Sunday 27 December 2015

रत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन



रत्नागिरी - अठ्ठाविसावे सावरकर साहित्य संमेलन येत्या जानेवारीत रत्नागिरीत होणार आहे. मुंबईतील सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या सहकार्याने रत्नागिरीच्या (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे हे संमेलन होणार आहे. तीन दिवसांच्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते २९ जानेवारीला होणार असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारीला समारोप होईल. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.
सावरकर चरित्राचे तसेच साहित्याचे अभ्यासक दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली १८७ वर्षांचा इतिहास लाभलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात हे संमेलन होईल. संमेलनात परिसंवाद, चर्चासत्राबरोबर सावरकरांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र, भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान, सावरकरांच्या घराण्याची देशभक्ती, "अनादी मी अवैध मी" या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर "वक्ता दशसहस्रेषु" या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा होईल. "आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण" या विषयांतर्गत "भारताची परराष्ट्र नीती" तसेच भारत आणि चीन सीमेवर होत असलेली घुसखोरी यासारख्या विषयांचा समावेश आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.
सावरकरांनी विस्तृत लिखाण केले आहे. त्यांचे साहित्यातील विचार, तत्त्वचिंतन, साहित्यातील विविध पैलू उलगडण्याबरोबर त्यांच्या साहित्यातील देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन नव्या पिढीला व्हावे, यासाठी हे संमेलन घेण्यात येणार आहे. सावरकरप्रेमी, साहित्यप्रेमी नागरिकांनी आणि विशेषत: तरुण मंडळीनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment