Monday, 21 May 2018

रत्नागिरीत घ्या स्कुबा डायव्हिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद


पर्यटन क्षेत्राला गती देणारा स्कुबा डायव्हिंगचा थरार आता रत्नागिरीतही अनुभवायला मिळू लागला आहे. हर्षा स्कुबा डायव्हिंगने गेल्या डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा फायदा अवघ्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी घेतला आहे. स्कुबा डायव्हिंगच्या केंद्रामुळे रत्नागिरीचे नाव पर्यटनाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर पोहोचले आहे. आता हर्षातर्फे मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर डव्हेंचर स्पोर्ट्सचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.
.............

      लहान रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे सारख्याच रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे, रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणारे मासे, सुंदर मखमली रंगांच्या शिंपल्यांचा खच... पाण्याखालचे हे स्वच्छंदी जग न्याहाळायला मिळाले तर? अवतीभवती रंगीबिरंगी मासे फिरताहेत. मध्येच एखादे छोटेसे कासव नजरेसमोरून जात आहे. एरवी सहजासहजी न दिसणारे दगडगोटे नजरेस पडताहेत. पाण्याच्या खाली असलेल्या या स्वप्नवत दुनियेची सफर करण्यासाठी लोक स्कुबा डायव्हिंग करतात. अंदमान-निकोबार, गोवा आणि सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीतही स्कुबा डायव्हिंग सुरू झाले आहे.
      निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सतत वेगळे काही करण्याचा जणू छंदच असलेल्या रत्नागिरीतील मैत्री गमुपने त्यासाठी पुढाकार घेतला आणि वर्षभर पाठपुरावा करून हर्षा स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात यश मिळविले. अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात नेमके काय दडले आहे, समुद्रातील जीवसृष्टी कशी असते, याचे कुतूहल आता रत्नागिरीला येणार्‍या पर्यटकांना आणि अर्थातच समुद्राच्या कुशीत राहणार्‍या रत्नागिरीकरांनाही शमवता येणार आहे.
      मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, कांचन आठल्ये आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रत्नागिरीत ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी केटरिंग सर्व्हिस, हर्षा गार्डन हॉटेल, अंबर हॉल, मराठा रेसिडेन्सी हे शाही हॉटेल, मांडवी समुद्रकिनाऱ्यावर नव्यानेच सुरू केलेले सी फॅन्स हॉटेल अशा विविध उद्योगांमधील वैविध्यपूर्ण अनुभव घेतानाच मैत्री गमुपला बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या गरजा समजू लागल्या. याच दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मैत्री गमुपचे चौघे जण मुंबईत भरलेल्या टूर एक्झिबिशनला गेले होते. तेथे कोकणाची टूर चालवणारे कोणीही नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरी हेच पर्यटकांचे डेस्टिनेशन व्हावे, असे ध्येय मनाशी बाळगून त्या चौघांनी हर्ष हॉलिडेज नावाने टूर कंपनी सुरू केली. पर्यटक येथे आले पाहिजेत आणि थांबले पाहिजेत यासाठी रत्नागिरीच्या संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देणार्‍या काही योजना आखल्या. गणेशोत्सवादरम्यान केरळ येथून काही पर्यटक आले होते. त्यांना रत्नागिरीतील काही घरांमध्ये नेऊन आरती, नैवेद्य, अन्न यांची माहिती दिली. या सहलीचा त्यांनी खूप आनंद लुटला; मात्र हे सर्व करत असताना अजूनही काहीतरी कमी आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. काही अनुभवी सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरीत समुद्र असूनही, संबंधित साहसी खेळांची सुविधा नसल्याने आलेले पर्यटक येथे थांबत नाहीत, ही बाब समोर आली. गोव्यानंतर कोकणाला महत्त्व देणारे पर्यटक रत्नागिरीपेक्षाही सिंधुदुर्गात मालवण, तारकर्ली परिसराकडे अधिक आकर्षित होतात, याचीही नोंद करण्यात आली. सुमारे दहा वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसारखे साहसी समुद्री खेळ सुरू झाले, हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यावर चर्चा आणि विचारविनिमय करतानाच रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंग सुरू केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यातूनच रत्नागिरीच्या हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला जन्म झाला. त्यासाठी तारकर्ली येथील सारंग कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. स्कुबा डायव्हिंगसाठी नेमकी ठिकाणे शोधण्यासाठी गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी पाहणी झाली. रत्नागिरीच्या परिसरात भाट्ये, कुर्ली, भगवती बंदर, गणपतीपुळे, गणेशगुळे