गांधीजींनी
पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील
स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे अजूनही तेव्हाच्या आठवणींनी रोमांचित होतात आणि
मंतरलेले ते दिवस त्या आजही जगत असल्याची जाणीव होते.
रत्नागिरीत १५ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या आशाताई पाथरे (पूर्वाश्रमीच्या इंदुताई भिकशेठ गांधी) यांना त्यांच्या वडिलांनी
मुलींच्या शिक्षणाबाबत
प्रतिगामी विचार असलेल्या त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी
सांगलीला पाठवलं. तिथं विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना ९
ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाच्या दिवशी निघालेल्या मोर्चात त्या सहभागी
झाल्या. पोलिसांनी मोर्चा
अडविला. लाठीमार केला. तेव्हा त्यांचा सहकारी मित्र मधू पोंक्षे याला वाचविण्याचा
प्रयत्न आशाताईंनी केला. मात्र या आंदोलनात सहभागी झाल्यानं त्यामुळे सांगलीचं कॉलेज सोडावं लागलं. पुढच्या
शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. महात्मा गांधींनी डांबून ठेवलेल्या आगाखान
पॅलेसवर मिनू मसानी यांच्या
नेतृत्वाखाली काढलेल्या
मोर्चात त्या सहभागी झाल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि येरवडा इथं महिला कारागृहात कारावास भोगावा लागला. तिथून सुटका
झाल्यानंतर आंदोलकांना गुप्त पत्रकं
पोहोचविण्याचं जोखमीचं कामही त्यांनी केलं.
आशाताईंनी वयाची ९५ वर्षं नुकतीच पूर्ण केली आहेत. एवढ्या वयातही
स्वातंत्र्यलढ्याचा विषय काढताच त्या अतिशय रोमांचित झाल्या. तेव्हाचे दिवस किती मंतरलेले
होते, ते त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या मोर्चाविषयी अतिशय खणखणीत आवाजात त्या म्हणाल्या,
९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीचा डोंब उसळला, महात्माजींनी देशाला
ब्रिटिशांना ‘चले
जाव’चा आदेश दिला. आम्ही मिनू मसानींच्या मोर्चात सहभागी
झालो. ब्रिटिशांनी चालतो व्हा, इन्किलाब झिंदाबाद, करेंगे या मरेंगे, ब्रिटिशांनो,
चालते व्हा अशा घोषणा देत मोर्चा निघाला होता. मोर्चा चालू असताना आमची धरपकड
झाली. तिथून मला येरवड्याच्या महिला जेलमध्ये नेण्यात आलं. तिथे नेल्यानंतर स्पेशल
मॅजिस्ट्रेटपुढे केस चालविण्यात आली आणि मला देशद्रोहाच्या आरोपाखाली ३ महिने शिक्षा
झाली. सक्तमजुरीची. मग मला जेलमध्ये डांबण्यात आलं. बाहेरून मोठं कुलूप होतं. जेलमध्ये
पाण्याचा अभाव होता. खाण्याला बटाट्याची भाजी. त्यात किडी. त्या काढून टाकायच्या
आणि खायचं. दुसरं काही मिळायचंच नाही. अशा तऱ्हेने आम्ही दिवस काढले. अशा तऱ्हेने
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आम्ही त्रास घेतला. नवीन पिढीनं देशाशी एकनिष्ठ राहून
हे स्वातंत्र्य यावचंद्रदिवाकरौ टिकवावं, अशी माझी इच्छा आहे. नवी पिढीनं जगामध्ये
देशाला उच्च स्थान द्यावं. देशाची प्रामाणिक राहून देशाची मान जगात उच्च स्थानावर न्यावी.
-
प्रमोद कोनकर
-
pramodkonkar@yahoo.com
................
संदर्भ – ते मंतरलेले
दिवस. संकलन – डॉ. रोहिणी गवाणकर, नंदा आपटे. प्रकाशक – मणि भवन गांधी संग्रहालय,
१९, लॅबर्नम रोड, मुंबई – ४००००७. (किंमत १०० रुपये)
No comments:
Post a Comment