसाठी लावण्यात येणारा व्यावसायिक वीज दर आणि १८ टक्के जीएटी यामुळे येथील हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. समृद्ध कोकणच्या वतीने कोकणसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून पाठिंबा द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी ग्रामीण पर्यटनावर आपले विचार व्यक्त केले. जावेद होडेकर यांनी मत्स्यविकास तसेच बावा साळवी आणि विवेक भिडे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातून उद्योजक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या विकास यात्रेमध्ये जिल्ह्यातील १०० विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग होता. योग्य नियोजनाने ही यात्रा यशस्वी करण्यात आली. परिषदेत आंबा, काजू, फणस, मासे आदींचे पूजन करण्यात आले. कोकणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
परिषदेनंतर संध्याकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
तारकर्ली, मालवण, श्रीवर्धन, पालघर आणि संपूर्ण कोकणासह आझाद मैदान (मुंबई) येथे कोकण रोजगार हक्क परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या २५ जून रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्ये आझाद मैदानावर कोकणातील सर्व जिल्ह्यांतील विविध क्षेत्रातील आंदोलक एकत्र येऊन आपली भूमिका शासनासमोर मांडणार आहेत.
.................
कोकण विकास यात्रेविषयीची चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/6iBLBjL8m50

Sunday, 16 June 2019

नियोजन, आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश शक्य : मधुलिका देवगोजी

रत्नागिरी : नियोजन, आत्मविश्वास आणि भक्कम कौटुंबिक पाठिंब्याच्या जोरावर इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १९० वे स्थान मिळविलेल्या मधुलिका देवगोजी ऊर्फ सौ. मधुलिका अक्षय कदम हिने केले.
रत्नागिरी : कबीर ॲकॅडमीतर्फे मधुलिका देवगोजी हिचा सत्कार करताना
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे. शेजारी मधुलिकाच्या मातोश्री 
सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, वडील विजय देवगोजी, कबीर ॲकॅडमीचे संचालक मोहन कबीर
येथील कबीर ॲकॅडमीतर्फे यूपीएससीमध्ये मधुलिकाचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते रविवारी (ता. १६ जून) करण्यात आला, त्यावेळी ती बोलत होती. तिने कबीर ॲकॅडमी आणि मार्गदर्शक संजीव कबीर यांचे प्रथम आभार मानले. हा माझा सन्मान नसून त्या परीक्षेचा आणि त्या पदाचा सन्मान आहे. स्पर्धापरीक्षेबाबत आपण मराठी माध्यमातून आल्याचा, तसेच ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड कोकणातील मुलांनी मनात अजिबात धरू नये, असे आवाहन तिने केले. मीही लांजा येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकले आहे, असे तिने आवर्जून सांगितले. त्यानंतर सहावीपासून दहावीपर्यंत तिने राजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. याच काळात साखरपा येथे कबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय,याची ओळख झाली. त्याचा तिला पुढे उपयोग झाला. अकरावी-बारावीसाठी ती पुण्यात गेली. त्यानंतर तिने टेलिकॉम इंजिनीअरिंग पूर्ण केले. दोन वर्षांच्या नोकरीनंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला मुलाखतीपर्यंतचे यश मिळाले. अंतिम परीक्षेत १९० गुण मिळाले. त्यामुळे तिला आयएएस होण्याची संधी मिळाली नाही. आयपीएससाठी तिची निवड झाली. मात्र त्याऐवजी तिने आयआरएस (इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा सारा प्रवास तिने उलगडला. ती म्हणाली, रत्नागिरी किनाऱ्यावर दहा वर्षांपूर्वी जहाज अडकले होते आणि त्यातून वायुगळती होत होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी ही परिस्थिती प्रशासकीय पातळीवर कशी हाताळली, हे पाहता आले. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांच्याशी थेट संवाद साधता आला. त्यांचे काम पाहिल्यानंतर मनात पक्के केले की आपणही स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय पातळीवर काम करायचे. यूपीएससी परीक्षा म्हणजे सायकॉलॉजीकल गेम आहे. यासाठी नियोजन, प्लॅन बी तयार असणे, आत्मविश्वास आणि कौटुंबिक आधार या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. मुलींसाठी लग्न ही गोष्ट अडसर नव्हे तर योग्य वर मिळाल्यास सपोर्ट सिस्टीमही ठरू शकते. त्यामुळे कोकणातील अधिकाधिक मुलांनी या परीक्षा द्याव्यात, मुंबई, पुणे, दिल्लीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे अनेक वर्ग असतात. पण रत्नागिरीमध्ये कबीर अॅकॅडमीने तीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेथे योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मधुलिका देवगोजी हिने यावेळी केले.
दहावी-बारावीच्या परीक्षेत सतत आठ वर्षे राज्यात अव्वल असणाऱ्या कोकणातून स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, याकडे लक्ष वेधून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढ म्हणाले, कोकणात बुद्धिमत्तेचा अभाव नाही. इच्छाशक्ती आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. मुंबईत छोटा जॉब बघण्याचा आदर्श येथील मुलांसमोर आतापर्यंत राहिला आहे. आपल्या आसपास, परिसरात जे काही घडत असेल, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. मीसुद्धा एमबीबीएसचा अभ्यास सुरू असताना माझ्या मामेभावाची यूपीएससी परीक्षेसाठी चाललेली धडपड पाहत होतो. तिच्यापासून प्रेरणा घेऊन मी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात मला यश मिळाले. स्पर्धा परीक्षेत आपणही उत्तीर्ण होऊ शकतो, असा विश्वास देणारे मधुलिका देवगोजीसारखे अनेक आदर्श कोकणात वाढले, तर भविष्यात कोकणातूनही अनेक प्रशासकीय अधिकारी मिळतील. कबीर ॲकॅडमी स्पर्धापरीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून देत आहे, हे चित्र आशादायी आहे.
मधुलिकाला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आईवडिलांचाही यावेळी कबीर ॲकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वडील विजय देवगोजी यांनी सांगितले की, मधुलिकाने स्वतःला त्या कोषात गुरफटून घेतले. त्याच विषयातील मित्रमैत्रिणी जमवल्या. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. मीही स्पर्धापरीक्षा दिली होती पण योग्य मार्गदर्शन आम्हाला नव्हते. पण माझी इच्छा माझ्या मुलीने पूर्ण केली, असे भावनिक उद्गार मधुलिकाच्या आई सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी काढले.
राजेंद्र देवरूखकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले.
...........
मधुलिका देवगोजी हिने सांगितलेला अनुभव पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या सोबतच्या लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/SjNukLnGlq8


