पर्यटन क्षेत्राला गती देणारा स्कुबा डायव्हिंगचा थरार आता रत्नागिरीतही
अनुभवायला मिळू लागला आहे. हर्षा स्कुबा डायव्हिंगने गेल्या डिसेंबरमध्ये सुरू
केलेल्या या उपक्रमाचा फायदा अवघ्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी
घेतला आहे. स्कुबा डायव्हिंगच्या केंद्रामुळे रत्नागिरीचे नाव पर्यटनाच्या
क्षेत्रात जागतिक नकाशावर पोहोचले आहे. आता हर्षातर्फे मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा
उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.
.............
लहान रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे सारख्याच रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे, रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणारे मासे, सुंदर मखमली रंगांच्या शिंपल्यांचा खच... पाण्याखालचे हे स्वच्छंदी जग
न्याहाळायला मिळाले तर? अवतीभवती रंगीबिरंगी मासे फिरताहेत.
मध्येच एखादे छोटेसे कासव नजरेसमोरून जात आहे. एरवी सहजासहजी न दिसणारे दगडगोटे
नजरेस पडताहेत. पाण्याच्या खाली असलेल्या या स्वप्नवत दुनियेची सफर करण्यासाठी लोक
स्कुबा डायव्हिंग करतात. अंदमान-निकोबार, गोवा आणि
सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीतही स्कुबा डायव्हिंग सुरू झाले आहे.
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण
केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणार्या
पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून
न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सतत वेगळे काही करण्याचा जणू छंदच असलेल्या
रत्नागिरीतील मैत्री गमुपने त्यासाठी पुढाकार घेतला आणि वर्षभर पाठपुरावा करून
हर्षा स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात यश मिळविले. अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात
नेमके काय दडले आहे, समुद्रातील जीवसृष्टी कशी
असते, याचे कुतूहल आता रत्नागिरीला येणार्या पर्यटकांना
आणि अर्थातच समुद्राच्या कुशीत राहणार्या रत्नागिरीकरांनाही शमवता येणार आहे.
मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, कांचन आठल्ये आणि त्यांच्या
सहकार्यांनी रत्नागिरीत ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.
विविध ठिकाणी केटरिंग सर्व्हिस, हर्षा गार्डन हॉटेल, अंबर हॉल, मराठा रेसिडेन्सी हे शाही हॉटेल, मांडवी
समुद्रकिनाऱ्यावर नव्यानेच सुरू केलेले सी फॅन्स हॉटेल अशा विविध उद्योगांमधील
वैविध्यपूर्ण अनुभव घेतानाच मैत्री गमुपला बाहेरून येणार्या पर्यटकांच्या गरजा समजू
लागल्या. याच दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मैत्री गमुपचे चौघे जण मुंबईत
भरलेल्या टूर एक्झिबिशनला गेले होते. तेथे कोकणाची टूर चालवणारे कोणीही नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरी हेच पर्यटकांचे डेस्टिनेशन व्हावे, असे ध्येय मनाशी बाळगून त्या
चौघांनी हर्ष हॉलिडेज नावाने टूर कंपनी सुरू केली. पर्यटक येथे आले पाहिजेत आणि
थांबले पाहिजेत यासाठी रत्नागिरीच्या संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देणार्या
काही योजना आखल्या. गणेशोत्सवादरम्यान केरळ येथून काही पर्यटक आले होते. त्यांना
रत्नागिरीतील काही घरांमध्ये नेऊन आरती, नैवेद्य, अन्न यांची माहिती दिली. या सहलीचा त्यांनी खूप आनंद लुटला; मात्र हे सर्व करत असताना अजूनही काहीतरी कमी आहे हे प्रकर्षाने जाणवत होते.
