Wednesday, 30 December 2015

रत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव

     चारुदत्त आफळे यांची कीर्तनमालिका


रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा यावर्षीचा कीर्तनसंध्या महोत्सव येत्या ६ ते १० जानेवारी या काळात रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे.
              सत्य इतिहासाची ओळख करून देणारा, सामाजिक प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाय सांगणारा, लहान मुलांना संस्कारांचे महत्त्व पटवून देणारा आणि सर्व वयोगटातील माणसांना आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचे महत्त्व समजावून सांगणारा बहुआयामी कीर्तन महोत्सव येथील कीर्तनसंध्या संस्था गेली पाच वर्षे आयोजित करत आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची ही कीर्तनमालिका उत्तरोत्तर रंगत जाते, असा अनुभव रसिकांनी घेतला आहे. कीर्तन महोत्सवातून समाजप्रबोधन केले जात असून त्याचे पहिले पुष्प २२ ते २४ जून २०१२ या काळात गुंफले गेले. त्यावेळी संभाजी महाराजांचे चरित्र असा विषय होता. या महोत्सवाला दररोज ६०० ते ७०० कीर्तनप्रेमी उपस्थित होते. पुढच्या वर्षी २२ ते २४ जानेवारी २०१३ या काळात सुभाषचंद्र बोस या विषयावरचा कीर्तन महोत्सवही रंगला. या महोत्सवाला दररोज १५०० ते १८०० रसिक श्रोते उपस्थित राहत होते. नंतरच्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१४ या काळात आफळेबुवांनी शिवचरित्र हे आख्यान सादर केले. दररोज किमान चार हजार श्रोत्यांची उपस्थिती या महोत्सवाला लाभली. गेल्या वर्षी १ ते ५ जानेवारी २०१५ या काळात स्वराज्याकडून साम्राज्याकडे या विषयावर झालेल्या कीर्तन महोत्सवात ५५०० कीर्तनप्रेमी दररोज उपस्थित राहत होते.
         पाचवा कीर्तन महोत्सव यावर्षी ६ ते १० जानेवारी २०१६ या काळात होणार आहे. यावर्षी शिर्के प्रशालेऐवजी आठवडा बाजाराजवळच्या प्रमोद महाजन क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे. वेळ सायंकाळी ६ ते १० अशीच आहे. यावर्षी मराठेशाहीची देशव्यापी झुंज असा विषय राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे उलगडणार आहेत. पानिपतच्या लढाया आणि १८५७ पर्यंतच्या काळाचा आढावा आफळेबुवा घेणार आहेत.
        आफळेबुवांना तबलासाथ कणकवलीचे प्रसाद करंबेळकर, ऑर्गनसाथ चिपळूणचे हर्षल काटदरे आणि पखवाजसाथ राजा केळकर करणार आहेत. एस. कुमार्स साऊंड सर्व्हिसेस आणि ओम साई मंडप डेकोरेटर्सचे बहुमोल सहकार्य कीर्तन महोत्सवला लाभणार आहे. कीर्तनसंध्येसाठी सर्व श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य आहे. देणगीदारांसाठी सन्मानिका उपलब्ध आहेत.
          गेल्या वर्षीच्या कीर्तनांच्या ऑडिओ सीडी तसेच अनंततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले आणि सत्त्वश्री प्रकाशनतर्फे पुनर्मुद्रित केलेले झोपाळ्यावरची गीता हे पुस्तक कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 या कीर्तनमहोत्सवाचा आस्वाद रत्नागिरीतील जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने अवधूत जोशी, नितीन नाफड, रत्नाकर जोशी, मकरंद करंदीकर, उमेश आंबर्डेकर, गुरुप्रसाद जोशी आणि योगेश हळबे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment