Monday 3 June 2019

पवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसिंधुरत्न पुरस्कार

कुडाळ : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या
स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पवन उमेश प्रभू, सुधांशु समीर
सोमण आणि अक्षय मंगेश जांभळे स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.
पवन उमेश प्रभू (कुडाळ)
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. त्यामधून प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन अशा एकूण २७ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेची दुसरी आणि अंतिम फेरी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ जून रोजी झाली. या स्पर्धेत शालेय गटातून पवन उमेश प्रभू (कुडाळ), महाविद्यालयीन गटातून सुधांशु समीर सोमण आणि खुल्या गटातून अक्षय मंगेश जांभळे (दोघेही देवगड) स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार मिळविणारे विजय गवंडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
सुधांशु समीर सोमण (देवगड)
स्वरसिंधुरत्न पुरस्कार हा स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता ही जिल्ह्यातील संगीत क्षेत्रासाठी एक चळवळ निर्माण करण्याचा मानस आहे, असे स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड यांनी आपल्या ऋणनिर्देशपर भाषणात सांगितले.
दरम्यान, तिन्ही पुरस्कारविजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच त्या तिघांच्याही गायनाचा कार्यक्रम १२ जुलै २०१९ रोजी वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळीच त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरमध्येही पुरस्कारविजेत्या तिघांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.........


अक्षय मंगेश जांभळे (देवगड)



No comments:

Post a Comment