Friday 15 April 2016

रत्नागिरीतील संस्कृत पाठशाळेचा रविवारपासून शतक महोत्सव



रत्नागिरी :  रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा शतक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारपासून (दि. १७ एप्रिल) करण्यात आले आहे. पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी आज (दि. १५ एप्रिल) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरीच्या वेदशाळेत १९१४ साली पाठशाळेची सुरवात झाली. गोविंद कृष्ण रानडे यांच्या भरीव देणगीतून विश्वस्त मंडळाने २२ जून १९१६ रोजी संस्कृत पाठशाळेची रीतसर नोंदणी केली. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता सत्कार समारंभ, स्मरणिका प्रकाशन आणि निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि पुण्यातील संस्कृत विद्वान पं. शिवराम कृष्ण धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी ६ वाजता चिपळूणचे धनंजय चितळे यांचे भाषासु मुख्या मधुरा या विषयावर प्रवचन होईल. सोमवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, सायंकाळी ५ वाजता हभप प्रा. नरहर चिंतामणी अपामार्जने यांचे कीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपरंपरेनुसार बाळशास्त्री गाडगीळ, व्याकरणाचार्य पुरुषोत्तम नारायण फडके, व्याकरणरत्न बाळकृष्णशास्त्री हर्डीकर, काव्यतीर्थ दामोदर गोपाळ जोशी, काव्यतीर्थ विनायक नारायण पोखरणकर इत्यादी विद्वानांनी पाठशाळेत संस्कृत अध्यापन केले. कालौघात गुरुपरंपरा आणि संस्कृतचे अध्यापनही पाठशाळेत होत नाही. मात्र पाठशाळेच्या शतकोत्सवाच्या औचित्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. शाळामहाविद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून संस्कृत शिकविले जाते. अभ्यासक्रमानुसार प्रश्नोत्तरेही मराठीतच दिली जातात. त्यामुळे हमखास गुण मिळवून देणारा विषय एवढेच संस्कृतचे महत्त्व राहिले आहे. परिणामी मूळ संस्कृत ग्रंथ वाचले आणि अभ्यासले जात नाहीत. त्यासाठी पाठशाळेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. मूळ संस्कृत भाषेचे ज्ञान घेण्याची प्रवृत्ती वाढावी, यासाठी हे प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाठशाळेत जुने २०० संस्कृत ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथ दुर्मिळ आणि जीर्ण झाले आहेत. त्या सर्वांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्या सर्व प्रकल्पांसाठी संस्कृतप्रेमींनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रा. कल्पना आठल्ये आणि श्री. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment