Friday 11 May 2018

वानरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपकरण      लांजा :  वानर आणि माकडांना पळवून लावून शेतीचे संरक्षण करणारे घरगुती उपकरण सूर्यकांत गणेश पंडित ऊर्फ राजू पंडित या साटवली (ता. लांजा) येथील तरुण शेतकऱ्याने तयार केले आहे. घरच्या घरी तयार केलेल्या या उपकरणाचा चांगला फायदा झाल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.
      कोकणात अलीकडे वानर आणि माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी वानरमारे नावाची जमात वानरांना आपल्या तिरकमठ्याने मारत असे. नंतर वानरांना मारण्यावर कायद्याने बंदी आली. वानरमाऱ्यांची जमातही रोजगाराच्या इतर उद्योगांमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची भटकंती बंद झाली. त्यामुळे वानरांची हत्या थांबली.
दरम्यानच्या काळात जंगतोडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वानरांसह अनेक प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. परिणामी वानरांचा मानवी वस्तीकडचा राबता वाढला. नारळीपोफळीसह सर्वच फळांची लागवड आणि भाजीपाल्याची नासधूस त्यांनी सुरू केली. एखाद्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर बसावेत, अशा पद्धतीने वानरांच्या टोळ्या भाजीपाल्याच्या पिकांमध्ये वावरू लागल्या. त्यांचा बंदोबस्त करणे जिकिरीचे बनले. शेतीच्या रक्षणासाठी बंदुकांचे परवाने दिले जात असले, तरी ते सरसकट मिळत नाहीत. शिवाय त्यांचा वापर करून वानरांना मारणे हा गुन्हा ठरविला गेला. त्यामुळे हाकारणे, फटाके वाजविणे, डबे वाजविणे, आरडाओरडा करून त्यांना हाकलणे एवढेच हाती राहिले.
मोठ्या आवाजाला वानरे घाबरतात, हे लक्षात घेऊन राजू पंडित यांनी एक उपकरण तयार केले आहे. वानरांना पळवून लावण्यासाठी आवाज करणारे एक यांत्रिक उपकरण एका प्रदर्शनात पाहिल्यानंतर राजू पंडित यांना असे उपकरण स्वतःच तयार करण्याची कल्पना सुचली. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाइपचा वापर करून ते तयार करण्यात आले आहे. या पाइपची बंदुकीसारखी विशिष्ट रचना करण्यात आली आहे. त्याला घरगुती गॅस पेटविण्याचा लायटर बसविण्यात आला आहे. बंदुकीच्या नळकांड्याच्या बाजूने कांदा किंवा बटाटा आत खोलवर बसवायचा. त्यानंतर लायटरची ठिणगी जेथे पडते, तेथे परफ्युमसारख्या गॅसच्या बाटलीतून थोड्याशा गॅसची फवारणी करायची आणि तो कप्पा बंद करून बंदूक दूरवर रोखायची. त्यानंतर लायटरचे बटन दाबून ठिणगी पाडायची. ठिणगी पडताच कांदा-बटाटा साधारणतः तीस मीटर अंतरापर्यंत दूरवर उडून जातो. जाताना तो मोठा आवाज करतो. या आवाजाने वानर उडून जातात. काही तास तरी ते परत येत नाहीत, असा अनुभव राजू पंडित यांनी घेतला आहे.
हे उपकरण तयार करायला एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे श्री. पंडित यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर घरच्या घरी हे उपकरण तयार करता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी राजू पंडित यांचा संपर्क क्रमांक - 9422322075
..............
उपकरणाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या खालील यूट्यूब चॅनेलवर क्लिक करा.


No comments:

Post a Comment