Wednesday, 27 July 2016

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळातर्फे रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताह


         रत्नागिरी - येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून
कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. कीर्तन सप्ताह ३ ते ९ ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३०
या वेळेत मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
        सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ३ ऑगस्टला आंजर्ले-दापोली येथील विजय निजसुरे यांचे कीर्तन होईल.
बुलंद बुरूज या आख्यान विषयावर कीर्तन करतील. त्यांनी (कै.) संजय जोशी (मुर्डी) यांच्या प्रेरणेने सन २००२
पासून  कीर्तनाचा अभ्यास केला. आजपर्यंत त्यांची ३८७ कीर्तने केली.
        चिपळूणचे प्रसिद्ध कीर्तनकार महेश काणे हे दत्तभक्त शेतकरी विषयावर ४ ऑगस्टला कीर्तन करतील.
हभप कै. नरेंद्र हाटे हे त्यांचे कीर्तनातील गुरू, डॉ. कविता गाडगीळ गायनातील गुरू. संगीत विशारद, देवर्षी
 नारद, कीर्तन केसरी, कीर्तन विशारद, कीर्तन भास्कर या पदव्यांनी ते सन्मानित आहेत. आकाशवाणी मुंबईचे
बी ग्रेड कलाकार आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांत सुमारे
दोन हजार कीर्तने केली आहेत.
        देवरूखचे युवा कीर्तनकार हभप कुमार विष्णू भाट्ये यांचे सुधन्वा चरित्र यावर ५ ऑगस्टला आख्यान
होईल. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण झाले. ते काही वर्षांपासून कीर्तनाचा व्यासंग उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
अनेक ठिकाणी कीर्तनसेवा केली आहे.
        पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या शिष्या सौ. रेशीम मुकुंद खेडकर (मरकळे) यांचे
संत सावतामाळी या विषयावरचे कीर्तन ६ ऑगस्टला होईल. सौ. खेडकर बीकॉम, जीडीसी अँड ए असून
एमए-संगीत, हार्मोनियम विशारद पदव्या प्राप्त आहेत. १९९९ पासून त्या कीर्तन शिक्षण घेत असून श्री हरी
कीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथे पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २००३ पासून आफळे यांच्याकडे कीर्तनाचे
शिक्षण सुरू झाले. त्या पायपेटी, ऑर्गनची उत्तम साथसंगत करतात. युवती, गानकोकिळा, संगीत प्रमोदिनी
या कीर्तनातील पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आत्तापर्यंत त्यांची महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, लखनौ,
कोलकाता, अहमदाबाद, बडोदा, ग्वाल्हेर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे ५५० कीर्तने झाली.
        पुण्याच्या युवा कीर्तनकार हभप सौ. संज्योत संजय केतकर (पूर्वाश्रमीच्या उत्कर्षा जावडेकर) यांचे
महानंदा यावर आख्यान ७ ऑगस्ट रोजी होईल. सौ. केतकर यांना बीए-संस्कृत ही पदवी प्राप्त असून
तबलावादनाच्या पाच परीक्षा उत्तीर्ण आहेत. १२ वर्षे चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार उद्धव
जावडेकर, हभप भिडे, नारद मंदिर, पुणे येथे त्यांचे कीर्तनाचे शिक्षण झाले आहे. तसेच आई, बहीण,
पं. शरद गोखले यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन मिळाले. नारद मंदिराचा युवती कीर्तनकार हा पुरस्कार
त्यांना प्राप्त आहे. त्यांनी आतापर्यंत १०० कीर्तन केली आहेत.
        मीरा रोड, ठाणे येथील कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचे ८ ऑगस्टला पार्थरथी हनुमान यावर
कीर्तन होईल. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून मध्य प्रदेश विद्युत मंडळ, टेक्स्टाईल मिलमध्ये त्यांनी नोकरी केली.
सन २००३ ते २००६ पर्यंत अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर (मुंबई) येथून हभप श्रीधर भागवत यांच्या
मार्गदर्शनाखाली कीर्तनालंकार हा पाठ्यक्रम पूर्ण केला. गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरातमध्ये
त्यांची ४०० कीर्तने, प्रवचने झाली. २००८ मध्ये लंडन, २०१० मध्ये स्वित्झर्लंड येथे कीर्तने केली.
        राजापूरचे कीर्तनकार दत्तात्रय रानडे हे मानाची पालखी या विषयावर ९ ऑगस्टला कीर्तन करतील.
ग्रंथ हेच गुरू समजून कीर्तन तरंगिणी शिरवळकर बुवांची पुस्तके व अन्य ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी
कीर्तनविद्या आत्मसात केली. दत्तदास घाग, आफळेबुवा, रामचंद्र भिडे, नाना जोशी, पाटणकरबुवा,
वीरकरबुवा यांना त्यांनी कीर्तनातील आदर्श मानले आहे.
        कीर्तन सप्ताहाला ऑर्गनची साथ वाटद-खंडाळा येथील प्रसिद्ध वादक राजेंद्र भडसावळे,
तबलासाथ कशेळी-राजापूर येथील वादक आनंद ओळकर करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व
कीर्तनांच्या लाभ सर्व कीर्तनप्रेमींनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे
कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य व मंडळाचे सर्व
पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
......................
 

No comments:

Post a Comment