Tuesday, 5 June 2018

पर्यावरण दिनानिमित्ताने `जलवर्धिनी`चे जलवर्धनाचे आवाहन



      रत्नागिरी - कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले आहेत. प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाणी साठविण्याचे आवाहन जलवर्धिनीने केले आहे. पाणी साठविण्याची टाकी बांधण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि ठरावीक साहित्य जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पुरविले जाणार आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तुलनेने कमी खर्चात पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले असून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशा साठवण टाक्या प्रतिष्ठानने बांधल्या आहेत. जलवर्धिनीतर्फे फेरोसिमेंट आणि नैसर्गिक धाग्यांच्या वापरातून टाक्या तयार केल्या आहेत. त्यांचा ठिकठिकाणी चांगला उपयोग होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका गुहागर तालुक्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर फेरोसिमेंटच्या 18 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. आवश्यक तेथे गरजूंना जलवर्धिनी प्रतिष्ठानने मदतही दिली आहे. यापुढेही मदत दिली जाणार आहे. इच्छुक गरजूंकरिता 10 फूट व्यास आणि 4 फूट उंचीची सुमारे 9 हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेली टाकी बांधून दिली जाईल. त्याकरिता शेतकऱ्यांनी 12 फूट व्यासाचे जोते, बांधकामासाठी लागणारी रेती आणि मजुरी देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.

गरजू शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधावा. आपल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत याच मोबाइलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी, असे आवाहन जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक – ९८२०७८८०६१.
.....................
जलवर्धिनीचे तंत्र वापरून शेतीकरिता पाण्याचे कसे नियोजन केले, याबाबतचे परशुराम आगिवले (मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड) या शेतकऱ्याचे अनुभव ऐकण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलला भेट द्या. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/91SY946gFcE

जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

………………………..

जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक पान




No comments:

Post a Comment