Saturday 13 August 2016

अनाथ, आर्थिक मागास, निराधारांसाठी निवास-भोजनासह मोफत शिक्षण

राज्यभरातील विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी जिल्ह्यात तळगाव येथे हक्काचे ठिकाण


-    तळगाव (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील परिमल गुरुकुल
रत्नागिरी : राज्यभरातील अनाथ, आर्थिक मागास आणि निराधारांसाठी निवास-भोजनासह मोफत माध्यमिक शिक्षणाची सुविधा रत्नागिरी जिल्ह्यात तळगाव (ता. राजापूर) येथे उपलब्ध झाली आहे. शिकण्याची आस असूनही आर्थिक स्थितीमुळे ते थांबवावे लागणाऱ्यांसाठी हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे. जातपात, धर्म, पंथ अशा कोणत्याही अडथळ्यांविना या परिमल गुरुकुलात मोफत प्रवेश मिळणार आहे. वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्रात आजही सामान्य कष्टकरी व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकर्‍यांची वाताहत होत आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि अनाथ, निराधार मुलांसाठी श्री वारणा शिक्षण संस्थेने विनामूल्य शिक्षण, भोजन या सामाजिक उपक्रमांतर्गत वसतिगृह योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. या योजनेनुसार शिक्षणासाठी तसेच भोजन आणि निवासासाठीही कोणतीही फी आकारली जाणार नाही. तळगाव (ता. राजापूर) येथे आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
बाजीराव बाळाजी पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ७१ मध्ये वारणा शिक्षण संस्था सुरू केली. गेल्या ४५ वर्षांत या छोट्याशा गावात डोनेशन मिळणाऱ्या शाखांची किंवा शहरामधील शाखांची निर्मिती न करता शिक्षणापासून वंचित असलेल्या ग्रामीण परिसरातील मुलामुलींसाठी शिक्षणाची दालने खुली करण्याचा प्रयत्न कोणतेही राजकीय अथवा संस्थात्मक पाठबळ नसलेल्या वारणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला गेला. १९९५ नंतर संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांच्या प्रयत्नांतून वारणकाठच्या डोंगरी भागातील ऐतवडे खुर्द (जि. सांगली) या साडेसात हजार लोकसंख्येच्या गावात शैक्षणिक कार्याला चालना देण्यात आली. मुलींना शिक्षणाची गरज म्हणून १९९५ मध्ये कनिष्ठ आणि २००० मध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे या परिसरातील मुली पदवीधर होऊ लागल्या. निमशासकीय आणि शासकीय सेवेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुली यशस्वी होऊ लागल्या. तेथेच गेल्या १० वर्षांपासून विनामूल्य शिक्षण, विनामूल्य भोजन योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा जोपासली आहे.
संस्थेने तळगाव येथे सन २००१ मध्ये ग्रामीण डोंगरी भागातील मुलांसाठी आठवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली. या सर्वांना मोफत शिक्षण दिले जाते. सध्या येथे ८४ विद्यार्थी शिकत आहेत. आता नव्याने वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. परिमल गुरुकुल असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तेथे राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून शिक्षणापासून वंचित, अनाथ विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षणासह निवास, भोजन व्यवस्था देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात अकरावी, बारावी व तंत्रशिक्षण दिले जाणार आहे.
या संस्थेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृह प्रवेशासाठी डॉ. सूरज चौगुले (३७१४५६२८), प्रा. भारत उपाध्ये (९९२१८०८२८६) यांच्याशी संपर्क साधावा.
      संस्थेने आजवर घेतलेल्या दत्तक विद्यार्थ्यांविषयीची माहिती www.parimalgurukul.org या संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच parimalgurukull@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
..................

No comments:

Post a Comment