ते गणपतीपुळे-तिवरी बंदरपर्यंत सर्व ठिकाणे तपासली आणि हवी तशी जागा जाकीमिर्‍या-अलावा येथे सापडली. अलावा येथे खडकाळ भाग असून स्वच्छ व शांत किनारा आहे. भरपूर प्रवाळ, मासे असून सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे याच ठिकाणाची निवड करण्यात आली. लाखो रुपये खर्चून हा प्रकल्प अखेर कार्यान्वित झाला आणि रत्नागिरीला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे. डायव्हिंगची सोय रत्नागिरीत नसल्याने अनेक रत्नागिरीकरही परदेशांमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत होते. आता पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू झाल्याने रत्नागिरीत पर्यटक खूष होईल आणि समुद्रातील अंतरंग अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने येईल, अशी अपेक्षा आहे. ती पहिल्या दोन महिन्यांत सुमारे दीड ते दोन हजार पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंग करून पूर्ण केली आहे.
      रत्नागिरीजवळच्या जाकीमिर्‍या-पाटीलवाडी येथे स्कुबा डायव्हिंग सेंटरचा लँडिंग पॉइंट आहे. तेथून बोटीने अलावा येथे जाण्यास 7 मिनिटे लागतात. बोटीतून जातानाच पर्यटक मिर्‍याचे निसर्गसौंदर्य पाहून तृप्त होऊन जातो. तेथे डायव्हिंग पॉइंट आहे. बारा वर्षांपासून अधिक वयाच कोणीही डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो. त्याकरिता पोहायला येण्याची गरज नाही. डायव्हिंग करण्यापूर्वी सर्व माहितीचा अर्ज भरून घेतला जातो. काही आजार, डॉक्टर्सचे मोन नंबर्स आदी माहिती घेतली जाते. तसेच प्रवाशांना डायव्हिंग कसे करावे याची परिपूर्ण माहिती दिली जाते. स्विमर्सचा गॉगल लावून समुद्रात जावे लागत असल्यामुळे तोंडाने श्वास कसा घ्यावा, सोडावा याची माहिती दिली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेब सूट परिधान करून व ऑक्सिजनचा सिलिंडर पाठीला लावून समुद्रात उतरायचे. तेथे काही मिनिटे सराव करून घेतला जातो. गाइडचे पूर्ण लक्ष पर्यटकांवर असते. पाण्याखाली बोलता येत नसल्याने खुणांनी ते वारंवार विचारतात व श्वास घेताना त्रास जाणवल्यास तत्काळ पाण्याच्या वर घेऊन येतात. उत्तम डायव्हर्समुळे समुद्री जीवन अगदी जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होते. तेथे अनेक प्रकारचे मासे, प्रवाळ, वनस्पती आणि समुद्री जीव ही सारी अद्भुत दुनिया समुद्रात खोलवर जाऊन पाहताना पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे मिटते.
      हर्षा स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख महेश शिंदे हे मरीन इंजिनियर असून चीनमध्ये बोटी बांधण्याच्या व्यवसायात ते होते. ते म्हणाले की, सध्या आमच्याकडे तारकर्ली येथून प्रशिक्षण घेतलेले आणि पॅडी (प्रोमेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्टिफाइड असलेले उमेश डोके, अजिम मुजावर, जितेंद्र शिरसेकर, अबमाव रॉड्रिक्स, प्रेमानंद पराडकर, विजय कोळंबकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहा डायव्हर्स आहेत. प्रत्येक पर्यटकासोबत एक डायव्हर असतो. हे डायव्हर्स आपत्कालीन वैद्यकीय सेवाही देऊ शकतात. वेगवेगळ्या 30 प्रकारच्या व्यक्तींना होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा वेब सूट उपलब्ध आहेत. डायव्हिंगसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही वेळ उत्तम असते. अर्थातच पावसाळा, वादळ इत्यादी नैसर्गिक बदलांच्या काळात डायव्हिंग करता येत नाही.
      हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साखर खामेला माणूस या नाटकाच्या चमूसोबत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले, पॅडी कांबळे यांनीही रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. अचलपूर (अमरावती) येथील आमदार बच्चू कडू रत्नागिरीच्या समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेऊन गेल्यानंतर अमरावती, वर्धा, बुलडाणा इत्यादी भागातूनही चौकशी होऊन तेथून पर्यटक येऊ लागले आहेत. त्यांच्यासह सर्वच पर्यटकांना प्रवास, निवास आणि भोजनासह विविध सुविधा मैत्री गमुपकडून पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी खास पन्नास टक्के सवलत दिली जात आहे.
      इतर भागात प्रसिद्धी झाल्यानंतर बाहेरचे पर्यटक रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद आवर्जून घेत आहेत. स्थानिक लोकांनी एकदा तरी हा आनंद लुटायला हवा. स्वतः अनुभव घेऊन तो इतरांना सांगितला, तर त्याचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल. पर्यटनाला आल्यावर रत्नागिरीत वेगळे आहे काय आहे, असा प्रश्न पडणार्‍या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग असे उत्तर आता द्यायला हरकत नाही.
............

