Sunday, 16 June 2019

नियोजन, आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश शक्य : मधुलिका देवगोजी

रत्नागिरी : नियोजन, आत्मविश्वास आणि भक्कम कौटुंबिक पाठिंब्याच्या जोरावर इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १९० वे स्थान मिळविलेल्या मधुलिका देवगोजी ऊर्फ सौ. मधुलिका अक्षय कदम हिने केले.
रत्नागिरी : कबीर ॲकॅडमीतर्फे मधुलिका देवगोजी हिचा सत्कार करताना
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे. शेजारी मधुलिकाच्या मातोश्री 
सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, वडील विजय देवगोजी, कबीर ॲकॅडमीचे संचालक मोहन कबीर
येथील कबीर ॲकॅडमीतर्फे यूपीएससीमध्ये मधुलिकाचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते रविवारी (ता. १६ जून) करण्यात आला, त्यावेळी ती बोलत होती. तिने कबीर ॲकॅडमी आणि मार्गदर्शक संजीव कबीर यांचे प्रथम आभार मानले. हा माझा सन्मान नसून त्या परीक्षेचा आणि त्या पदाचा सन्मान आहे. स्पर्धापरीक्षेबाबत आपण मराठी माध्यमातून आल्याचा, तसेच ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड कोकणातील मुलांनी मनात अजिबात धरू नये, असे आवाहन तिने केले. मीही लांजा येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकले आहे, असे तिने आवर्जून सांगितले. त्यानंतर सहावीपासून दहावीपर्यंत तिने राजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. याच काळात साखरपा येथे कबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय,याची ओळख झाली. त्याचा तिला पुढे उपयोग झाला. अकरावी-बारावीसाठी ती पुण्यात गेली. त्यानंतर तिने टेलिकॉम इंजिनीअरिंग पूर्ण केले. दोन वर्षांच्या नोकरीनंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला मुलाखतीपर्यंतचे यश मिळाले. अंतिम परीक्षेत १९० गुण मिळाले. त्यामुळे तिला आयएएस होण्याची संधी मिळाली नाही. आयपीएससाठी तिची निवड झाली. मात्र त्याऐवजी तिने आयआरएस (इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा सारा प्रवास तिने उलगडला. ती म्हणाली, रत्नागिरी किनाऱ्यावर दहा वर्षांपूर्वी जहाज अडकले होते आणि त्यातून वायुगळती होत होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी ही परिस्थिती प्रशासकीय पातळीवर कशी हाताळली, हे पाहता आले. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांच्याशी थेट संवाद साधता आला. त्यांचे काम पाहिल्यानंतर मनात पक्के केले की आपणही स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय पातळीवर काम करायचे. यूपीएससी परीक्षा म्हणजे सायकॉलॉजीकल गेम आहे. यासाठी नियोजन, प्लॅन बी तयार असणे, आत्मविश्वास आणि कौटुंबिक आधार या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. मुलींसाठी लग्न ही गोष्ट अडसर नव्हे तर योग्य वर मिळाल्यास सपोर्ट सिस्टीमही ठरू शकते. त्यामुळे कोकणातील अधिकाधिक मुलांनी या परीक्षा द्याव्यात, मुंबई, पुणे, दिल्लीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे अनेक वर्ग असतात. पण रत्नागिरीमध्ये कबीर अॅकॅडमीने तीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेथे योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मधुलिका देवगोजी हिने यावेळी केले.
दहावी-बारावीच्या परीक्षेत सतत आठ वर्षे राज्यात अव्वल असणाऱ्या कोकणातून स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, याकडे लक्ष वेधून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढ म्हणाले, कोकणात बुद्धिमत्तेचा अभाव नाही. इच्छाशक्ती आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. मुंबईत छोटा जॉब बघण्याचा आदर्श येथील मुलांसमोर आतापर्यंत राहिला आहे. आपल्या आसपास, परिसरात जे काही घडत असेल, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. मीसुद्धा एमबीबीएसचा अभ्यास सुरू असताना माझ्या मामेभावाची यूपीएससी परीक्षेसाठी चाललेली धडपड पाहत होतो. तिच्यापासून प्रेरणा घेऊन मी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात मला यश मिळाले. स्पर्धा परीक्षेत आपणही उत्तीर्ण होऊ शकतो, असा विश्वास देणारे मधुलिका देवगोजीसारखे अनेक आदर्श कोकणात वाढले, तर भविष्यात कोकणातूनही अनेक प्रशासकीय अधिकारी मिळतील. कबीर ॲकॅडमी स्पर्धापरीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून देत आहे, हे चित्र आशादायी आहे.
मधुलिकाला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आईवडिलांचाही यावेळी कबीर ॲकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वडील विजय देवगोजी यांनी सांगितले की, मधुलिकाने स्वतःला त्या कोषात गुरफटून घेतले. त्याच विषयातील मित्रमैत्रिणी जमवल्या. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. मीही स्पर्धापरीक्षा दिली होती पण योग्य मार्गदर्शन आम्हाला नव्हते. पण माझी इच्छा माझ्या मुलीने पूर्ण केली, असे भावनिक उद्गार मधुलिकाच्या आई सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी काढले.
राजेंद्र देवरूखकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले.
...........
मधुलिका देवगोजी हिने सांगितलेला अनुभव पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या सोबतच्या लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/SjNukLnGlq8


No comments:

Post a Comment