काही अनुभवी सहकार्यांशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरीत समुद्र असूनही, संबंधित साहसी खेळांची सुविधा नसल्याने आलेले पर्यटक येथे थांबत नाहीत, ही बाब समोर आली. गोव्यानंतर कोकणाला महत्त्व देणारे पर्यटक रत्नागिरीपेक्षाही
सिंधुदुर्गात मालवण, तारकर्ली परिसराकडे अधिक
आकर्षित होतात, याचीही नोंद करण्यात आली. सुमारे दहा वर्षांपूर्वी मालवण
तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसारखे साहसी समुद्री खेळ सुरू झाले, हे त्याचे प्रमुख
कारण होते. त्यावर चर्चा आणि विचारविनिमय करतानाच रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंग
सुरू केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले
आणि त्यातूनच रत्नागिरीच्या हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला जन्म झाला. त्यासाठी तारकर्ली येथील सारंग कुलकर्णी यांचे मोलाचे
मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. स्कुबा डायव्हिंगसाठी नेमकी ठिकाणे शोधण्यासाठी
गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी पाहणी झाली. रत्नागिरीच्या परिसरात भाट्ये, कुर्ली, भगवती बंदर, गणपतीपुळे, गणेशगुळे ते गणपतीपुळे-तिवरी बंदरपर्यंत सर्व ठिकाणे तपासली आणि हवी तशी जागा
जाकीमिर्या-अलावा येथे सापडली. अलावा येथे खडकाळ भाग असून स्वच्छ व शांत किनारा
आहे. भरपूर प्रवाळ, मासे असून सुरक्षित ठिकाण
आहे. त्यामुळे याच ठिकाणाची निवड करण्यात आली. लाखो रुपये खर्चून हा प्रकल्प अखेर
कार्यान्वित झाला आणि रत्नागिरीला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण
झाले आहे. डायव्हिंगची सोय रत्नागिरीत नसल्याने अनेक रत्नागिरीकरही परदेशांमध्ये
जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत होते. आता पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू
झाल्याने रत्नागिरीत पर्यटक खूष होईल आणि समुद्रातील अंतरंग अनुभवण्यासाठी मोठ्या
संख्येने येईल, अशी अपेक्षा आहे. ती पहिल्या दोन महिन्यांत सुमारे
दीड ते दोन हजार पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंग करून पूर्ण केली आहे.
रत्नागिरीजवळच्या जाकीमिर्या-पाटीलवाडी
येथे स्कुबा डायव्हिंग सेंटरचा लँडिंग पॉइंट आहे. तेथून बोटीने अलावा येथे जाण्यास
7 मिनिटे लागतात. बोटीतून जातानाच पर्यटक मिर्याचे निसर्गसौंदर्य पाहून तृप्त
होऊन जातो. तेथे डायव्हिंग पॉइंट आहे. बारा वर्षांपासून अधिक वयाच कोणीही
डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो. त्याकरिता पोहायला येण्याची गरज नाही. डायव्हिंग
करण्यापूर्वी सर्व माहितीचा अर्ज भरून घेतला जातो. काही आजार, डॉक्टर्सचे मोन नंबर्स आदी माहिती घेतली जाते. तसेच प्रवाशांना डायव्हिंग कसे
करावे याची परिपूर्ण माहिती दिली जाते. स्विमर्सचा गॉगल लावून समुद्रात जावे लागत
असल्यामुळे तोंडाने श्वास कसा घ्यावा, सोडावा याची माहिती दिली
जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेब सूट परिधान करून व ऑक्सिजनचा सिलिंडर
पाठीला लावून समुद्रात उतरायचे. तेथे काही मिनिटे सराव करून घेतला जातो. गाइडचे
पूर्ण लक्ष पर्यटकांवर असते. पाण्याखाली बोलता येत नसल्याने खुणांनी ते वारंवार
विचारतात व श्वास घेताना त्रास जाणवल्यास तत्काळ पाण्याच्या वर घेऊन येतात. उत्तम डायव्हर्समुळे समुद्री जीवन अगदी जवळून पाहण्याची संधी
उपलब्ध होते. तेथे अनेक प्रकारचे मासे,
प्रवाळ, वनस्पती आणि समुद्री जीव ही सारी अद्भुत दुनिया समुद्रात खोलवर जाऊन पाहताना
पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे मिटते.
हर्षा स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख महेश
शिंदे हे मरीन इंजिनियर असून चीनमध्ये बोटी बांधण्याच्या व्यवसायात ते होते. ते
म्हणाले की, सध्या आमच्याकडे तारकर्ली येथून प्रशिक्षण घेतलेले
आणि पॅडी (प्रोमेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग
इन्स्ट्रक्टर) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्टिफाइड असलेले उमेश डोके, अजिम मुजावर, जितेंद्र शिरसेकर, अबमाव रॉड्रिक्स, प्रेमानंद पराडकर, विजय कोळंबकर हे
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहा डायव्हर्स आहेत. प्रत्येक पर्यटकासोबत एक डायव्हर असतो.