जिल्हाधिकार्‍यांचे प्रोत्साहन
      जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू करायला प्रोत्साहन दिले. रत्नागिरी नगरपालिका प्रशासन, मेरिटाइम बोर्ड यांचेही संपूर्ण सहकार्य लाभलेच, पण स्थानिक नागरिक, जाकीमिर्‍या ग्रामपंचायतीचेही विशेष प्रोत्साहन मिळाले. प्रकल्प सुरू झाल्यामुळे पाच-सहा कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर मिर्‍या गावात वर्दळ वाढल्याने महिला बचत गट, स्थानिक हॉटेल्सचा व्यवसाय होऊ लागला, हीसुद्धा जमेची बाजू आहे. हर्षातर्फे आता नाइट स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंगसह धाडसी खेळही मिर्‍या, अलावा परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळेही पर्यटकांचा रत्नागिरीकडे ओढा वाढेल. स्थानिकांना स्कुबाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
..........

रोजगाराच्या अनेक संधी

      स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याचीच ही काही उदाहरणे. मालवणचा भूषण परब हा तरुण तारकर्लीत गाइड म्हणून काम करतो. भूषणच्या घरची परिस्थिती बेताची होती. पण त्यावर मात करत या तरुण ओपन वॉटर (18 मीटर), अ‍ॅडव्हान्स ओपन वॉटर (30 मीटर), रेस्क्यू डायव्हर या प्रकारच्या डायव्हिंगचे धडे घेतले. त्यानंतर मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग या ठिकाणी तो डायव्हिंगमधला मार्गदर्शक म्हणून काम करतो.
      बारावीनंतर फुड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणारा मालवणचाच सूरज भोसले स्कुबा डायव्हिंगचे धडे देतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यासाठी जिद्दीने तो मेहनत करत आहे. गोव्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे त्याने तेथेच काम केले. लहानपणापासून पोहण्याची आवड होती. त्याचा करिअरसाठी उपयोग झाला. परदेशात नोकरीची संधी मिळाली होती, पण भारतातच राहून काम करायची त्याची इच्छा तो पूर्ण करतो आहे.
      ड्राय डॉकमध्ये बोटी आणून दुरुस्त करताना लाखो रुपये खर्च करावा लागतो. त्याऐवजी समुद्रात बोट असताना पाण्याखाली जाऊन म्हणजे स्कुबा डायव्हिंग करून बोट दुरुस्त करण्याचे काम कमी खर्चात होते. हे कौशल्याचे काम असते. आता रत्नागिरीमध्येही असे काम हर्षाचे डायव्हर्स करू शकतात. रत्नागिरीत प्रथमच अशी सुविधा देण्यात येत असल्याने कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे प्रशिक्षण घेण्याची आणि त्यातून रोजगाराची नवी संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे.
.........

अनुभवाचे बोल...

अजब गजब दुनियेची सफर...
      दिल तो बच्चा है जीमच्या प्रयोगाच्या निमित्ताने रत्नागिरीला आमची टीम गेली होती. त्यावेळी मिर्‍या बीचवरील हर्षा स्कुबा डायव्हिंगवाल्यांनी एक कायमचा अविस्मरणीय अनुभव दिला. स्कुबा डायव्हिंगबद्दल ऐकून होतो. पण दर वेळी काही ना काही कारणाने मिस व्हायचं. शेवटी तो योग हर्षाच्या निमित्ताने जुळून आला. पाण्याखालच्या एका वेगळ्याच अजब गजब दुनियेची सफर केली. एवढी रंगीबेरंगी दुनिया तर आता जमिनीवर पण नाही राहिली .... आणि मुळात कौतुक करेन ते हर्षा स्कुबा डायव्हिंगचे. उत्तम अशी वेल इक्विप्ड सगळी साधनसामग्री, अतिशय उत्कृष्ट वेल ट्रेण्ड डायव्हर्स, जे तुमच्या सुरक्षिततेचा विचार करतातच पण त्यासोबत उत्तम अशी माहितीसुद्धा देतात.... संपूर्ण स्टाफही जिभेवर जवळ जवळ साखर ठेवूनच असावेत असा....  रत्नागिरीला गेलात तर नक्की अनुभव घ्या.
- प्रसाद खांडेकर

* समुद्राखालील अनोखी दुनिया प्रथमच पाहिली. असंख्य प्रकारचे लहान, मोठे मासे पाहिले आणि खूपच आनंद झाला. रत्नागिरीकरांनी स्कूबा डायव्हिंग करून हा आनंद घ्यावा.
- शौनक मुळ्ये
(वय वर्षे 12)
.....................

आता साहसी खेळांचा थरार
      तरुणाईचे साहसी खेळांचा थरार अनुभवण्याचे वेड लक्षात घेऊन Harsha Adventure Park च्या प्रयत्नाने मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत प्रगल्भतेने कॅम्पिंग साइट विकसित करण्यात आली आहे.
      अॅडव्हेंचरचा अविभाज्य भाग असलेले रोप क्टिव्हिटी, ऑब्स्टॅकल्स, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, तिरंदाजी, झोर्बिंग बॉल इत्यादी विविध साहसी ११ क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
      अॅडव्हेंचर हे नुसते शारीरिक परिश्रमाचे किंवा सुदृढ मानसिकतेची परीक्षा घेणारे माध्यम राहिलेले  नाही. मुलांना पिकनिक स्पॉटवर नेण्यापेक्षा दोन दिवसांच्या अॅडव्हेंचर पार्कला पाठवणेसुद्धा योग्य आहे. पूर्वी जमिनीवरील साहस खेळांपुरत्या मर्यादित असलेल्या अॅडव्हेंचरला आता वेगळी दिशा मिळाली आहे. मिऱ्या बंदरावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरीतील नामवंत जिद्दी माउंटेनीअरिंगचे प्रमुख धीरज पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे क्रीडाप्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
.................
हर्षाचा आस्वाद घेण्यासाठी...

