Tuesday 12 May 2015

जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्रवारी वर्धापनदिन



रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा दुसरा वर्धापनदन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. ग्रामस्थांना एकत्रितरीत्या उपासना करता यावी, यासाठी बांधलेल्या या मंदिराच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालवकरवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
कुरतडे गावातील महिला दर शुक्रवारी संतोषीमातेची पूजा करत असत. गावातील सर्व महिलांना एकत्रित पूजा आणि व्रतवैकल्ये करता यावीत, तसेच ग्रामस्थांनाही उपसना करता यावी, यासाठी कुरतडे गावाच्या पालवकरवाडीतील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन संतोषीमातेचे छोटेसे मंदिर बांधले. दोन वर्षांपूर्वी या मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा झाला.  तेव्हा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनीही पुढाकार घेऊन निधी संकलित केला. कुरतडे दशक्रोशीत संतोषीमातेचे मंदिर नसल्याने या मंदिराचा भक्तांना लाभ झाला. मंदिरात दैनंदिन पूजाआरती केली जाते. जीर्णोद्धारानंतर गेली दोन वर्षे वर्धापनदिन साजरा केला जातो. गावातून संतोषीमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जोगवा मागितला जातो. त्यामधून उत्सवाचा खर्च केला जातो. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ, विशेष कामगिरी बजावलेले ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
यावर्षीचा वर्धापनदिन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. सकाळी आठ वाजता विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती-महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी पालखी मिरवणूक, भजन, रात्री आठ वाजत मान्यवरांचा सत्कार केला जाईल. रात्री साडेदहा वाजता लांजा येथील मांडवकरवाडीतील बहुरंगी नमन सादर केले जाईल. विलास पालवकर, महेश पालवकर, विजय पालवकर, रामचंद्र पालवकर, गोपाळ पालवकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक नारायण पालवकर यांनी केले आहे.




प्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन – 9403614782

Monday 11 May 2015

पुरुषोत्तमशास्त्री फडकेंना श्रद्धांजलीसाठी सभा

रत्नागिरी - रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक पुरुषोत्तम नारायण तथा अप्पाशास्त्री फडके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संस्कृत पाठशाळेनं मंगळवारी (१२ मे २०१५) सभेचं आयोजन केलं आहे. ही श्रद्धांजली सभा रत्नागिरीत संस्कृत पाठशाळेत सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सभेला रत्नागिरीतील नागरिक, तसंच संस्कृतप्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. वयाच्या शताब्दीपूर्तीला अवघा आठवडा राहिला असताना, गेल्या २४ एप्रिल रोजी पुरुषोत्तमशास्त्रींचं रत्नागिरीत निधन झालं होतं.

Friday 8 May 2015

कारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलरी`



पैसे भरणे, काढणे, पासबुक प्रिंटिंगची चोवीस तास सेवा
रत्नागिरी – कारवांची वाडी (ता. रत्नागिरी) येथे आज (ता. 8) बँक ऑफ इंडियाच्या ई-गॅलरीचे उद्घाटन झाले. बँकेचे पश्चिम विभागाचे महाप्रबंधक आर. एस. चौहान, मुंबई विभागाचे महाप्रबंधक तरलोचन सिंग, रत्नागिरीचे झोनल मॅनेजर वि. वि. बुचे आणि बँकेच्या कारवांची वाडी शाखेचे व्यवस्थापक विवेक शेंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.
                यावेळी श्री. सिंग आणि श्री. चौहान यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. ई-गॅलरी सेवा हा त्याचाच एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. बुचे म्हणाले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन जिल्हयांमध्ये सर्व तालुका शाखांसह एकूण 35 शाखांमध्ये ई-गॅलरी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून कारवांची वाडी शाखा त्यापैकी बारावी आहे. येत्या दोन महिन्यांत इतर ठिकाणी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
      शाखा व्यवस्थापक श्री. शेंडे यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत ग्राहकांकडून सर्व सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक जलद आणि केव्हाही उपलब्ध होणाऱ्या नव्या ई-गॅलरी सेवेचा उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
      दरम्यान, बँकेच्या लांजा शाखेतही आज ई-गॅलरी सेवेचे उद्घाटन झाले.



काय आहे `ई-गॅलरी`?

      बँकेच्या ई-गॅलरीमध्ये पैसे भरणे, काढणे आणि पासबुक प्रिंटिंगची सेवा चोवीस तास उपलब्ध असेल. त्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेत जाण्याची गरज नाही. बचत, करंट आणि कॅश क्रेडिट खातेधारकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. ज्या व्यावसायिक आणि नोकरदारांना बँकेच्या वेळेत बँकेत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे.
  • एटीएमद्वारे केव्हाही पैसे काढण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे.
  • आता ई-गॅलरीमध्ये दिवसभरातील चोवीस तासात केव्हाही पैसे भरणेही शक्य होणार आहे. पैसे भरण्याच्या यंत्रात 50 रुपये ते एक हजार रुपयांपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. बँकेतील खात्याचा अकौंट नंबर टाईप केल्यानंतर खातेधारकाचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्याची खात्री केल्याचे बटन दाबल्यानंतर पैसे भरता येतील. एका वेळी जास्तीत जास्त दोन लाख रुपये स्वीकारले जातील. त्याहून अधिक रक्कम भरायची असल्यास पुन्हा खाते क्रमांक टाईप करण्यापासून सुरवात करावी लागेल.
  • पासबुक प्रिंटिंगसाठी स्वतंत्र यंत्र आहे. त्याचा उपयोग करण्यापूर्वी बँकेच्या शाखेकडून पासबुकावर बारकोड प्रिंटिंग करून घेणे आवश्यक आहे.

Tuesday 5 May 2015

गुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा रविवारी जीर्णोद्धार



कुरतडे येथे कार्यक्रम – स्थानिक कार्यकर्त्यांना मुंबई, पुण्याच्या चाकरमान्यांची मदत

रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे कोणे एके काळी गुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा येत्या रविवारी (ता. 10 मे 2015) जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. जीर्णोद्धारासाठी स्थानिक ग्रामस्थांना मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांनी सहकार्य केले आहे.
      कुरतडे येथे अऩेक गुराखी ठरावीक ठिकाणी फार पूर्वीपासून जमत असत. गावातील शेतकऱ्यांची गुरे चारण्यासाठी आणल्यानंतर दुपारच्या वेळी विश्रांती म्हणून ते तेथे जमत. जांगळी म्हणून परिचित असलेले गुराखी एकत्र जमल्यानंतर त्यांची चर्चा होत असे. या चर्चेतूनच तेथे जांगळदेवाचे मंदिर उभारण्याची कल्पना सुचली. त्यानुसार जांगळदेवाचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर सुशोभित करून तेथे नित्यनेमाने काही कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. कुणबी समाज संघटना आणि पालवकरवाडी-नवजीवनवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी ठरविलेल्या या उपक्रमाला मुंबई आणि पुण्यातील मंडळाच्या चाकरमान्यांनी पाठिंबा दिला. आर्थिक मदतही उभारली. गुरुनाथ पालवकर यांच्या अध्यक्षतेखालील पालवकरवाडी-नवजीवनवाडी मंडळ, तर गोपाळ बिर्जे अध्यक्ष असलेल्या कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले. निधी संकलित झाल्यानंतर उभारणीला सुरवात झाली. श्रमदान आणि आर्थिक मदतीतून मंदिर साकारले जात आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार येत्या रविवारी (ता. 10) होणार आहे. भगवान पालवकर, सुरेश करसोडे, सदू पालवकर, नारायण आग्रे, शिवराम बिर्जे, नारायण पालवकर, गणपत पोशे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मंदिराचा कलशारोहण समारंभ होणार आहे. त्यानंतर आरती-प्रसाद, ढोलताशा वादन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, स्थानिकांचे भजन, रात्री मान्यवरांचा सत्कार आणि अशोक दुदम (संगमेश्वर) यांच्यातर्फे दोन्ही वाड्यांमधील महिलांना साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे. रात्री दहा वाजता खेडशी येथील महालक्ष्मी नमन मंडळाच्या बहुरंगी नमनाने सोहळ्याचा समारोप होईल. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

-          कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे जांगळदेव मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.


(प्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन - 9403614782)