रत्नागिरी : धामणसे (ता. रत्नागिरी) येथील
श्री रत्नेश्वर ग्रंथालयाला दानशूर (कै.) तात्या अभ्यंकर यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे
गेल्या वर्षभरात ३८ जणांचे प्राण वाचले. यात ६ अपघातग्रस्त आणि सर्प, विंचूदंश
झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. २५ आजारी रुग्णांना नेण्यासाठी व ७ जणांचे मृतदेह नेण्यासाठी
उपयोग झाला. धामणसे पंचक्रोशीत ही रुग्णवाहिका खऱ्या अर्थाने आधार देणारी आधार देणारी
ठरली आहे. ही रुग्णसेवा १४ जुलै रोजी दोन वर्षांची होत आहे.
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरीतील दानशूर व्यक्तीमत्त्व
तात्यासाहेब अभ्यंकर यांनी आई-वडील कै. नलिनी व गोविंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
ग्रंथालयास आठ लाख रुपये खर्चून रुग्णवाहिका दिली. दानशूर तात्यांचेही गतवर्षी निधन
झाले. मात्र तात्या आपल्या कार्यातून आजही धामणसे पंचक्रोशीवासीयांच्या हृदयात आहेत.
ग्रंथालय रुग्णवाहिका चालवते ही कोकणातील नव्हे महाराष्ट्रातील एकमेव गोष्ट म्हटल्यास
वावगे ठरणार नाही. धामणसे दशक्रोशीमध्ये ही रुग्णवाहिका खूपच उपयुक्त ठरत आहे. रुग्णवाहिकेने
सर्पदंश झालेल्या अनिता लोगडे व अपघातग्रस्त तुषार शिंदे यांना कमी वेळेत रुग्णवाहिकेने
रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याबद्दल या दोघांनीही (कै.) तात्या
व अभ्यंकर कुटुंबीयांबद्दल ऋण व्यक्त केले.
रुग्णवाहिका ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवली
जाते. धामणसे पंचक्रोशीतील नेवरे, धामणसे, खरवते, ओरी, निवेंडी
या गावातील रुग्णांना रत्नागिरी, गणपतीपुळ्यातील रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे
लागत होते. मात्र आता ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामस्थांना चांगलाच उपयोग होत
आहे. रुग्णवाहिकेवर विनय पांचाळ, महेश पांचाळ, विजय
निवेंडकर, विजय इरमल, वैभव
वारशे, नेवरे येथील प्रणिल शिंदे, सागर
कोलगे, प्रवीण आयरे यांनी चालक म्हणून सेवा बजावली. रुग्णवाहिकेचे
व्यवस्थापन ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, उपाध्यक्ष
विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, सदस्य
मोहन पवार, प्रशांत रहाटे, सुनील
लोगडे, सौ. स्मिता कुलकर्णी यांच्यासह ग्रंथपाल केशव कुळकर्णी,
अविनाश लोगडे, सुरेश लोगडे हे करत आहेत.
..............
रुग्णवाहिका मागविण्याकरिता संपर्क क्रमांक –
१)
अविनाश लोगडे – ७७९८५४०५८५
२) केशव
कुलकर्णी – ९७६४२१४४३३
....................
No comments:
Post a Comment