हे डायव्हर्स आपत्कालीन वैद्यकीय सेवाही देऊ शकतात. वेगवेगळ्या 30 प्रकारच्या
व्यक्तींना होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा वेब सूट उपलब्ध आहेत.
डायव्हिंगसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही वेळ उत्तम असते. अर्थातच पावसाळा, वादळ इत्यादी नैसर्गिक
बदलांच्या काळात डायव्हिंग करता येत नाही.
हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला
अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साखर खामेला माणूस या नाटकाच्या चमूसोबत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले, पॅडी कांबळे यांनीही रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. अचलपूर (अमरावती)
येथील आमदार बच्चू कडू रत्नागिरीच्या समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेऊन गेल्यानंतर अमरावती, वर्धा, बुलडाणा इत्यादी भागातूनही चौकशी होऊन तेथून पर्यटक
येऊ लागले आहेत. त्यांच्यासह सर्वच पर्यटकांना प्रवास, निवास आणि भोजनासह विविध सुविधा मैत्री गमुपकडून पुरविल्या जात आहेत. त्यामुळे
पर्यटकांची चांगली सोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी खास पन्नास टक्के सवलत दिली जात
आहे.
इतर भागात प्रसिद्धी झाल्यानंतर
बाहेरचे पर्यटक रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद आवर्जून घेत आहेत. स्थानिक
लोकांनी एकदा तरी हा आनंद लुटायला हवा. स्वतः अनुभव घेऊन तो इतरांना सांगितला, तर त्याचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल. पर्यटनाला
आल्यावर रत्नागिरीत वेगळे आहे काय आहे,
असा प्रश्न पडणार्या
पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग असे उत्तर आता द्यायला हरकत नाही.
............
जिल्हाधिकार्यांचे प्रोत्साहन
जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी
हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू करायला प्रोत्साहन दिले. रत्नागिरी नगरपालिका
प्रशासन, मेरिटाइम बोर्ड यांचेही
संपूर्ण सहकार्य लाभलेच, पण स्थानिक नागरिक, जाकीमिर्या ग्रामपंचायतीचेही विशेष प्रोत्साहन मिळाले. प्रकल्प सुरू झाल्यामुळे
पाच-सहा कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर मिर्या गावात
वर्दळ वाढल्याने महिला बचत गट, स्थानिक हॉटेल्सचा व्यवसाय
होऊ लागला, हीसुद्धा जमेची बाजू आहे. हर्षातर्फे आता नाइट
स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंगसह धाडसी खेळही मिर्या, अलावा परिसरात सुरू
करण्यात येणार आहेत. त्यामुळेही पर्यटकांचा रत्नागिरीकडे ओढा वाढेल. स्थानिकांना
स्कुबाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
..........
रोजगाराच्या अनेक संधी
स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात
अनेक संधी आहेत. त्याचीच ही काही उदाहरणे. मालवणचा भूषण परब हा तरुण तारकर्लीत
गाइड म्हणून काम करतो. भूषणच्या घरची
परिस्थिती बेताची होती. पण त्यावर मात करत या तरुण ओपन वॉटर (18 मीटर), अॅडव्हान्स ओपन वॉटर (30 मीटर), रेस्क्यू डायव्हर या
प्रकारच्या डायव्हिंगचे धडे घेतले. त्यानंतर मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग या ठिकाणी तो डायव्हिंगमधला मार्गदर्शक म्हणून काम करतो.
बारावीनंतर फुड टेक्नॉलॉजीमध्ये
शिक्षण घेणारा मालवणचाच सूरज भोसले स्कुबा डायव्हिंगचे धडे देतो. घरची परिस्थिती
बेताची असल्याने घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यासाठी जिद्दीने तो मेहनत
करत आहे. गोव्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे त्याने तेथेच काम केले. लहानपणापासून पोहण्याची आवड होती. त्याचा करिअरसाठी
उपयोग झाला. परदेशात नोकरीची संधी मिळाली होती, पण भारतातच राहून काम करायची त्याची इच्छा तो पूर्ण करतो आहे.
ड्राय डॉकमध्ये बोटी आणून दुरुस्त
करताना लाखो रुपये खर्च करावा लागतो. त्याऐवजी समुद्रात बोट असताना पाण्याखाली
जाऊन म्हणजे स्कुबा डायव्हिंग करून बोट दुरुस्त करण्याचे काम कमी खर्चात होते. हे कौशल्याचे काम असते. आता रत्नागिरीमध्येही
असे काम हर्षाचे डायव्हर्स करू शकतात. रत्नागिरीत प्रथमच
अशी सुविधा देण्यात येत असल्याने कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे
प्रशिक्षण घेण्याची आणि त्यातून रोजगाराची नवी संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे.
