Friday, 11 December 2015

खवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू
वेंगुर्ले – तालुक्यातील खवणे येथील खवणेश्वर आणि म्हापण येथील श्री देवी सातेरीमातेचा वार्षिक जत्रोत्सव आज (ता. ११ डिसेंबर १०१५) मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा असा खवणेश्वराचा नावलौकिक सर्वदूर आहे. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्र किनारपट्टीवर जाताना वाटेत श्री देव  खवणेश्वराचे भव्य दिव्य मंदिर आहे. खवणे किनारपट्टीवर फिरायला जाणारे-येणारे पर्यटक किंवा अन्य लोक खवणेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. खवणेश्वोराचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. रात्री पालखी सोहळा पाहण्यास व फटाक्यांची आतषबाजी बघण्यासाठी अलोट भक्तांची गर्दी लोटते.
खवणेश्वराची बहीण म्हापण येथील श्री देवी सातेरी आपल्या भावाला भेटण्यासाठी पालखीतून ढोलताशांच्या गजरात आज खवणेश्वराच्या वार्षिक जत्रोत्सवादिवशी सायंकाळी उशिरा मंदिराच्या परिसरात अंगणात येते. ती खवणेश्वराचा जत्रोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री देवी सातेरीमातेची पालखी रात्रभर श्री देव खवणेश्वोच्या मंदिराच्या अंगणात ठेवली जाते. तेथेच रात्री दशावतारी नाटक सादर केले जाते. खवणे गावातील महिला पालखीत स्थानापन्न झालेल्या श्री सातेरीदेवीची ओटी भरतात. भक्तमंडळी देवीचे दर्शन घेतात.
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सातेरीदेवीची पालखी खवणे गावातून ढोलताशांच्या गजरात पुन्हा म्हापण येथील श्री देवी सातेरीदेवीच्या मंदिरात  जाते. हाही सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो.

(आबा खवणेकर – ९४२३८३२८८६)
 

1 comment:

  1. https://www.loksatta.com/blogs/jain-pilgrimage-centres-of-south-konkan-svs-89-3563830/

    ReplyDelete