Tuesday, 5 May 2015

गुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा रविवारी जीर्णोद्धार



कुरतडे येथे कार्यक्रम – स्थानिक कार्यकर्त्यांना मुंबई, पुण्याच्या चाकरमान्यांची मदत

रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे कोणे एके काळी गुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा येत्या रविवारी (ता. 10 मे 2015) जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. जीर्णोद्धारासाठी स्थानिक ग्रामस्थांना मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांनी सहकार्य केले आहे.
      कुरतडे येथे अऩेक गुराखी ठरावीक ठिकाणी फार पूर्वीपासून जमत असत. गावातील शेतकऱ्यांची गुरे चारण्यासाठी आणल्यानंतर दुपारच्या वेळी विश्रांती म्हणून ते तेथे जमत. जांगळी म्हणून परिचित असलेले गुराखी एकत्र जमल्यानंतर त्यांची चर्चा होत असे. या चर्चेतूनच तेथे जांगळदेवाचे मंदिर उभारण्याची कल्पना सुचली. त्यानुसार जांगळदेवाचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर सुशोभित करून तेथे नित्यनेमाने काही कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. कुणबी समाज संघटना आणि पालवकरवाडी-नवजीवनवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी ठरविलेल्या या उपक्रमाला मुंबई आणि पुण्यातील मंडळाच्या चाकरमान्यांनी पाठिंबा दिला. आर्थिक मदतही उभारली. गुरुनाथ पालवकर यांच्या अध्यक्षतेखालील पालवकरवाडी-नवजीवनवाडी मंडळ, तर गोपाळ बिर्जे अध्यक्ष असलेल्या कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले. निधी संकलित झाल्यानंतर उभारणीला सुरवात झाली. श्रमदान आणि आर्थिक मदतीतून मंदिर साकारले जात आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार येत्या रविवारी (ता. 10) होणार आहे. भगवान पालवकर, सुरेश करसोडे, सदू पालवकर, नारायण आग्रे, शिवराम बिर्जे, नारायण पालवकर, गणपत पोशे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मंदिराचा कलशारोहण समारंभ होणार आहे. त्यानंतर आरती-प्रसाद, ढोलताशा वादन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, स्थानिकांचे भजन, रात्री मान्यवरांचा सत्कार आणि अशोक दुदम (संगमेश्वर) यांच्यातर्फे दोन्ही वाड्यांमधील महिलांना साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता खेडशी येथील महालक्ष्मी नमन मंडळाच्या बहुरंगी नमनाने सोहळ्याचा समारोप होईल. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

-          कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे जांगळदेव मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.


(प्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन - 9403614782)

No comments:

Post a Comment