Tuesday, 5 May 2015

बाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती नको – प्रा. प्रकाश नाईकरत्नागिरी - ``डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती करण्याऐवजी डोळसपणे त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांना पर्याय नाही``, असे प्रतिपादन प्रा. प्रकाश नाईक यांनी येथे केले.
येथील आंबेडकरवाडीत आंबेडकर आणि बुद्ध जयंतीनमित्त आज (ता. 4 मे) आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ``भगवान बुद्धाने वास्तववादी तत्त्वज्ञान मांडले. करुणेवर, विज्ञाननिष्ठेवर आधारलेल्या त्यांच्या विचारांना बाबासाहेबांनी पुढे नेले. आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी काम केले नाही, तर शेतकरी, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला सर्वच उपेक्षित घटकांसाठी क्रांतिकारी काम केले. आजच्या विषमतावादी व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांचे विचार आवश्यक आहेत. संघर्षाची तयारी ठेवून प्रत्येक युवकाने बाबासाहेबांच्या विचारदिशेने वाटचाल करावी. त्यात आपल्या देशाचे कल्याण आहे.``
यावेळी कृष्णा जाधव, सुनील आंबुलकर यांची भाषणे झाली. स्वागत आणि प्रास्तविक किशोर कांबळे यांनी केले. विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. समारंभाला धर्माजी कांबळे, नीलेश कांबळे, प्रफुल्ला मोहिते, राकेश कांबळे, सचिन जाधव, व्ही. डी. जाधव यांच्यासह तरुण आणि महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment