रत्नागिरी : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ
मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या (दि. १६) चतुःषष्टी राजोपचार
पूजन होणार आहे.
पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन
तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचा
गाभारा, कळस आणि मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मंदिरात पंचकुंडी
यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा पहिला वर्धापनदिन शनिवारी साजरा
करण्यात येणार आहे. षोडशोपचार पूजनानंतर राजोपचार पूजा केली जाते. त्यामध्ये
मंगलाचरण, गायन, कीर्तन, नाट्य आदी कलांचा आविष्कार, तसेच छत्र, चामरांसह हत्ती,
घोडे, रथातून मिरवणूक काढली जाते. पूर्वी राजेरजवाडे आणि संस्थानिकांकडे असे पूजन
केले जात असे. आता दुर्मिळ झालेल्या राजोपचाराद्वारे पल्लीनाथाचे पूजन केले जाणार
आहे.
वर्धापनदिनानंतर दुसऱ्या दिवशीपासून सहा दिवस
पल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२
एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पंचायतन याग, सौरयाग, मंत्रजागर, रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक
कार्यक्रम तसेच कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व
कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले
आहे.
No comments:
Post a Comment