बनावट तिकीट देणाऱ्या मुंबईतील
एजंटाची करामत चार महिन्यांनी उघड
प्रमोद कोनकर
pramodkonkar@gmail.com
रत्नागिरी : मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आटोपून कोकण रेल्वेने मुंबईला निघालेल्या काही
चाकरमान्यांना एजंटांनी केलेल्या फसवणुकीचा फटका बसला. परतीच्या प्रवासात एजंटाने केलेल्या
या फसवणुकीमुळे या प्रवाशांना मानहानी तर पत्करावी लागलीच, पण दंडासह तिकिटाच्या
रकमेएवढ्या फरकाची रक्कम भरण्याचा भुर्दंडही सहन करावा लागला.
मंगळवारी (ता.
२२) रात्री गोव्याहून मुंबईकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी कणकवली
स्थानकात पोहोचली. बी-४ या वातानुकूलित डब्यात विजय कुंटे आणि त्यांचे इतर पाच
कुटुंबीय डब्यात चढले. कन्फर्म तिकीट आणि मनाजोगत्या जागा मिळाल्याने ते खुशीत
होते. चार महिन्यांपूर्वी तिकिटासाठी केलेली धडपडीचे सार्थक झाल्याचे समाधान
त्यांच्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होते. याच समाधानात त्यांनी ट्रेन तिकीट
एक्झॅमिनर अर्थात कंडक्टरला आपले तिकीट दाखविले. तिकीट तपासल्यानंतर टीटीईने
त्यांना दंडासकट साडेपाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुंटे
कुटुंबीय संतापलेच. टीटीईविरुद्ध कम्प्लेन्ट करण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र
टीटीई बधला नाही. कारण तसेच होते. प्रवाशांनी सादर केलेले ८१३६०६३१०१ या पीएनआर
क्रमांकाचे तिकीट आणि टीटीईकडे असलेल्या चार्टवरचा तपशील जुळत नव्हता. तिकिटावर प्रवाशांच्या
नावासमोर ५१, ५०, ५६, ३६ आणि ३५ असे वय नमूद करण्यात आले होते, तर टीटीईकडच्या
चार्टवर हेच वय अनुक्रमे ११, १०, ५, ६ आणि ५ असे दिसत होते. साहजिकच हे सर्व
प्रवासी लहान मुले असल्याचे टीटीईचे म्हणणे होते. तिकिटाची रक्कमही निम्मीच
भरल्याचे दिसत होते. राहिलेली निम्मी रक्कम आणि दंडासह साडेपाच हजार रुपये भरायला
टीटीईने सांगितले. त्यावरून डब्यात मोठाच गोंधळ झाला. दंड थोपटले गेले. मात्र
टीटीई ठाम राहिल्याने प्रवाशांना दंड भरावाच लागला.
माहिती
घेतल्यानंतर स्पष्ट झाले की, हे तिकीट श्री. कुंटे यांनी लालबाग (मुंबई) येथील
एजंटाकडून चार महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. एजंटाने आयआरसीटीसीमार्फत
काढलेल्या या तिकिटाच्या प्रिंटमध्ये घोळ केला. प्रवाशांना दिलेल्या तिकिटावर
योग्य तो तपशील लिहिला, मात्र आयआरसीटीसीवर नोंद करताना चुकीचा तपशील लिहिला. प्रत्येक
प्रवाशाचे वय १२ वर्षांपेक्षा कमी लिहिले. परिणामी सर्वच प्रवासी मुले ठरली.
तेवढीच अधिकृत नोंद अंतिम चार्टमध्ये झाली. प्रवाशामागे ३०० रुपये या दराने १८००
रुपये श्री. कुंटे यांनी आधीच एजंटाला दिले होते. त्याशिवाय कमी रकमेच्या
तिकिटामुळे साडेपाच हजाराचा भुर्दंड रेल्वेला भरावा लागला. त्यामुळे ८३५ रुपयांचे
प्रतिमाणशी असलेले तिकीट त्यांना दुपटीहून अधिक रकमेला पडले.
पाच दिवसांच्या
गणपतीचे विसर्जन करून श्री. चंद्रकांत कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये कणकवली स्थानकावर
चढले. बी-१ डब्यातल्या ५७ क्रमांकाच्या आपल्या आसनापर्यंत ते पोहोचले. बघतात तर
तेथे एक प्रवासी आपलीच सीट असल्याच्या थाटात आधीच स्थानापन्न झाला होता. श्री.
चंद्रकांत खवळलेच. त्यांनी त्या प्रवाशाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मग
दोघांनीही आपापली तिकिटे एकमेकांना दाखवली आणि दोघेही चक्रावलेच. कारण दोघांच्याही
तिकिटावर एकच आसन क्रमांक लिहिलेला होता.
अखेर दोघांनीही
टीटीईकडे धाव घेतली. टीटीईने आपला चार्ट पाहिला आणि आधीच बसलेल्या प्रवाशाचे तिकीट
अधिकृत असल्याचे सांगून त्याच्या बाजूने आपला कौल दिला. तिकिटावरचा आणि चार्टवरचा
तपशील जुळत नव्हताच. त्यामुळे श्री. चंद्रकांत संतापले. ``एकाच सीटचे तिकीट दोघांना देऊन रेल्वेने एसटीसारखाच घोळ घातला आहे. ते काही
मला माहीत नाही. मला माझी सीट द्याच``, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर टीटीईने त्यांचे तिकीट तपासले. पीएनआर ८७३४९१९४९२
क्रमांकाच्या या तिकिटाची खातरजमा त्यांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकावर केली.
तेव्हा उत्तर आले की या हे तिकीट दुसऱ्या दिवशी सुटणाऱ्या गाडीचे आहे! चंद्रकांत यांना एजंटाने दिलेले तिकीट बनावट होते. खऱ्या पीएनआरचे दुसऱ्या
दिवशीच्या प्रवासाचे तिकीट दुसऱ्याच प्रवाशाला विकले गेले होते. श्री. चंद्रकांत
यांना अखेर माघार घ्यावी लागली. गणेशोत्सव आटोपून पुन्हा मुंबईला जायचा प्रवास
सुखाचा व्हावा, म्हणून तिकिटाच्या ८३५ रुपयांपेक्षा जादा ३०० रुपये देऊन त्यांनी
चार महिन्यांपूर्वी हे तिकीट खरेदी केले होते. सुखाच्या प्रवासाचा त्यांच्या
भ्रमाचा भोपळा फुटला. आपण एजंटाकडून फसवले गेलो आहोत, हे समजेपर्यंत रत्नागिरी
स्थानक आले होते. एजंटाला भरलेले ते सर्व पैसे गेलेच, पण विनातिकीट प्रवासी समजून
संपूर्ण तिकिटाचे पैसे आणि दंडाची रक्कम मिळून जादा १२०० रुपये त्यांना भरावे
लागले.
कोकणकन्या एक्स्प्रेस या सर्वाधिक लोकप्रिय गाडीत एकाच दिवशी केवळ वातानुकूलित
डब्यात अशा पद्धतीने सहा तिकीटधारक प्रवाशांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. चाकरमान्यांच्या
परतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी सहा दिवस दररोज सुमारे ३० जादा गाड्या धावणार
आहेत. त्या प्रत्येक गाडीतील अनेक
प्रवाशांची अशा तऱ्हेने फसवणूक झालेली असू शकेल.
.....
फसवणूक रेल्वेच्या पथ्यावर?
प्रवाशांची अनधिकृत
एजंटांकडून झालेली ही फसवणूक एक प्रकारे रेल्वेच्या पथ्यावरच पडली आहे. एकदा गाडीत
चढलेले प्रवासी गाडीतून उतरण्याच्या आणि गर्दीच्या गाडीतून पुन्हा प्रवासाचे दिव्य
करण्याच्या मन:स्थितीत नसतात.
ते प्रवासी दंड आणि फरकाची रक्कम भरून त्याच गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात.
झोपायला किंवा बसायला जागा नसली, तरी त्यांची हरकत नसते. अशा स्थितीत प्रवाशाला
सीट न देताच दंड आणि तिकिटाची रक्कम रेल्वेला आपसूकच मिळत असते.
दोन्ही तिकिटांवर एकच मोबाइल
फसवणूक झाल्याचे उघड झालेल्या आणि एकमेकांना ओळखत नसलेल्या दोन वेगवेगळ्या
प्रवाशांच्या तिकिटावर प्रवाशाचा मोबाइल क्रमांक या रकान्यात ८४५२९७७७७२ हाच
क्रमांक आहे. या क्रमांकावर फोन लावल्यास तो उचलला जात नाही. तसेच परळ (पूर्व),
मुंबई – १२ हा एकच पत्ता त्या दोन्ही तिकिटांवर आहे. हे सारेच संशयास्पद आहे.
प्रवाशांनी तिकिटाची खात्री करावी
रेल्वेने रीतसर
परवाना देऊन अधिकृतपणे सिटी बुकिंगसाठी एजंट नेमले आहेत. त्यांच्याकडून अशी फसवणूक
होण्याची शक्यता नाही. आयआरसीटीसीवरून सहज तिकिटे मिळत असल्याने अनधिकृत एजंट अशा
तऱ्हेची फसवणूक करू शकतात. प्रवाशांनी तिकीट ताब्यात घेतल्यानंतर पीएनआरच्या
मदतीने वेबसाइटवरून किंवा मोबाइलवरून एसएमएसवरून आपल्या तिकिटांची आणि इतर
तपशिलाची खात्री करून घ्यावी. तसे केल्यासच अशा तऱ्हेची फसवणूक टळू शकेल. फसल्या
गेलेल्या प्रवाशांनी रेल्वेशी संपर्क साधल्यास एजंटाचा तपास करून कारवाई करता येऊ
शकेल. खासगी एजंटांकडून तिकीट खरेदी केलेल्या मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच
चाकरमान्यांनी आपल्या तिकिटाची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
- बाळासाहेब निकम,
आरआरएम, कोकण
रेल्वे,
रत्नागिरी स्थानक
.......................................................
(प्रसिद्धी - सकाळ, तरुण भारत, लोकमत- रत्नागिरी आवृत्ती, ता. २५-९-२०१५)
No comments:
Post a Comment