रत्नागिरी : कोकणाच्या सर्वांगीण
आणि शाश्वत विकासासाठी अवघ्या दोन हजार कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद
करण्याची एकमुखी मागणी रत्नागिरीत आज भरलेल्या कोकण रोजगार हक्क परिषदेत करण्यात
आली.
गाऱ्हाणे घालून कोकण रोजगार हक्क परिषदेला प्रारंभ करण्यात आला. |
कोकणच्या मूलभूत
प्रश्नांवर पहिले कोकण रोजगार हक्क आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या २५ जून रोजी
मुंबईत आझाद मैदानात दिवसभराचे धरणे आंदोलनही छेडण्यात येणार आहे. त्याची
वातावरणनिर्मिती करण्यासाठी रत्नागिरीत आज कोकण विकास यात्रा आणि पहिली कोकण रोजगार
हक्क परिषद भरविण्यात आली. मनीऑर्डरच्या चौकटीतून बाहेर पडून कोकणाचा आंबा, मच्छी आणि पर्यटन या तीन प्रमुख अंगांनी विकास व्हावा आणि हीच मागणी राज्य
शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी राजापूर ते मंडणगड या रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही
टोकांपासून रत्नागिरीमध्ये जमलेल्या कोकणच्या भूमिपुत्रांनी भर कडाक्याच्या उन्हात
हातखंबा ते रत्नागिरी शहर अशी विकास यात्रा काढली. यात्रेचे नेतृत्व समृद्ध कोकण
संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी केले. यावेळी रत्नागिरीतील विविध
मान्यवरांच्या उपस्थितीत कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली, तर जिल्हाधिकाऱ्यांना विविध
मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोकणचा आवाज
पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
रत्नागिरीजवळच्या हातखंबा
येथे विविध क्षेत्रांतील भूमिपुत्र दुपारी एकत्र आले. तेथून विकास यात्रेला सुरुवात
झाली. यात्रेत संजय यादवराव, उदय लोध, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, प्रल्हाद वणजू, युयुत्सु आर्ते, विकास शेट्ये, सचिन शिंदे, पत्रकार सतीश कदम, मकरंद भागवत, हरिश्चंद्र देसाई यांच्यासह उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच
अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक सहभागी झाले. हातखंबा येथून
मोटरसायकल तसेच मोटारींनी ही यात्रा सुरू झाली. ती मराठा मैदान येथे आली. तेथे
कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.
श्रीरंग कद्रेकर, अॅड. विलास पाटणे, माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने, जावेद होडेकर, डॉ. विवेक भिडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय यादवराव
यांनी या पक्षविरहित विकास यात्रेचा उद्देश सांगितला. कोकणाची अर्थव्यवस्था, हापूस आंबा, मच्छीमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. गेली अनेक वर्षे
कोकणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करायचा
असेल तर येथील स्थानिक माणसांना उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी हापूस आणि काजूसाठी
५०० कोटी रुपये, मत्स्य विकासासाठी ५०० कोटी रुपये, तर पर्यटनासाठी १ हजार
कोटी रुपये शासनाने कोकणाकरिता १० वर्षांकरिता उपलब्ध करून द्यावेत. त्यातून कोकण
समृद्ध होऊन शासनाला कराद्वारे मोठा निधी मिळेल. यासाठी आपण या आंदोलनाच्या रूपाने
शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन शासनाच्या विरोधात नाही.
