Monday, 18 April 2016

संस्कृत समजत नाही हा आपला पराभव – धनंजय चितळेरत्नागिरी : संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची मूळ भाषा म्हणजेच जननी आहे. ती समजायला कठीण नाही. तरीही ती आजकाल आपल्याला समजत हा आपला पराभव आहे, असे मत प्रवचनकार धनंजय चितळे (चिपळूण) यांनी येथे व्यक्त केले.
     
रत्नागिरी – गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या
शतक महोत्सव समारंभात प्रवचन करताना धनंजय चितळे.
शेजारी विनायक पोखरणकर सर आणि पुण्याचे पं. शिवराम कृष्ण धायगुडे.
रत्नागिरीच्या गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पहिल्या दिवशीच्या (ता. १७) दुसऱ्या सत्रात प्रवचन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विनायक पोखरणकर सर आणि पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे उपस्थित होते. भाषासु मुख्या मधुरा हा चितळे यांच्या प्रवचनाचा विषय होता. ते म्हणाले, संस्कृत शिकण्यासाठी इंग्लंड, जर्मनीतून लोक येतात. भारतात शिकून जातात आणि स्वदेशी जाऊन संशोधन करतात. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्दैवी आहे. संस्कृत ही देशाभिमान जागृत करणारी भाषा आहे. संस्कृत साहित्यामध्ये अभ्यास
करण्यासाठी भरपूर सूत्रे उपलब्ध आहेत. यज्ञवेदी कशी अशावी, ती चौकोन, त्रिकोण इत्यादी आकारात कशी उभारावी. जमिनीचे उतार, चढाव कसे असावेत, या उल्लेख शास्त्रात आहे. त्यावरूनच भूमिती या विषयाचा विस्तार झाला. सध्या भूमितीमध्ये पायथॅगोरस, युक्लिड इत्यादी पाश्चात्यांचे उल्लेख येतात. पण सर्वप्रथम भूमिती शिकविणाऱ्या भारतीय भास्कराचार्यांचा उल्लेख नाही. कोपर्निकस, गॅलिलिओ हे खगोलशास्त्राचे जनक असल्याचे मानले जाते. त्याआधी ज्ञानेश्वरीत 'जैसे सूर्याचे न चालण्यावाचून चालणे' असा उल्लेख आहे. त्याचाच  अर्थ कोपर्निकसच्या कितीतरी आधी ज्ञानेश्वरांना सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याभोवती फिरते, हे माहीत होते.
      संस्कृतमधील भूगोलाच्या अभ्यासाविषयी श्री. चितळे म्हणाले, भूगोलाविषयी विविध विषय हल्ली शाळांमधून शिकविले जातात. ते पाश्चात्य ज्ञानावर आधारित असतात. परंतु पराशर ऋषींनी ढगांचे आवर्त, संवर्त इत्यादी ९ प्रकार सांगितले आहेत. त्यातील ३ प्रकारचे ढग पाऊस पाडतात. हे संशोधन आज उपलब्ध आहे. विहिरी, नद्या, कालवे, मेघ यांच्या गर्जना, पाऊस पाडण्याचे ज्ञान असणाऱ्या सर्वांना नमस्कार केल्याचा उल्लेख रुद्र संहितेते आहे. याचाच अर्थ त्या काळी पाऊस पाडणे आणि थांबवण्याचे ज्ञान असणारे तज्ज्ञ होते. आज हे ज्ञान उपलब्ध नाही. या क्षेत्रात संशोधनाला वाव आहे. संस्कृतमधील ग्रंथांचा अभ्यास करून हे संशोथन करणे शक्य आहे.
      आज माहितीचे मायाजाल उपलब्ध आहे. पण भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये स्वानुभवीत ज्ञानाला महत्त्व असल्याचे सांगून श्री. चितळे म्हणाले, जे अभ्यासाने प्राप्त होते ते खरे ज्ञान होय. ओपनहायमर आणि रॉबर्ट यांनी प्रथम अणुचाचणी घेतली, तेव्हा त्यांना भगवद्गीतेतील श्लोकाचाच अनुभव मिळाला. सहस्र सूर्य एकाच वेळी आकाश प्रकाशित झाले आहेत, असा उल्लेख गीतेत आहे. तसेच भासल्याचा उल्लेख त्यांनी अशा ब्रायटर दॅन वन थाउजंड सन्स शब्दांत आपल्या पुस्तकात केला आहे. हा अनुभव जयंत नारळीकरांनी आपल्या पुस्तकात लिहिला आहे. आपण सध्या झाडे लावण्याबाबत जनजागृती करतो. पण जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये झाडे लावण्याचे आवाहन अनेकदा केलेले आढळते.
      संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते. भाषा शुद्ध होते. कोण्या एखाद्या वर्णाची नसून सर्वांना खुली असलेल्या या भाषेत गोडवा आहे. संस्कृतमधील हजारो सुभाषिते आजही व्यवहारज्ञान शिकवितात. अशी थोरवी असलेली संस्कृत भाषा शिकण्याचा, अभ्यास करण्याचा आणि ती व्यवहारात आणण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे, असे श्री. चितळे यांनी सांगितले.
...........

No comments:

Post a Comment