संपर्क ः 9099025533
हर्षा हॉलिडेज - 9619246419
सुहास ठाकुरदेसाई - 9822290859
कौस्तुभ सावंत - 9822988080
..........
(डव्हेंचर स्पोर्ट्सकरिता संपर्क – धीरज पाटकर - ८३९०७६४४६४)

डव्हेंचर स्पोर्ट्सविषयी अधिक माहितीसाठी कोकण मीडियाच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/tXuxFVj4M2g
....................
(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक कोकण मीडिया, ता. ३ मार्च २०१८)
………

























Friday, 11 May 2018

वानरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपकरण



      लांजा :  वानर आणि माकडांना पळवून लावून शेतीचे संरक्षण करणारे घरगुती उपकरण सूर्यकांत गणेश पंडित ऊर्फ राजू पंडित या साटवली (ता. लांजा) येथील तरुण शेतकऱ्याने तयार केले आहे. घरच्या घरी तयार केलेल्या या उपकरणाचा चांगला फायदा झाल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.
      कोकणात अलीकडे वानर आणि माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी वानरमारे नावाची जमात वानरांना आपल्या तिरकमठ्याने मारत असे. नंतर वानरांना मारण्यावर कायद्याने बंदी आली. वानरमाऱ्यांची जमातही रोजगाराच्या इतर उद्योगांमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची भटकंती बंद झाली. त्यामुळे वानरांची हत्या थांबली.
दरम्यानच्या काळात जंगतोडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वानरांसह अनेक प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. परिणामी वानरांचा मानवी वस्तीकडचा राबता वाढला. नारळीपोफळीसह सर्वच फळांची लागवड आणि भाजीपाल्याची नासधूस त्यांनी सुरू केली. एखाद्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर बसावेत, अशा पद्धतीने वानरांच्या टोळ्या भाजीपाल्याच्या पिकांमध्ये वावरू लागल्या. त्यांचा बंदोबस्त करणे जिकिरीचे बनले. शेतीच्या रक्षणासाठी बंदुकांचे परवाने दिले जात असले, तरी ते सरसकट मिळत नाहीत. शिवाय त्यांचा वापर करून वानरांना मारणे हा गुन्हा ठरविला गेला. त्यामुळे हाकारणे, फटाके वाजविणे, डबे वाजविणे, आरडाओरडा करून त्यांना हाकलणे एवढेच हाती राहिले.
मोठ्या आवाजाला वानरे घाबरतात, हे लक्षात घेऊन राजू पंडित यांनी एक उपकरण तयार केले आहे. वानरांना पळवून लावण्यासाठी आवाज करणारे एक यांत्रिक उपकरण एका प्रदर्शनात पाहिल्यानंतर राजू पंडित यांना असे उपकरण स्वतःच तयार करण्याची कल्पना सुचली. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाइपचा वापर करून ते तयार करण्यात आले आहे. या पाइपची बंदुकीसारखी विशिष्ट रचना करण्यात आली आहे. त्याला घरगुती गॅस पेटविण्याचा लायटर बसविण्यात आला आहे. बंदुकीच्या नळकांड्याच्या बाजूने कांदा किंवा बटाटा आत खोलवर बसवायचा. त्यानंतर लायटरची ठिणगी जेथे पडते, तेथे परफ्युमसारख्या गॅसच्या बाटलीतून थोड्याशा गॅसची फवारणी करायची आणि तो कप्पा बंद करून बंदूक दूरवर रोखायची. त्यानंतर लायटरचे बटन दाबून ठिणगी पाडायची. ठिणगी पडताच कांदा-बटाटा साधारणतः तीस मीटर अंतरापर्यंत दूरवर उडून जातो. जाताना तो मोठा आवाज करतो. या आवाजाने वानर उडून जातात. काही तास तरी ते परत येत नाहीत, असा अनुभव राजू पंडित यांनी घेतला आहे.
हे उपकरण तयार करायला एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे श्री. पंडित यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर घरच्या घरी हे उपकरण तयार करता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी राजू पंडित यांचा संपर्क क्रमांक - 9422322075
..............
उपकरणाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या खालील यूट्यूब चॅनेलवर क्लिक करा.


Monday, 7 May 2018

सलील कुलकर्णी, विक्रम गोखले, मनोज कोल्हटकर, वैभव मांगले इत्यादींनी गौरविलेले ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट


