Tuesday 29 September 2015

नाटे ग्रामस्थांनी सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नचाकरमान्यांचा पुढाकार – गणेशोत्सव सत्कारणी, जलवर्धिनीचे मार्गदर्शन


रत्नागिरी : नाटे (ता. राजापूर) येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि वर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भराडीणवाडी (मधली वाडी) येथील ग्रामस्थांनी चाकरमान्यांच्या पुढाकारातून दहा हजार लिटर क्षमतेची फेरोसिमेंटची टाकी अवघ्या तीन दिवसांत बांधून पूर्ण केली. यावर्षीचा गणेशोत्सव चाकरमान्यांनी सत्कारणी लावला.
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे पाणी साठविण्याबाबत माहिती देतात. मुंबईतील वॉटर वर्क्स असोसिएशनचे ते सदस्य असून या संस्थेतही ते पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शन करतात. अत्यंत कमी खर्चात स्थानिक वस्तूंचा वापर करून फेरोसिमेंटची मजबूत टाक्या कशा बांधता येतात, याची प्रात्यक्षिकेही त्यांनी दाखविली. संस्थेचे एक कर्मचारी महादेव घाडी यांनी ही प्रात्यक्षिके अनेकदा पाहिली आणि आपल्या गावातही पाणी साठविण्याचा हा प्रयोग करायचे ठरविले. ती कल्पना त्यांनी गावातील मधली वाडी नवतरुण मंडळासमोर ठेवली. मंडळातील तरुणांनी ती उचलून धरली. वाडीतील २३ घरांसाठी पाणी योजना तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. मंडळाचे मुंबईतील कार्यकर्ते गिरीश शिंदे तसेच इतर चाकरमानी आणि ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाला गावाला गेल्यानंतर टाकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
ठरल्यानुसार उत्सवाच्या काळातच ग्रामस्थांनी ठरविलेल्या जागी टाकी उभारायचे ठरविले. जलवर्धिनीचे विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाया आणि टाकी बांधण्यात आली. दहा हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी बांधायला सुमारे ३० हजार रुपये खर्च आला. फेरोसिमेंटने बांधलेली ही टाकी अवघ्या तीन दिवसांत उभी राहिली. वाडीतील २७ लोकांनी श्रमदानही केले. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीतून या टाकीमध्ये पाणी साठविले जाणार असून वाडीतील २३ घरांना पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता विजेचा पंप तसेच जलवाहिन्या बसविण्याचे कामही वर्गणीतून केले जाणार असून ते मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर योजना कार्यान्वित होईल.
ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन पाणी योजना राबविण्याचे ठरविल्याबद्दल सरपंच संजय बांधकर यांनी ग्रामस्थ तसेच चाकरमान्यांची प्रशंसा केली आहे. तसेच टाकीच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाकरिता ग्रामपंचायतीकडून शक्य तेवढे अनुदान देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
............................................


बांधकाम कारागिरांना प्रशिक्षण


फेरोसिमेंटची टाकी मुख्यत्वे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधली जाते. मात्र नाटे येथील मधली वाडी ग्रामस्थांनी नळपाणी योजनेसाठी ही टाकी बांधली आहे. त्यामागे केवळ टाकी बांधणे एवढाच उद्देश नव्हता. शहरांमध्ये पावसाचे पाणी साठविणे अनिवार्य करण्यात आले आहे. गावांमध्येही यापुढच्या काळात पर्जन्यजल साठवण गरजेची ठरणार आहे. त्याकरिता कमी खर्चाच्या फेरोसिमेंटच्या टाक्या बांधणे उपयुक्त ठरणार आहे. नाटे गावात घरांचे आणि अन्य बांधकाम करणाऱ्या कारागिरांना अशा टाक्या बांधण्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांनी गावात पावसाचे पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधून द्याव्यात, अशी चाकरमान्यांची अपेक्षा होती. ती यशस्वी झाली. फेरोसिमेंट टाकीच्या बांधकामाचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर गावातील अनेक कारागिरांनी मागणीनुसार तशा टाक्या बांधून देणार असल्याचे सांगितले.
.......................................................
(संपर्क – गिरीश शिंदे – ९१६७१६३७७०, महादेव घाडी – ९२२०९८२६७७)
..........................................................................................................................................


 
नाटे (राजापूर) – मधली वाडी येथे फेरोसिमेंटची टाकी बांधण्यासाठी तयार करण्यात आलेला तारांचा सांगाडा

तयार झालेली टाकी

No comments:

Post a Comment