Saturday, 30 July 2016

एसटीचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी

रत्नागिरी एसटीच्या रत्नागिरी विभागाचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी असल्याची कृतज्ञता अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त झालेली पाहताना अनेकांना गहिवरून आले.
एसटी विभागातून जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार शनिवारी (ता. ३० जुलै) स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यामध्ये विभाग नियंत्रकर कैलास देशमुख यांचाही समावेश होता. श्री. देशमुख यांना आमदार उदय सामंत आणि अधीक्षक अशोक यांच्या हस्ते मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आला. या वेळी विवेक भागवत, प्रमोद घाग, अंकुश पवार, अनिलकुमार जाधव, सतीश जोशी, मेहबूब दर्शवाल, सदानंद खरात, राजाराम लिंगायत, सूर्यकांत जाधव, प्रदीप सावंत, गजानन फडणीस, समाधान आखाडे या कर्मचार्‍यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे मुंबई प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, माजी महाव्यवस्थापक आर. सी. पाटील, मुंबईचे विभाग नियंत्रक श्री. सुपेकर व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मराठे, सौ. ज्योती देशमुख उपस्थित होते. आमदार श्री. सामंत म्हणाले की, मी पहिलाच असा अधिकारी पाहतो आहे की, सर्व कर्मचार्‍यांनी मिळून सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार केला. श्री. देशमुख यांनी लोकांशी चांगले नातेसंबंध जोपासले आहेत. ते एसटीतून निवृत्त होत असले तरी सार्वजनिक जीवनात त्यांची नवी इनिंग सुरू होणार आहे.
कार्यक्रमात अनेकांनी मनोगतामध्ये देशमुख यांच्या गुणगान केले. ते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जातात. यामुळेच ते गुरुस्थानी असल्याचे अनेकांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी सांगितले की, आर. सी. पाटील हे गुरुस्थानी आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळेच ३० वर्षे नोकरी करू शकलो.

सौ. राजलक्ष्मी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मुंबई, नगर, भोर, पुणे, मोहोळ, सटाणा, नाशिक, कोल्हापूर या एसटी आगारातून अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते.
.........................................................................................................
रत्नागिरी : एसटीतील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी. त्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मागे उभे आमदार उदय सामंत, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, कैलास देशमुख आदी.

No comments:

Post a Comment