Friday 10 August 2018

मठच्या लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात रविवारपासून श्रावणोत्सव


      लांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात दर रविवारी श्रावणोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या रविवारपासून (ता. १२ ऑगस्ट) श्रावणातील पहिल्या रविवारी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी श्रावण महिन्यात पाच रविवार येणार आहेत. शेवटचा रविवार ९ सप्टेंबर रोजी आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारले आहे. म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. यावर्षी करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराचे कलशारोहण झाले. मंदिरात नित्यविधी सुरू आहेत. श्रावणातील रविवारची पल्लीनाथी उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्याकरिता दर रविवारी पूजा, अभिषेक, लघुरुद्र आणि महारुद्र तसेच पवमान अभिषेक केला जाणार आहे. कुलोपासकांनी धार्मिक विधींसाठी शशिकांत गुण्ये, सुधाकर चांदोरकर किंवा संस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रेषक – सुधाकर चांदोरकर, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी. फोन - 9422646765

No comments:

Post a Comment