.........
अनुभवाचे बोल...
अजब गजब दुनियेची सफर...
दिल तो बच्चा है जीमच्या
प्रयोगाच्या निमित्ताने रत्नागिरीला आमची टीम गेली होती. त्यावेळी मिर्या बीचवरील हर्षा स्कुबा डायव्हिंगवाल्यांनी एक कायमचा
अविस्मरणीय अनुभव दिला. स्कुबा डायव्हिंगबद्दल ऐकून होतो. पण दर वेळी काही ना काही
कारणाने मिस व्हायचं. शेवटी तो योग हर्षाच्या निमित्ताने जुळून आला. पाण्याखालच्या
एका वेगळ्याच अजब गजब दुनियेची सफर केली. एवढी रंगीबेरंगी दुनिया तर आता जमिनीवर पण
नाही राहिली .... आणि मुळात कौतुक करेन ते हर्षा स्कुबा डायव्हिंगचे. उत्तम अशी वेल इक्विप्ड सगळी साधनसामग्री, अतिशय उत्कृष्ट वेल ट्रेण्ड डायव्हर्स, जे तुमच्या
सुरक्षिततेचा विचार करतातच पण त्यासोबत उत्तम अशी माहितीसुद्धा देतात.... संपूर्ण स्टाफही जिभेवर जवळ जवळ साखर ठेवूनच
असावेत असा.... रत्नागिरीला गेलात तर
नक्की अनुभव घ्या.
- प्रसाद खांडेकर
* समुद्राखालील अनोखी दुनिया प्रथमच पाहिली. असंख्य प्रकारचे लहान, मोठे मासे पाहिले आणि खूपच आनंद झाला. रत्नागिरीकरांनी स्कूबा डायव्हिंग करून
हा आनंद घ्यावा.
- शौनक मुळ्ये
(वय वर्षे 12)
.....................
आता साहसी खेळांचा थरार
तरुणाईचे साहसी खेळांचा थरार
अनुभवण्याचे वेड लक्षात घेऊन Harsha Adventure Park च्या प्रयत्नाने मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत
प्रगल्भतेने कॅम्पिंग साइट विकसित करण्यात आली आहे.
अॅडव्हेंचरचा अविभाज्य भाग असलेले
रोप ॲक्टिव्हिटी, ऑब्स्टॅकल्स, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, तिरंदाजी, झोर्बिंग बॉल इत्यादी विविध साहसी ११ क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले
आहेत.
अॅडव्हेंचर हे नुसते शारीरिक
परिश्रमाचे किंवा सुदृढ मानसिकतेची परीक्षा घेणारे माध्यम राहिलेले नाही. मुलांना पिकनिक स्पॉटवर नेण्यापेक्षा दोन
दिवसांच्या अॅडव्हेंचर पार्कला पाठवणेसुद्धा योग्य आहे. पूर्वी जमिनीवरील साहस
खेळांपुरत्या मर्यादित असलेल्या अॅडव्हेंचरला आता वेगळी दिशा मिळाली आहे. मिऱ्या
बंदरावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरीतील नामवंत जिद्दी
माउंटेनीअरिंगचे प्रमुख धीरज पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे
क्रीडाप्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
.................
हर्षाचा आस्वाद घेण्यासाठी...
संपर्क ः 9099025533
हर्षा हॉलिडेज - 9619246419
सुहास ठाकुरदेसाई - 9822290859
कौस्तुभ सावंत - 9822988080
..........
(ॲडव्हेंचर
स्पोर्ट्सकरिता संपर्क – धीरज पाटकर - ८३९०७६४४६४)
ॲडव्हेंचर स्पोर्ट्सविषयी अधिक माहितीसाठी कोकण मीडियाच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/tXuxFVj4M2g
ॲडव्हेंचर स्पोर्ट्सविषयी अधिक माहितीसाठी कोकण मीडियाच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/tXuxFVj4M2g
....................
(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक कोकण मीडिया, ता. ३ मार्च २०१८)
(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक कोकण मीडिया, ता. ३ मार्च २०१८)
………
No comments:
Post a Comment