Tuesday 5 July 2016

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहनरत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१६ मध्ये घोषित होणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात आले आहेत. हे सर्व पुरस्कार कोमसापचे कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत.
प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समीक्षा, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.
विशेष सात पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कर, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अरुण नेरूरकर, ९९९, पार्वती सदन, मसुरेकरनगर, जेलरोड, रत्नागिरी यांच्याकडे पाठवाव्यात. त्यासाठी लागणारा अर्ज आणि माहितीपत्रकासाठी keshavsutsmarak@rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. पुस्तके १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. पूर्वी पाठवलेली पुस्तके पुन्हा पाठवण्याची गरज नाही. मुदत असेपर्यंत वा मुदत संपेपर्यंत एकदा पाठवलेले पुस्तक पुरस्कारासाठी विचारात घेतले जाईल.


No comments:

Post a Comment