पैसे भरणे, काढणे, पासबुक प्रिंटिंगची
चोवीस तास सेवा
रत्नागिरी – कारवांची वाडी (ता. रत्नागिरी) येथे आज (ता.
8) बँक ऑफ इंडियाच्या ई-गॅलरीचे उद्घाटन झाले. बँकेचे
पश्चिम विभागाचे महाप्रबंधक आर. एस. चौहान, मुंबई विभागाचे महाप्रबंधक तरलोचन सिंग,
रत्नागिरीचे झोनल मॅनेजर वि. वि. बुचे आणि बँकेच्या कारवांची वाडी शाखेचे व्यवस्थापक
विवेक शेंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.
यावेळी श्री. सिंग आणि श्री.
चौहान यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा
बँकेचा प्रयत्न असतो. ई-गॅलरी सेवा हा त्याचाच एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. श्री.
बुचे म्हणाले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ
इंडियाने या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला
आहे. या दोन जिल्हयांमध्ये सर्व तालुका शाखांसह एकूण 35 शाखांमध्ये ई-गॅलरी सेवा उपलब्ध
करून दिली जाणार असून कारवांची वाडी शाखा त्यापैकी बारावी आहे. येत्या दोन महिन्यांत
इतर ठिकाणी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शाखा व्यवस्थापक
श्री. शेंडे यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत ग्राहकांकडून
सर्व सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक जलद आणि केव्हाही
उपलब्ध होणाऱ्या नव्या ई-गॅलरी सेवेचा उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी
केले.
दरम्यान,
बँकेच्या लांजा शाखेतही आज ई-गॅलरी सेवेचे उद्घाटन झाले.
काय आहे `ई-गॅलरी`?
बँकेच्या
ई-गॅलरीमध्ये पैसे भरणे, काढणे आणि पासबुक प्रिंटिंगची सेवा चोवीस तास उपलब्ध असेल.
त्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेत जाण्याची गरज नाही.
बचत, करंट आणि कॅश क्रेडिट खातेधारकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. ज्या व्यावसायिक आणि
नोकरदारांना बँकेच्या वेळेत बँकेत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत
उपयुक्त आहे.
- एटीएमद्वारे केव्हाही पैसे काढण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे.
- आता ई-गॅलरीमध्ये दिवसभरातील चोवीस तासात केव्हाही पैसे भरणेही शक्य होणार आहे. पैसे भरण्याच्या यंत्रात 50 रुपये ते एक हजार रुपयांपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. बँकेतील खात्याचा अकौंट नंबर टाईप केल्यानंतर खातेधारकाचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्याची खात्री केल्याचे बटन दाबल्यानंतर पैसे भरता येतील. एका वेळी जास्तीत जास्त दोन लाख रुपये स्वीकारले जातील. त्याहून अधिक रक्कम भरायची असल्यास पुन्हा खाते क्रमांक टाईप करण्यापासून सुरवात करावी लागेल.
- पासबुक प्रिंटिंगसाठी स्वतंत्र यंत्र आहे. त्याचा उपयोग करण्यापूर्वी बँकेच्या शाखेकडून पासबुकावर बारकोड प्रिंटिंग करून घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment