Wednesday, 2 May 2018

केळवे भुईकोटाचे संवर्धन करून महाराष्ट्र दिन साजरा



     
पालघर : जिल्ह्यातील केळवे येथील ऐतिहासिक भुईकोटाचा पाया मोकळा करून किल्ले वसई मोहीम परिवारासह इतिहासप्रेमी विविध मंडळांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अठ्ठावन्नावा महाराष्ट्र दिन साजरा केला. पाया मोकळा करताना तब्बल सहा हजार घमेली माती बाजूला करण्यात आली.
      सततचे नैसर्गिक बदल, वाऱ्यावर उडणारी वाळू, पावसाळी गाळ अशा अनेक बाबींचा केळवे येथील भुईकोटावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वासाठी संवर्धन करणे गरजेचे होते. किल्ल्याचे मुख्य भुई प्रवेशद्वार, अंतर्गत मध्य प्रवेशद्वार, मुख्य वास्तूचा बराचसा पाया पूर्णतः वाळूच्या थराखाली बंदिस्त झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि दुर्गसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन किल्ले वसई मोहीम परिवारासह पाच संस्थांनी काम करायचे ठरविले. किल्ल्यात नैसर्गिकरीत्या साचलेला वाळूचा ढिगारा आणि इतर कचरा श्रमदानाने मोकळा करण्याचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि पाच संस्थांच्या दुर्गमित्रांनी सुरू केले.
      ठरल्यानुसार १ मे २०१८ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) सफाळे केंद्र, किल्ले वसई मोहीम परिवार (उत्तर कोकण) संवर्धन मोहीम-केळवे, युवा शक्ती प्रतिष्ठान- पालघर, सह्याद्री मित्र परिवार-पालघर या दुर्गमित्र संघटनांचे प्रतिनिधी एकत्र जमले. केळवे भुईकोट किल्ला संवर्धनासाठी सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत त्यांनी श्रमदान केले. संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिनिधी आणि सह्याद्री मित्र परिवाराच्या प्रतिनिधींच्या हस्ते वास्तुदेवतेच्या पूजनाने झाली. मोहिमेत मुंबई, वसई, माकुणसार, पालघर, नावझे, भाईंदर, सफाळे, दादरहून आलेल्या ५९ इतिहासप्रेमींनी सहभाग घेतला. त्यामध्ये दुर्गमित्र प्रतिनिधी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, महिला, बालमित्र, ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश होता. यावेळी तब्बल सहा हजाराहून अधिक घमेली वाळू व शेकडो दगड मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका बाजूस जमा करण्यात आले. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने झालेल्या या सलग दुसऱ्या दुर्गसंवर्धन मोहिमेत मध्य प्रवेशद्वाराचा मुख्य चिरेबंदी पायाचा स्तर मोकळा करण्यात आला. प्रथमच स्पष्ट दिसलेल्या या प्रवेशद्वाराची उंची ७ फूट मोकळी झाली. या वाळूच्या थरात व किल्ल्याच्या सभोवताली सापडलेल्या दारूच्या ४० बाटल्या, प्लास्टिक कचरा गोणीत जमा करण्यात आला.
      केळवे भुईकोटाच्या संवर्धनामध्ये वाऱ्यावर उडत येणारी प्रचंड वाळू व वाढत जाणारा पर्यटकांचा कचरा हे दुर्गसंवर्धनातील दुर्गमित्रांना आव्हान आहे.
      कार्यक्रमाच्या समारोपात किल्ले वसई मोहिमेचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केळवे भुईकोटाच्या रणसंग्रामाचा इतिहास आणि या भूभागाच्या इतिहासातील योगदानावर मार्गदर्शन केले. तब्बल ८ तास चाललेल्या या मोहिमेत सर्वच सहभागींचे महत्त्वाचे योगदान लाभले. दुर्गमित्रांनी कार्यक्रमाच्या समारोपात आगामी संवर्धन मोहिमेच्या आराखड्याबाबत बैठक घेतली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा सफाळे मंडळाच्या प्रतिनिधींनी दुर्गमित्र श्रीदत्त राऊत यांचा अंजूर-भिवंडी ते मोरगाव-पुणे पायी प्रवास मोहिमेबद्दल तसेच दुर्गसंवर्धन कार्याबद्दल सत्कार केला. मे आणि जून महिन्यातील नियोजनपूर्वक मोहिमांची माहिती आणि तपशील लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.........
संपर्क :  डॉ. श्रीदत्त राऊत ९७६४३१६६७८
...........
श्रमदानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://youtu.be/4LYr6KyTh2U
.............

      केळवे भुईकोटाच्या संवर्धनाची काही क्षणचित्रे
















No comments:

Post a Comment