     रत्नागिरी - समुद्राचे निळेशार पाणी, सुरक्षित विस्तीर्ण किनारा, लाटांची गाज अशा अल्हाददायक वातावरणात मालगुंडच्या किनार्‍यावर वसलेले ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट‘. गणपतीपुळ्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नारळी, पोफळींच्या बागेतील या रिसॉर्टमध्ये जेवण आणि वास्तव्य कोणालाही आवडेल. ट्रँक्विलिटी या शब्दाचाच अर्थच मुळी मनःशांती असा आहे. या मनःशांतीचा लाभ आणि ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमधील जेवण आणि व्यवस्था अनुभवलेले गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, ज्येष्ठ सिनेकलावंत विक्रम गोखले, मनोज कोल्हटकर, विनोदी अभिनेता वैभव मांगले आदी अनेक कलावंतांनी आपले अभिप्राय देऊन गौरविले आहे.
                येथील रुचकर डिशेस, आरामदायी निवास व्यवस्था. आतिथ्यशील सेवा आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे दर यामुळे याठिकाणी एकदा आलेला यात्री दरवर्षी सुटीमध्ये याच ठिकाणी येणे पसंत करतो. संचालिका डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्या उत्तम व्यवस्थापनाखाली चालविल्या जाणाऱ्या ट्रँक्विलिटीचा आस्वाद घेता यावा, यासाठी त्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
      श्रीक्षेत्र गणपतीपुळे हे डेस्टिनेशनम्हणून देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्धीस आले आहे. येथील स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्रस्नानाची मजा लुटण्यासाठी आणि कोकणी जेवणाच्या स्वादासाठी अवश्य भेट द्यावी, असे ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट गणपतीपुळ्याजवळच कवी केशवसुतांच्या जन्मगावी मालगुंड येथे उभारण्यात आले आहे. गणपतीपुळे-जयगड मार्गावरील निर्मल नगरीसमोर ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट आहे. समुद्राच्या किनार्‍यावर नारळ, पोफळींच्या बागेत निवासाकरिता कोकणी हट, स्विस कॉटेज हट आणि या सर्वांच्या मध्यभागी गोलाकार डायनिंग हॉल आहे. रिसॉर्टच्या समोर विस्तीर्ण पसरलेल्या सागरकिनार्‍यावर आल्हाददायक वार्‍यांच्या झुळकांचा आनंद घेत तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि कॅण्डल लाइट डिनरचा आनंद घेता येईल. संगीताच्या तालावर रेन डान्सची सोय येथे उपलब्ध आहे. तसेच खेळण्यासाठी कॅरमबोर्ड, क्रिकेट, व्हॉलिबॉल इत्यादी खेळाचे साहित्य मिळू शकते. येथे छोटखानी असलेल्या वाळूच्या टेकडीवर किंवा लॉनवर अथवा किनार्‍यावर बसून मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसमवेत अन्ताक्षरी किंवा तत्सम खेळ खेळता येऊ शकेल.
      ट्रँक्विलिटीमध्ये पर्यटकांसाठी वेगवेगळी पॅकेजीस आहेत. आपापल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यामधून पर्यटकांना निवड करता येऊ शकेल.
                सॅटर्डे बोनान्झा पॅकेज : यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सॅटर्डे नाFट मूव्ही विथ कँडल डिनर अ‍ॅरेंज केले जाईल. वीस बाय वीसच्या स्क्रीनवर चांगल्या चित्रपटाचा आनंद घेत तुम्ही कॅण्डल लाइट डिनर घेऊ शकाल. किंवा रिसॉर्टच्या परिसरात पार्क केलेल्या तुमच्या कारमध्ये बसूनच चित्रपट पाहत जेवण घेता येईल. पहिल्या व तिसर्‍या शनिवारी कबाब महोत्सव, फिश फेस्टिव्हल असे वेगवेगळे व्हेज व नॉन व्हेज खाद्यमहोत्सव असतील. हॅपी डेज म्हणून सोमवार ते गुरुवार या कालावधीत भोजन थाळीकरिता माफक मूल्य असेल. खास कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे, चिकन वडे अशा डिशेसवर १० टक्के सवलत दिली जाईल.
      आरोग्यदायी पर्यटन : याअंर्तगत तंदुरुस्त राहण्यासाठी दरमहा तीन दिवसांचे आरोग्य शिबिर घेतले जाईल. या पॅकेजमध्ये डायबेटिस कंट्रोल, वेटलॉस, कोलेस्टेरॉल कंट्रोल याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. घरच्या घरी करता येणारे व्यायाम प्रकार, योगासने शिकवली जातील. न्युट्रिशियस ब्रेकफास्ट व जेवण दिले जाईल. सहभागी व्यक्तीला पुढील सहा महिन्यांचा डाएट प्लॅन दिला जाणार आहे.  त्यातील पहिले हेल्थ वर्कशॉप नुकतेच पार पडले.
      कँपेन साइट पॅकेज : या पॅकेजमध्ये बायकर्स, रायडर, सायकलस्वार आदींना समुद्रकिनार्‍यावर स्वतः आणलेला टेंट लावण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली जाईल. बीचवर टेंट लावून कँप फायर करता येईल व आपल्या आवडीचे स्वादिष्ट भोजन घेता येईल. माफक शुल्कात टेंट उभारणी करता येईल.
      सुखनिवांत पॅकेज : यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती, दाम्पत्ये, मित्रमैत्रिणी यांना सेकंड होम म्हणून दोन दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत अत्यंत माफक दरात ट्रँक्विलिटीमध्ये राहता येईल. एका रूममध्ये दोन ते तीन व्यक्तींची राहण्याची सोय असेल. यामध्ये निवास, ब्रेकफास्ट, जेवण व प्रासंगिक वैद्यकीय देखरेखीचीही सुविधा आहे. ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमधील व्हॅलेंटिनो बीच कॅफे२४ तास चालू राहणार आहे. यामध्ये दिवसा-रात्री केव्हाही पर्यटकांना समुद्रकिनारी बसून कॉफी, स्नॅक्सचा आस्वाद घेता येईल.
      ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमध्ये वाढदिवस, छोटे घरगुती कार्यक्रम, महिलांच्या ग्रुपचे गेटटुगेदर, हाफ डे, फुल डे पिकनिक अ‍ॅरेंज केली जाते. बीचवर लग्न, मुंज अशा समारंभासाठी अलीकडे ट्रेंड वाढत आहे. वेडिंग डेस्टिनेशन म्हणून ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टला पहिली पसंती मिळाली आहे. यापूर्वी येथे अनेक विवाह सोहळे, मुंज असे मोठे समारंभ उत्तमरीत्या पार पडले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या वर्कशॉप, मीटिंग्जसाठी स्वतंत्र पॅकेज आहेत.
      ट्रँक्विलिटीने रेस्टॉरंट व हॉटेल बुकिंगकरिता मेंबरशिप कार्ड योजना लागू केली आहे. रेस्टॉरंटसाठी ५०० रुपयांचे सवलत कार्ड दिले जाणार आहे. कार्डधारकाचे स्नॅक्स, नाश्ता, जेवण इत्यादीचे बिल ५०० रुपयांतपर्यंत झाल्यास १० टक्के सवलत आणि १००० रुपयांपर्यंत झाल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. एक वर्ष मर्यादेची ही योजना आहे. हे कार्ड हस्तांतरणीय नाही. छोट्या कुटुंबाकरिता १५०० रुपयांच्या मेंबरशिप कार्डवर एका दिवसाच्या स्टे फ्री व खाण्या-पिण्याच्या बिलात २० टक्के सवलत असेल. हे कार्ड तीन वर्षांकरिता व्हॅलिड असेल. हे कार्ड हस्तांतरणीय नाही.
........
Tranquility (ट्रॅन्क्विलिटी) Beach Resort वर बायकर्सनी लुटला परमोच्च आनंद!

