रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे येत्या ३०
एप्रिल रोजी रत्नागिरीत सिटिझन जर्नालिझमविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण भोंदे यांनी आज (दि. १६ एप्रिल) रत्नागिरीत
ही माहिती दिली.
सामाजिक समस्या
सोडविणे हे पत्रकारितेचे प्रमुख कार्य असते. संपादकीय आणि अन्य लेखांमधून
वृत्तपत्रे तसेच अलीकडच्या काळात विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून विविध
समस्या, घटना-घडामोडींविषयी
भाष्य केले जाते. सामान्य वाचकही त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया वृत्तपत्रांमधील
वाचकांच्या पत्रांमधून व्यक्त करत असतो. अनेक सजग वाचक पत्रांमधून समस्या मांडतात.
तसेच अग्रलेख आणि लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अलीकडे
वृत्तपत्रांची बदललेली संपादकीय धोरणे आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे
वृत्तपत्रीय पत्रांचे प्रमाण कमी झाले असून स्वरूपही बदलले आहे. तरीही समाजमन
समजून घेण्यासाठी वाचकांची पत्रे हे महत्त्वाचे माध्यम असते. अशी पत्रे लिहिणाऱ्या
लेखकांचे संघ मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. छोट्या शहरांमध्ये
मात्र पत्रलेखन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त होत
नाहीत. मुळातच पत्र लिहिणे ही एक कला असून मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच
छोट्या शहरांमध्येही ही अभिव्यक्ती वाढीला लागावी, या उद्देशाने विश्व संवाद केंद्रातर्फे
कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे श्री. भोंदे यांनी सांगितले.
कार्यशाळा तीन
तासांची असेल. त्यामध्ये व्हॉट्स अपसारख्या समाजमाध्यमांवर व्यस्त असणाऱ्या आजच्या
पिढीतील तरुण-तरुणींबरोबरच अनुभवी आणि समाजहितैषी ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी
करून घेतले जाईल. पत्रकारिता म्हणजे काय, वाचकांची पत्रे मोजक्या शब्दांत कशी लिहावीत
आणि ब्लॉग, ट्विटर, फेसबुकसारख्या
प्रभावी समाजमाध्यमांवर नेमकेपणाने कसे लिहिता येईल, याविषयीचे प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल.
तरुण-तरुणी, पत्रकार आणि
ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच कार्यशाळेत प्रवेश खुला आहे. सहभागासाठी इच्छुकांनी
प्रशांत कदम (मोबाइल – ७७६८०७४२०१) किंवा रवींद्र भोवड (९१५८१३५८८३) यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
.........
No comments:
Post a Comment