स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची कणकवलीत माहिती
कणकवली : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हे प्रथमच संमेलनाच्या निमित्ताने स्वागत
समितीच्या नियोजनानुसार मुलाखत देणार
आहेत.
त्यांच्या आणि देशातील अन्य आठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखतीचा काही भाग संमेलनाच्या
मंचावरून प्रसारित करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.
डी. पाटील यांनी येथे दिली.
पिंपरी येथे भरणार असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे
निमंत्रण सिंधुदुर्गवासीयांना देण्यासाठी डॉ. पाटील नुकतेच कणकवली येथे आले होते. त्यावेळी
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुरत्न फाऊंडेशनतर्फे येथील नीलम कंट्रीसाइड येथे त्यांची पत्रकार
परिषद झाली. यावेळी डॉ. पाटील यांनी प्रथमच संमेलनाच्या प्रसारासाठी मोबाईल ॲप बनविण्यात आल्याचे सांगितले. जिंगलही
बनविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुळकर्णी, सचिन
येतकर, कवी अरुण शेवते आदी
उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, संमेलन फक्त भव्य व्हावे, असाच
उद्देश नाही, तर ते वैचारिकदृष्टय़ा
अधिक चांगले व्हावे, असाही आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच देशातील
विविध भाषांतील नऊ ज्ञानपीठ पुरस्कार
विजेत्या
लेखकांच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेण्यात येणार आहेत. त्यातील काही भाग संमेलनात प्रसारित
करण्यात येणार आहे. यात डॉ. नेमाडे
यांची
मुलाखतही घेण्यात येणार असून ते प्रथमच संमेलनाच्या निमित्ताने अशी मुलाखत देत आहेत. आठ ज्ञानपीठ विजेते
साहित्यिक साहित्य संमेलनाला उपस्थित
राहणार
आहेत.
‘माझी संस्कृती-माझा
अभिमान’ असा विचार ठेवून हे संमेलन आयोजित करण्यात
येत आहे. हिंदी कवी गुलजार आणि मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी गुलजार यांची, दुसऱ्या दिवशी शरद पवार यांची, तर तिसऱ्या दिवशी चेतन भगत यांची मुलाखत होणार आहे. संमेलनात
बारा परिसंवाद आणि निमंत्रितांची दोन कविसंमेलनेही
आयोजित करण्यात आली आहेत. संमेलनानिमित्त अभिनव विद्यापीठात कायमस्वरूपी मराठी अध्यासन
सुरू करण्यात येणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. संमेलनात साहित्य
आणि समाज यांची सांगड घालण्यात आली आहे.
संमेलनातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना
७० लाख रुपये देण्यात
येणार आहेत, असे
स्वागताध्यक्षांनी सांगितले.
No comments:
Post a Comment