पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दर्शन .......................................................................... |
रत्नागिरी : रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगचा डायव्हिंग
पॉइंट आता मिऱ्याऐवजी रत्नागिरीच्या पांढरा समुद्र भागात स्थलांतरित करण्यात आला आहे.
त्यामुळे डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या शांत किनाऱ्यावरील जीवन आणि
वैविध्याचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच त्या भागातील पर्यटनाच्या विकासालाही चालना
मिळणार आहे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी
पांढरा समुद्र हे रत्नागिरीचे गजबजणारे पर्यटनस्थळ होते. मात्र त्या भागात सुकत घातली
जाणारी मासळी आणि धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामामुळे पांढरा समुद्र हे ठिकाण रत्नागिरीच्या
पर्यटनाच्या नकाशावरून पुसले गेले. मात्र आता पुन्हा येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न
सुरू झाले आहेत. मासळी सुकविण्याचे केंद्र मिरजोळे येथे स्थलांतरित करण्यात आला आहे.
शिवाय हर्षा स्कुबा डायव्हिंग या संस्थेने मिऱ्या गावातून आपला डायव्हिंग पॉइंट पांढऱ्या
समुद्रकिनाऱ्यावर हलविला आहे.
पांढरा समुद्र भागातील
समुद्र खूप शांत आहे. या भागातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पांढऱ्या वाळूमुळे या किनाऱ्याला
पांढरा समुद्र असे म्हटले जाते. सागरी आक्रमणामुनळे या किनाऱ्याची धूप होऊ नये, तेथे टेट्रॉपॉडचा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे
थेट समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येत नाहीत. परिणामी हा किनारा सुरक्षित झाला आहे.
या भागात पार्किंगची सुविधा असून स्थानिकांनी पर्यटकांसाठी विविध स्टॉल थाटले आहेत.
लवकरच त्या भागात प्रशस्त रस्ताही होणार आहे. या किनाऱ्यावरील मुरूगवाडा, पंधरा माड येथील लोक विकासासाठी एकत्र आले आहेत. स्थानिकांनी
एकत्र येऊन येथे स्टॉल मांडले आहेत. स्वच्छता केली आहे. स्कूबा डायव्हिंग पॉइंटमुळे
या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांना या परिसरातील विविध प्रकारचे
मासे व प्रवाळ पाहण्याची संधी मिळते. किनाऱ्यावर हजारो प्रकारचे शंख, शिंपले आढळतात. सात फूट लांबीच्या पंखाचा पसारा लाभलेल्या समुद्री
गरुडाचे दर्शन या परिसरात होते. ब्राह्मणी घार, छोटे पक्षी तसेच व्हिंब्रेल, रेड शांक, ग्रीन शांक, प्लोवर, वेस्टर्न रिफ हेरॉन यासारखे अनेक स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला
मिळतात. रत्नदुर्ग किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे उत्तरेला पांढर्यास समुद्रावरील वाळूचा
किनारा आहे. नारळी पौर्णिमेच्या मागे-पुढे पंधरा दिवस हा किनारा एका वेगळ्याच रूपात
सजतो. रंगीबेरंगी शंख-शिंपल्यांनीही किनारा सजतो. पाऊल ठेवायलाही जागा नसते. हे शंख-शिंपले
न्याहाळणे म्हणजे आनंददायी क्षण असतो. समुद्राच्या पूर्वेला काही अंतरावर मोठे कांदळवन
असून त्यात जैवविविधता पद्धतीने अनुभवता येते. या खाजणात ऑक्टोपसचे दर्शनही होते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी दिली.
पांढऱ्या
समुद्रकिनारी वाळू पायाला फार चिकटत नाही. रत्नदुर्ग किल्ला, दुर्मिळ औषधी वनस्पतींनी युक्त मिऱ्या डोंगर, शंखशिंपले, कांदळवनातील जैवविविधता, मत्स्यालय अशी पर्यटकांना आवडणारी अनेक स्थळे या किनाऱ्यावर
असल्याने पांढरा समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
.............
रत्नागिरीतील हर्षा स्कुबा डायव्हिंगच्या पांढऱ्या
समुद्रावरील डायव्हिंग पॉइंटवरून समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर घडणारे
समुद्राखालील सृष्टीचे दर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
.................
...............
हर्षा स्कुबा डायव्हिंगसाठी संपर्क - ७७१९९०५५३३, ९८२२२९०८५९
..........................