Monday 1 August 2016

क्लोरीनच्या बाटल्यांसाठी कर्जत तालुक्यातील गावे वाट पाहतात जलवर्धिनीची

जलजागृती सप्ताहाचे वारे त्या गावांपर्यंत पोहोचलेच नाहीत

            कर्जत : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे यावर्षीही कर्जत (जि. रायगड) तालुक्यातील चाफेवाडी परिसरातील वीस गावांना जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण केले. या बाटल्यांसाठी जलवर्धिनीच्या कार्यकर्त्यांची वाट पाहणारे ग्रामस्थ पाहिल्यानंतर शासनाच्या जलजागृती सप्ताहाचे वारे या गावांपर्यंत पोहोचलेच नसल्याचेही सिद्ध झाले.
          
पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीतील ग
  शुद्ध पिण्याचे पाणी आणि ग्रामस्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या ग्रामस्थांना समजाव्यात, त्यांना पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार असला तरी ते मिळविण्यासाठी गाव स्वच्छ ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांना समजावे, अशा विविध उद्देशांनी राज्य शासनाने गेल्या महिन्यात विशेष जलजागृती सप्ताह आयोजित केला होता. ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांना सजग करण्याचा या सप्ताहाचा हेतू होता. पिण्याचे पाणी दूषित होण्यामागची कारणे लोकांना समजावून देणे, गावातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट जलस्रोतात सोडण्यापासून त्यांना परावृत्त करणे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची निगा राखणे
, विविध जलशुद्धीकरणाच्या पद्धतीचा वापर समजावून देणे असे उपक्रम राबवायचे ठरविण्यात आले होते. सप्ताह थाटात साजरा झाला, तरी ग्रामीण भाग मात्र या जागरणापासून किती दूर होता, हे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात जलवर्धिनी संस्थेला यावर्षीही दिसून आले.
पाणी साठविण्याचे महत्त्व लोकांना कळावे, यासाठी मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान ही संस्था गेली बारा वर्षे काम करत आहे. संस्थेचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी कमी खर्चात पाणी साठविण्याच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत. कर्जतजवळ कोंढणे गावी त्यांनी त्याचे संग्रहालय उभारले आहे. गावागावांमध्ये जाऊन त्याविषयी माहिती देत असताना त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात चाललेली वणवण दिसली. तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या सुरुवातीला दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठीही होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने या काळातील जलशुद्धीकरणाचे महत्त्व त्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. जलशुद्धीकरणामुळे अतिसार, हगवण, डायरियासारख्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांपासून संरक्षण होत असल्याचेही ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी २००६ पासून त्या भागातील दहा वाड्यांमधील प्रत्येक घराला जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण सुरू केले. शंभर मिलिची ही बाटली एका कुटुंबाला साधारणतः तीन महिने पुरते. अशा पद्धतीने दरवर्षी सुमारे ५०० बाटल्यांचे वितरण करण्यात येते. क्लोरीनच्या वापरानंतर जलजन्य साथींचे प्रमाण कमी झाल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. त्यासाठीच दरवर्षी जलवर्धिनीच्या कार्यकर्त्यांची वाट त्या गावांमध्ये पाहिली जाते.
गढूळ पाण्याने भरलेली विहीर
यावर्षी अधिक वाड्यावस्त्यांना क्लोरीनच्या बाटल्या पुरविण्याचे प्रतिष्ठानतर्फे ठरविण्यात आले. त्यानुसार २० वाड्यांना १२०० बाटल्या वितरित करण्यात आल्या. त्याकरिता नाना पालकर स्मृती समिती आणि अनेक वैयक्तिक दात्यांनी आर्थिक मदत केली. प्रारंभी ३ जुलै रोजी मोरेवाडी, ताडवाडी, चाफेवाडी, वडाची वाडी, पादीर वाडी, टेपाची वाडी या वाड्यांमध्ये सुनील मिश्रा आणि त्यांची मित्रमंडळी, विकास गोपाळ तसेच सौ. उत्तरा परांजपे यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. त्यानंतर ११ जुलैला विजय, जनार्दन, विकास आणि इतरांनी आनंदवाडी, भक्ताची वाडी, गावंडवाडी, खनाद, पिंगळास, फणसवाडीतील ग्रामस्थांना क्लोरीनच्या बाटल्या दिल्या. २३ जुलै रोजी बांगरवाडी, नांगुर्लेवाडी, डोरेवाडी, ठाकूरवाडी, पादिरवाडी, नागेची वाडी, पीटर वाडी, कशेळे या भागात रवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वितरण केले.
जलवर्धिनी प्रतिष्ठान ही सामजिक संस्था पाण्याच्या क्षेत्रात काम करते. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्जत तालुक्यातील काही गावे या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांची वाट पाहतात. अशा स्थितीत शासकीय यंत्रणेची काहीच जबाबदारी नाही का, असा प्रश्न पडतो. मोठा गाजावाजा आणि खर्च करून यावर्षी मार्च महिन्यात जलजागृती सप्ताह साजरा झाला. जलपूजनाचे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविले गेले. सप्ताह यशस्वी झाल्याचा दावा शासनातर्फे केला गेला. या यशापासून कर्जत तालुक्यातील ही गावे दूरच होती, हे सिद्ध झाले.

वाळूच्या खड्ड्यातील (डवरा) स्वच्छ पाणी
उल्हास नदीला मिळणाऱ्या विविध उपनद्यांच्या परिसरात ही गावे वसली आहेत. या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. ओढे, नद्या आणि विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात हे पाणवठे पाण्याने भरतात. मात्र हे पाणी गढूळ आणि दूषित असते. टंचाईनंतर उपलब्ध होणारे हे पाणी ग्रामस्थांकडून वापरले जाते. त्यातून जलजन्य साथी उद्भवतात. काही महिला त्यातल्या त्यात शुद्ध पाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. नदी आणि विहिरींचे पाणी गढूळ दिसते. त्याऐवजी पाणवठ्याजवळच वाळूमध्ये खड्डा (डवरा) खोदला, तर त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसते. ते वापरले जाते. मात्र गाळून आलेले हे पाणी शुद्ध असतेच, असे नाही. या गावांमध्ये शासनाने जाहीर केलेल्या जलशुद्धीकरणाच्या कोणत्याच पद्धती राबविला जात नसल्याने साथींचा प्रादुर्भाव होत आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या कार्याकडे शासनाच्या प्रतिनिधींनी लक्ष दिले, तर चांगला परिणाम साधला जाणार आहे.
.............................क्लोरीनच्या बाटल्यांचे वितरण करणारे उत्साही तरुण. सोबत उल्हास परांजपे, सौ. उत्तरा परांजपे................................
संपर्क - उल्हास परांजपे. विश्वस्त, जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई. 09820788061

No comments:

Post a Comment