Friday, 7 June 2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकारांची सूची


कुडाळ : स्वरसिंधुरत्नर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील कलाकारांची सूची तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता गायन आणि वादन क्षेत्रातील सर्व कलाकारांनी आपली माहिती येत्या ३० जूनपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
      माहिती देताना कलाकाराचे संपूर्ण नाव, कलाप्रकार, तालुका, न्मतारीख, पूर्ण पत्ता, तालुक्यापासूनचे गावाचे अंतर, फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल नंबर, घरचा फोन नंबर, ई-मेल आयडी, सध्या राहत असलेले ठिकाण, गुरूचे नाव, संगीत क्षेत्रातील घराणे, संगीत शिक्षण किती वर्षे घेतले, वादक कलाकारांनी आतापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध गायकांना साथ केली, मिळालेल्या पुरस्कारांची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे, विशेष कार्यक्रमाचे स्थळ, कोणत्या संस्थेतर्फे विशेष कार्यक्र केले इत्यादी तपशील पाठवावा. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतरत्र राहणाऱ्या कलाकारांनीही ही माहिती पाठवावी.
      याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज सोबत दिला आहे. त्याची प्रिंट काढून घेऊन संपूर्णपणे भरलेला अर्ज खालील ठिकाणी पाठवावा –
श्री. प्रशांत प्रभाकर धोंड,
२२७५, प्रभाकर, मु. पो. शंकरवाडी (नवीवाडी),
पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६५२८
ईमेल - dhondprashantp11@gmail.com
श्री. धोंड यांच्याशी (०२३६२) २२२१६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९४२३३०९४३२ या मोबाइलवर संपर्क साधावा.
...............

Monday, 3 June 2019

पवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसिंधुरत्न पुरस्कार

कुडाळ : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या
स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पवन उमेश प्रभू, सुधांशु समीर
सोमण आणि अक्षय मंगेश जांभळे स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.
पवन उमेश प्रभू (कुडाळ)
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. त्यामधून प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन अशा एकूण २७ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेची दुसरी आणि अंतिम फेरी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ जून रोजी झाली. या स्पर्धेत शालेय गटातून पवन उमेश प्रभू (कुडाळ), महाविद्यालयीन गटातून सुधांशु समीर सोमण आणि खुल्या गटातून अक्षय मंगेश जांभळे (दोघेही देवगड) स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार मिळविणारे विजय गवंडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
सुधांशु समीर सोमण (देवगड)
स्वरसिंधुरत्न पुरस्कार हा स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता ही जिल्ह्यातील संगीत क्षेत्रासाठी एक चळवळ निर्माण करण्याचा मानस आहे, असे स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड यांनी आपल्या ऋणनिर्देशपर भाषणात सांगितले.
दरम्यान, तिन्ही पुरस्कारविजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच त्या तिघांच्याही गायनाचा कार्यक्रम १२ जुलै २०१९ रोजी वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळीच त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरमध्येही पुरस्कारविजेत्या तिघांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.........


अक्षय मंगेश जांभळे (देवगड)



स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गावडे, समृद्धी सावंत, धामापूरकर प्रथम

       
सावंतवाडी : स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेतील
सावंतवाडी केंद्रातील विजेत्यांसह परीक्षक
प्रदीप धोंड, बाळ आंबर्डेकर, प्रशांत धोंड, सतीश पाटणकर, अशोक प्रभू
सावंतवाडी : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तेजल गावडे, समृद्धी सावंत आणि नीतिन धामापूरकर यांनी सावंतवाडी केंद्रात पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. सावंतवाडीच्या केंद्राची सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांसाठीची स्पर्धा सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झाली. स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेते असे – गट पहिला (१२ वर्षांपर्यंत) - तेजल गावडे, गीता गवंडे, श्रेया केसरकर. गट दुसरा (१८ वर्षांपर्यंत) - समृद्धी सावंत, देवयानी केसरकर, विधिता केंकरे. गट तिसरा (खुला गट) - नीतिन धामापुरकर, सौ. सिद्धी परब, गीतेश कांबळे. पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५० आणि ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
...................

स्पर्धेतल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा -
https://youtu.be/98e6NDVisu0