     ट्रँक्विलिटीतर्फे या सीझनकरिता पर्यटकांसाठी किफायतशीर काही खास पॅकेजीस देऊ केली आहेत. कँपेन साइट पॅकेज हे त्यापैकीच एक. असेच पॅकेज घेतलेल्या एका ग्रुपला काय वाटते, हे ऐका त्यांच्याच शब्दांत.
https://youtu.be/nTEu44lTXdc
................

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा –
मोबाइल - 7887878208/7887878308/7887878408/9422371907/ 9518588700


Wednesday, 2 May 2018

केळवे भुईकोटाचे संवर्धन करून महाराष्ट्र दिन साजरा



     
पालघर : जिल्ह्यातील केळवे येथील ऐतिहासिक भुईकोटाचा पाया मोकळा करून किल्ले वसई मोहीम परिवारासह इतिहासप्रेमी विविध मंडळांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अठ्ठावन्नावा महाराष्ट्र दिन साजरा केला. पाया मोकळा करताना तब्बल सहा हजार घमेली माती बाजूला करण्यात आली.
      सततचे नैसर्गिक बदल, वाऱ्यावर उडणारी वाळू, पावसाळी गाळ अशा अनेक बाबींचा केळवे येथील भुईकोटावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वासाठी संवर्धन करणे गरजेचे होते. किल्ल्याचे मुख्य भुई प्रवेशद्वार, अंतर्गत मध्य प्रवेशद्वार, मुख्य वास्तूचा बराचसा पाया पूर्णतः वाळूच्या थराखाली बंदिस्त झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि दुर्गसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन किल्ले वसई मोहीम परिवारासह पाच संस्थांनी काम करायचे ठरविले. किल्ल्यात नैसर्गिकरीत्या साचलेला वाळूचा ढिगारा आणि इतर कचरा श्रमदानाने मोकळा करण्याचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि पाच संस्थांच्या दुर्गमित्रांनी सुरू केले.
      ठरल्यानुसार १ मे २०१८ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) सफाळे केंद्र, किल्ले वसई मोहीम परिवार (उत्तर कोकण) संवर्धन मोहीम-केळवे, युवा शक्ती प्रतिष्ठान- पालघर, सह्याद्री मित्र परिवार-पालघर या दुर्गमित्र संघटनांचे प्रतिनिधी एकत्र जमले. केळवे भुईकोट किल्ला संवर्धनासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत त्यांनी श्रमदान केले. संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिनिधी आणि सह्याद्री मित्र परिवाराच्या प्रतिनिधींच्या हस्ते वास्तुदेवतेच्या पूजनाने झाली. मोहिमेत मुंबई, वसई, माकुणसार, पालघर, नावझे, भाईंदर, सफाळे, दादरहून आलेल्या ५९ इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला. त्यामध्ये दुर्गमित्र प्रतिनिधी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, महिला, बालमित्र, ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश होता. यावेळी तब्बल सहा हजाराहून अधिक घमेली वाळू व शेकडो दगड मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका बाजूस जमा करण्यात आले. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने झालेल्या या सलग दुसऱ्या दुर्गसंवर्धन मोहिमेत मध्य प्रवेशद्वाराचा मुख्य चिरेबंदी पायाचा स्तर मोकळा करण्यात आला. प्रथमच स्पष्ट दिसलेल्या या प्रवेशद्वाराची उंची ७ फूट मोकळी झाली. या वाळूच्या थरात व किल्ल्याच्या सभोवताली सापडलेल्या दारूच्या ४० बाटल्या, प्लास्टिक कचरा गोणीत जमा करण्यात आला.
      केळवे भुईकोटाच्या संवर्धनामध्ये वाऱ्यावर उडत येणारी प्रचंड वाळू व वाढत जाणारा पर्यटकांचा कचरा हे दुर्गसंवर्धनातील दुर्गमित्रांना आव्हान आहे.
      कार्यक्रमाच्या समारोपात किल्ले वसई मोहिमेचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केळवे भुईकोटाच्या रणसंग्रामाचा इतिहास आणि या भूभागाच्या इतिहासातील योगदानावर मार्गदर्शन केले. तब्बल ८ तास चाललेल्या या मोहिमेत सर्वच सहभागींचे महत्त्वाचे योगदान लाभले. दुर्गमित्रांनी कार्यक्रमाच्या समारोपात आगामी संवर्धन मोहिमेच्या आराखड्याबाबत बैठक घेतली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा सफाळे मंडळाच्या प्रतिनिधींनी दुर्गमित्र श्रीदत्त राऊत यांचा अंजूर-भिवंडी ते मोरगाव-पुणे पायी प्रवास मोहिमेबद्दल तसेच दुर्गसंवर्धन कार्याबद्दल सत्कार केला. मे आणि जून महिन्यातील नियोजनपूर्वक मोहिमांची माहिती आणि तपशील लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.........
संपर्क :  डॉ. श्रीदत्त राऊत ९७६४३१६६७८
...........
श्रमदानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://youtu.be/4LYr6KyTh2U
.............