परंतु महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणे कोकणाकडे इतक्या वर्षात पाहिजे त्या
पद्धतीने लक्ष दिले गेले नाही. कोकण आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय व पर्यटनातून समृद्ध झाला तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात
त्याची मोठी भर पडेल आणि कोकणी माणूसदेखील समृद्ध होईल.. थायलंडसारख्या भागात
कोकणसारखे समुद्रकिनारे आहेत परंतु रत्नागिरीएवढ्या नसलेल्या भागात तेथील शासनाने
किनारे पर्यटनाची हानी न करता विकसित केल्याने जगातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक तेथे
जातात. कोकणात त्याच पद्धतीचे निसर्गसौंदर्य व कोकणची तशी क्षमता असूनही शासनाकडून
त्याकडे लक्ष दिले जात नाही. कोकण काजू महामंडळाची स्थापना होऊन ६-७ वर्षे झाली,
तरी त्याकडे कोणताही निधी नाही. मत्स्य व्यवसाय परदेशी चलन देणारा व्यवसाय असूनही आवश्यक
त्या प्रमाणात मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मच्छीमारांच्या
अनेक प्रकल्पासाठी चेन्नई येथून परवानग्या घ्याव्या लागत आहेत. पर्यटनासाठी कोकण
पर्यटन मंडळ स्थापन करून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यास
त्यातून स्थानिक तरुण पर्यटन उद्योगात उतरू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना आवश्यक
असणाऱ्या परवानग्या, सबसिडी आदी गोष्टी शासनाने उपलब्ध
करून देणे गरजेचे आहे. मुळात पर्यटनाच्या बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या चांगल्या विद्यापीठाची
गरज असून त्यासाठीदेखील शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. कोकण
किनाऱ्यावर सीआरझेडचा बाऊ करून बांधकामे करण्यास परवानगी नाकारण्यापेक्षा त्यातच
राहून परवानग्या कशा देता येतील असे सकारात्मक धोरण सरकारी अधिकाऱ्यांनी बाळगणे
गरजेचे आहे. समृद्ध कोकणच्या वतीने आझाद मैदानात पुकारण्यात येणारे आंदोलन
शासनाच्या विरोधात नसून शासनाने कोकणच्या बाबतीत धोरणे बदलावीत यासाठी आहे. यासाठी
संपूर्ण कोकणातील संघटनांनी व कोकणप्रेमी नागरिकांनी एकत्र येणे जरुरीचे आहे,
असेही यादवराव यांनी सांगितले. कोकणचा विकासासाठी बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण
राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे योगदान मोलाचे
असल्याचा उल्लेख संजय यादवराव यांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी विविध
मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी कोकणच्या
पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा कणा असलेल्या हॉटेल व्यवसायासाठी स्थानिक प्रशिक्षित
मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी कमी खर्चात स्थानिकांसाठी प्रशिक्षण
निर्माण व्हावे, हॉटेल व्यावसायिकांसाठी लावण्यात येणारा व्यावसायिक वीज दर आणि १८
टक्के जीएटी यामुळे येथील हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी
व्यक्त केले. समृद्ध कोकणच्या वतीने कोकणसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्वांनी
पक्षभेद विसरून पाठिंबा द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
उदय बने यांनी ग्रामीण पर्यटनावर आपले विचार व्यक्त केले. जावेद होडेकर यांनी
मत्स्यविकास तसेच बावा साळवी आणि विवेक भिडे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त
केले. यावेळी जिल्ह्यातून उद्योजक, विविध संघटनांचे
पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या विकास यात्रेमध्ये जिल्ह्यातील
१०० विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील
प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग होता. योग्य नियोजनाने ही यात्रा यशस्वी करण्यात आली.
परिषदेत आंबा, काजू, फणस, मासे आदींचे पूजन करण्यात आले. कोकणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
परिषदेनंतर
संध्याकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
तारकर्ली, मालवण, श्रीवर्धन, पालघर आणि संपूर्ण कोकणासह आझाद मैदान (मुंबई) येथे कोकण
रोजगार हक्क परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या २५ जून रोजी सकाळी १० ते
रात्री ८ या वेळेमध्ये आझाद मैदानावर कोकणातील सर्व जिल्ह्यांतील विविध
क्षेत्रातील आंदोलक एकत्र येऊन आपली भूमिका शासनासमोर मांडणार आहेत.
.................
कोकण विकास यात्रेविषयीची चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा -
https://youtu.be/6iBLBjL8m50
कोकण विकास यात्रेविषयीची चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा -
https://youtu.be/6iBLBjL8m50
No comments:
Post a Comment