      केळवे भुईकोटाच्या संवर्धनाची काही क्षणचित्रे
















Monday, 2 April 2018

नाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार



      रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नाणार (ता. राजापूर) येथे केंद्र सरकारच्या तीन तेल कंपन्या एकत्रितरीत्या उभारत असलेला रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प येत्या २०२३ सालापर्यंत कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाविषयीची माहिती आज प्रथमच रत्नागिरीतल्या प्रसारमाध्यमांना देण्यात आली, त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले. मोहन मेनन, अजित मोरये आणि अनिल नागवेकर यांनी प्रकल्पाविषयीची माहिती दिली.
      इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन कंपन्या तीन लाख कोटी रुपयांचा खर्च असलेला हा प्रकल्प उभारत आहेत. देशात २३ रिफायनरी प्रकल्प असून अशा तऱ्हेचा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रथमच उभारला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फतच प्रकल्प उभारायचे ठरल्यानंतर रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीची स्थापना २२ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. एमआयडीसी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकार प्रकल्पाकरिता आवश्यक असलेली सुमारे पंधरा हजार एकर जमीन खरेदी करून देणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील चौदा गावांमध्ये हा प्रकल्प साकारणार असून प्रकल्पाला आतापर्यंत १४ टक्के लोकांनी प्रकल्पाला आक्षेप नोंदविले आहेत. अनेक सामाजिक संस्था प्रकल्पाबाबत अपप्रचार करत आहेत. संभाव्य प्रदूषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंग, कोयना प्रकल्पाचे अवजल इत्यादी स्रोतांमधून प्रकल्पाला आवश्यक पाणी घेतले जाणार असून या प्रकल्पातून समुद्रात टाकाऊ पाणी सोडले जाणार नाही. सर्व पाणी शुद्धीकरण करून प्रकल्पाच्या परिसरातच वापरले जाणार आहे. प्रकल्पाच्या जागेपैकी ३० टक्के जागा हरितपट्टा म्हणून विकसित केली जाणार असून आंब्याची एक लाख झाडे, तसेच काजू आणि झाडांची लागवड तेथे केली जाणार आहे. गुजरातमधील रिफायनरीच्या परिसरात केलेल्या आंब्याच्या लागवडीपासून मिळणारे उत्पन्न देशाच्या आंब्याच्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट आहे. तेथील आंबा कॅनिंगसाठी महाराष्ट्रात पाठविला जातो. प्रकल्पात केवळ पेट्रोलियम उत्पादने नव्हेत, तर फर्निचर, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, फ्रिज, वॉशिंग मशीन, ऑटोमोबाइल इत्यादीसाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती होणार आहे. ही उत्पादने सर्वांत आधुनिक अशा बीएस-वीआय प्लस (युरो – सिक्स) दर्जाची असतील. त्यामध्ये फर्निचरहा संपूर्णपणे प्रदूषणविरहित प्रकल्प असेल.
      प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी, तर राज्याच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना सुमारे दीड लाख, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर २० हजार जणांना प्रकल्पात प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात, याकरिता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्यात येणार असून प्रकल्पासाठी आवश्यक ती कौशल्ये तेथे शिकविली जाणार आहेत. याशिवाय लाखाहून अधिक लोकांना प्रकल्पाच्या परिसरात सुरू होणाऱ्या विविध पूरक उद्योगांमध्ये अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रकल्पामध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधा आणि हवाई जोडणीच्या विकासाची क्षमता आहे. रत्नागिरी ते विजयदुर्ग या दरम्यान रेल्वेमार्ग उभारण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखविली असून या मार्गावर ६ ते ७ स्थानके असतील. प्रकल्पाच्या परिसरातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील. याशिवाय मनोरंजन, पर्यटन, मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प अत्यंत सुरक्षित असून त्याकरिता जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निर्मल सागर तट महोत्सव कोळथरे येथे उत्साहात


 दापोली - दापोली तालुक्यात दोन दिवसांचा कोळथरे महोत्सव नुकताच पार पडला.

      महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निर्मल सागरतट अभियानातून कोळथरे या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावाचा कायापालट झाला असून गावात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ राहावा, यासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्याची माहिती पर्यटकांसह सर्वांना व्हावी, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपातळीवर अशा तऱ्हेने प्रथमच महोत्सव साजरा करण्यात आला. त्याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कासव महोत्सवही पार पडला. सरपंच सौ. ज्योती दीपक महाजन यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविले गेले आणि महोत्सवही
उत्साहात पार पडला.
      अभियानाच्या निकषानुसार सर्वधर्म समभाव जोपासला जावा, पर्यटकांची संख्या वाढावी, रोजगार संधी मिळावी अशा वेगवेगळ्या हेतूने कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या विकासांचा व पर्यटकांना मूलभूत सुविधांचा आनंद घ्यावा या अनुषंगाने कोळथरे ग्रामपंचायत, सरपंच आणि कमिटी सदस्यांनी २४ आणि २५ मार्च २०१८ रोजी कोळथरे महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात 
आले. कोळथरे गावात आनंदाचे वारे वाहताना दिसून येत होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ, पर्यटक व आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण समुद्र किनारा दोन दिवस गजबजून गेला होता. वेगळावेगळ्या कार्यक्रमांमुळे सगळ्यांचे उत्साह वाढत होता.
      कोळथरे महोत्सवात वाळुशिल्प प्रशिक्षण देण्यात आले. किल्ले स्पर्धेत सुमारे ६० बालकलाकारांनी हजेरी लावली. महिलांचे कबड्डी
सामने, लोककला, जाखडी, चवदार खाद्य जत्रा, पतंगबाजी, नेचर ट्रॅक, कासव महोत्सवाकरिता पर्यटक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले.
................

















(चित्रफीत सौजन्य - दीपक महाजन, कोळथरे, ता. दापोली)




Sunday, 1 April 2018

समाज परिवर्तनामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे : सुरेश प्रभू



                रत्नागिरी : समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांचीही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांच्या हस्ते रत्नागिरीतील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक्सचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रभू यांनी बोलत होते.

                श्री. प्रभू म्हणाले की, कोकणाचा विकास अद्यापही अपूर्ण आहे. याचे कारण येथील महिला घराबाहेर पडत नाहीत. मात्र जेव्हा महिला घराबाहेर पडतात तेव्हा समाजाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते असा माझा विश्वास आहे. त्यातूनच १९९४-९५ च्या दरम्यान मानव साधन विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत महिला सबलीकरणाच्या निमित्ताने कोकणातील सुमारे ६० ते ७० हजार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी या संस्थेने दिली आहे. त्यातच पुढचे पाऊल म्हणून कोकणातील महिलांना सुमारे ४५ हजार रुपये किमतीची पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक देण्याचा प्रस्ताव हिरो ग्रुपचे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आमच्या मानव साधन विकास संस्थेकडे आणला. त्याचाच प्रारंभ आज होत आहे. कोकण विकासासाठी शासनासोबतच अशा सामाजिक संस्थांचीही सांगड घालणे गरजेचे आहे, असेही श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
                कार्यक्रमाला व्यासपीठावर सौ. उमा प्रभू यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, सौ. उल्का विश्वासराव आणि ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनचे अनिल शर्मा उपस्थित होते. महिला सबलीकरणासाठी मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे काम करीत असून याहीपुढे हे काम असेच सुरू राहील, असे सौ. उमा प्रभू यांनी सांगितले. अनिल शर्मा यांनीही ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जाणीव फाऊंडेशनच्या वतीने श्री. प्रभू यांच सत्कार करण्यात आला.
                मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांतर्गत अनेक उपक्रम २० वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाखापेक्षा जास्त महिलांना या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. येणाऱ्या काळात महिलांना स्वयंरोजगारासाठी व नोकरी व्यवसायासाठी वाहतुकीची कमी खर्चात व पर्यावरणपूरक व्यवस्था व्हावी,  या हेतूने इलेक्ट्रिक बाइक्स देण्यात आल्या आहेत. ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने महिलांच्या सबलीकरणाकरिता ५०० इलेक्ट्रिक बाइक्सचे वितरण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले जाणार आहे. त्यापैकी २५० सायकली रत्नागिरी जिल्ह्यात वितरित केल्या जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात रोहिता सहदेव पांचाळ (ताम्हाणे, राजापूर), मंदाकिनी महादेव माईंगडे (जाकादेवी, रत्नागिरी), योगिता योगेश पवार (कोसुंब, संगमेश्वर), शमिका संतोष रामाणी (मालगुंड, रत्नागिरी), प्रियांका प्रकाश जोशी (निवे, संगमेश्वर), दीपाली मनोज कुंभार (टेरव, चिपळूण), माधवी मंगेश किर्लोस्कर (उन्हाळे, राजापूर), साक्षी चंद्रकांत भुवड (वाकेड, लांजा) आणि रूपाली राहुल पवार (जावडे, लांजा) या महिलांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे.