Saturday, 15 September 2018

कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवावे




साप्ताहिक कोकण मीडिया गेली दोन वर्षे रत्नागिरीतून प्रसिद्ध केले जाते. साप्ताहिकाबरोबरच दिवाळी अंक हेही कोकण मीडियाचे वैशिष्ट्य लागोपाठच्या दोन दिवाळी अंकांनी कोकणासह मुंबई-पुण्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ते कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगळेपणाचे पुढचे पाऊल उचलताना यावर्षीचा दिवाळी अंक जलवैभव विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला जाणार आहे.
विस्तीर्ण समुद्र, नद्या, धबधबे, तलाव, पाणवठे अशा अनेक स्रोतांनी कोकणाला जलसमृद्धी लाभली आहे. भरपूर पाऊस पडणार्या कोकणात उन्हाळ्यातली पाणीटंचाई ही एक समस्या असली, तरी याच कोकणात उंच डोंगरात, खार्या पाण्यात उभारलेल्या किल्ल्यांमध्ये, गावांच्या मध्यभागी बारमाही जलसाठे आढळतात. वेगवेगळ्या जलस्रोतांना पौराणिक, ऐतिहासिक परंपरा लाभली असून अनेक नवे तलाव नवा इतिहास निर्माण करत आहेत. अनेक मंदिरांनी धार्मिक अधिष्ठानातून जपलेले तलाव तेथील निसर्गसौंदर्यामुळे आता पर्यटनाची ठिकाणे झाली आहेत. कोणे एके काळी दुर्गम समजल्या जाणार्या कोकणातील दुर्गम ठिकाणचे धबधबे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. उंच धबधब्यांचा आनंद घेतानाच बॅकवॉटर जलविहाराची अनेक ठिकाणे गर्दीने गजबजून जात आहेत. स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत समुद्राच्या तळाचे सौंदर्य अनुभवले जात आहे.
वेगवेगळ्या स्वरूपात कोकणाचे जलवैभव ठरलेल्या अशाच काही ठिकाणांचा परिचय यावेळच्या दिवाळी अंकात करून देण्यात येणार आहे.
या अंकासाठी मजकूर पाठवावा. जलवैभवाविषयीचे लेखन पाठविताना सोबत छायाचित्रेही असावीत. विशिष्ट ठिकाणे असतील, तर त्याविषयी सविस्तर माहिती, ऐतिहासिक संदर्भ, ठिकाणाचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, वाहतुकीची व्यवस्था, ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा जवळचा रस्ता, अंतर, परिसरातील इतर ठिकाणे असा तपशील दिल्यास इच्छुक वाचकांना त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल.
मजकूर, छायाचित्रे ई-मेलने पाठविण्यासाठी सोबत पत्ता दिला आहे.
कळावे.
     आपला,
- प्रमोद कोनकर, संपादक
मजकूर पाठविण्याची अंतिम मुदत – १० ऑक्टोबर २०१८
पत्ता - कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
       कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), गांधी ऑटोमोबाइल्सच्या मागे,
       खेडशी, रत्नागिरी - ४१५६३९
ईमेल - kokanmedia1@gmail.com


Friday, 10 August 2018

मठच्या लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात रविवारपासून श्रावणोत्सव


      लांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात दर रविवारी श्रावणोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या रविवारपासून (ता. १२ ऑगस्ट) श्रावणातील पहिल्या रविवारी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी श्रावण महिन्यात पाच रविवार येणार आहेत. शेवटचा रविवार ९ सप्टेंबर रोजी आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारले आहे. म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. यावर्षी करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराचे कलशारोहण झाले. मंदिरात नित्यविधी सुरू आहेत. श्रावणातील रविवारची पल्लीनाथी उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्याकरिता दर रविवारी पूजा, अभिषेक, लघुरुद्र आणि महारुद्र तसेच पवमान अभिषेक केला जाणार आहे. कुलोपासकांनी धार्मिक विधींसाठी शशिकांत गुण्ये, सुधाकर चांदोरकर किंवा संस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रेषक – सुधाकर चांदोरकर, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी. फोन - 9422646765

Monday, 16 July 2018

छोट्या संधी शोधून त्या मोठ्या करणारे उद्योजक होतात – डॉ. श्रीधर ठाकूर

      रत्नागिरी : स्पर्धेच्या आजच्या युगात यशाच्या संधी खेचून आणाव्या लागतात. छोट्या संधी शोधून काढून त्या मोठ्या करणारेच यशस्वी उद्योजक बनतात. त्याकरिता कठोर परिश्रम आणि चांगला संपर्कही निर्माण करावा लागतो, असे प्रतिपादन मुंबईतील इन्फिगो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
रत्नागिरी : केबीबीएफच्या बैठकीत
मार्गदर्शन करताना मुंबईतील इन्फिगो कंपनीचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर.

     कऱ्हाडे  ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी (ता. १५ जुलै) झालेल्या व्यावसायिक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कऱ्हाडे ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक, व्यावसायिक देवाणघेवाण आणि त्यामधून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. ठाकूर यांनी उद्योजक आणि व्यावसायिक या संज्ञांमधील फरक स्पष्ट करून यशस्वी होण्याची कौशल्ये यावेळी विशद केली. ते म्हणाले की, एखादा उद्योग मनात जन्मावा लागतो. त्यावर बुद्धी विचार करते. त्यावर अचूक आणि योग्य कृती केली गेली, तर उद्योग यशस्वी होतो. अनेकदा अपयश आले, तरी जो त्यातून शिकून आपल्यामध्ये बदल घडवून आणतो, तोच यशस्वी होतो. एकदाच अपयश आले, तर त्यापासून परावृत्त होऊन त्याबाबतच्या तक्रारी करणारे व्यवसाय करू शकत नाहीत. ते नोकरीच करत राहतात. देशातील तसेच जगभरातील विविध ठिकाणच्या उद्योगांचे दाखले देऊन त्यांनी कोकणातील सोनचाफा, फणस, कोकम इत्यादी अनेक फळांची लागवड आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांमधील संधी उलगडून सांगितल्या. स्मिथ अँड नेफ्यू कंपनीचे व्यवस्थापक मंगेश प्रभुदेसाई यांनी देवरूख येथील बाळासाहेब पित्रे आणि विमलताई पित्रे यांनी उभारलेल्या अॅडलर-सुश्रुत या बहुराष्ट्रीय कंपनीच्या यशाचा प्रवास उलगडला. अनेकदा अपयश येऊनही कोकणासारख्या दुर्गम आणि मागास भागात तयार केलेले वैद्यकीय उपकरणांची निर्यात जगातील सर्वांत प्रगत देशात करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना कोणती दिव्ये करावी लागली तसेच नवी कोणती मानके त्यांनी तयार केली, याची यशोगाथा श्री. प्रभुदेसाई यांनी सांगितली.
केबीबीएफच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष अॅड. संदेश शहाणे यांनी रत्नागिरी शाखेच्या वाटचालीचा, तर केबीबीएफ ग्लोबलचे सचिव अमित शहाणे यांनी अन्य विविध शाखांचा आढावा घेतला. व्यावसायिकांसाठी लवकरच पतसंस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या जोशी एन्टरप्रायझेसचे कौस्तुभ कळके यांनी या मेळाव्याचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. मेळाव्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे तसेच कोल्हापूरमधील उद्योजक उपस्थित होते. सर्व प्रतिनिधींनी आपापल्या व्यवसायांविषयीची माहिती सांगितली. प्रातिनिधिक स्वरूपात प्रशांत पाध्ये, योगेश मुळ्ये, सुहास ठाकूरदेसाई, अभय खेर यांनी संघटनेविषय़ीचे अनुभव सांगितले.
.................

डॉ. ठाकूर यांचे संपूर्ण भाषण कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/PuYrKD0hgug


Monday, 18 June 2018

संगमेश्वरी बाजचा प्रयोग नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतल्याने कलाकार भारावले



      रत्नागिरी : मुलुंड (मुंबई) येथे नुकत्याच पर पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचा साज संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकतेचा कोणताही अऩुभव नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक लोककलांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा प्रयोग नाट्यरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अशा प्रतिसादामुळे हुरूप आला आहे, अशी भारावलेली प्रतिक्रिया या कार्यक्रमातील कलाकारांनी दिली.
      यावर्षीच्या नाट्य संमेलनात व्यावसायिक नाटकांच्या ऐवजी सलग साठ तास राज्यभरातील लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेकडून कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली होती. ती मंजूर करण्यात आली. गेल्या १४ जून रोजी पहाटे पाच वाजता हे सादरीकरण करण्यासाठी वेळ मिळाला. रसिकांच्या प्रचंड टाळ्या आणि शिट्या कार्यक्रमाला मिळाल्या. कोकणातील जाखडी, नमन आणि त्यातील गणपती, संकासूर, गणगवळण, कृष्ण ही पात्रे दाखवली. तेथे आलेले अनुभव सांगण्यासाठी कलाकारांनी रत्नागिरीत आल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संमेलनाच्या दरम्यान आलेले अनुभव सांगण्यात आले. कार्यक्रमाला गर्दी होईल का, याची शंका वाटत होती. नामवंत कलाकारांसमोर कार्यक्रम सादर करण्याचे दडपण वाटत होते. पण पहिल्या मिनिटापासूनच कार्यक्रम रंगू लागला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षागृहातील नामवंत कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. ज्या कलाकारांसोबत आम्ही कार्यक्रमापूर्वी सेल्फी काढत होतो, तेच कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढत होते. या क्षणानेच आम्ही सर्वजण धन्य झालो, आमचा परफॉर्मन्स सार्यांोना आवडला व शेवटच्या क्षणी उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी नाट्यसृष्टीतील प्रसाद कांबळी, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, संतोष पवार, अविनाश नारकर, मधुरा वेलणकर, मंगेश कदम आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे रत्नगिरी शाखाध्यक्ष उदय सामंत, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यामुळेच मुंबईत कार्यक्रमाची संधी मिळाल्याचे या कलाकारांनी आवर्जून सांगितले. नाट्य परिषदेच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कलाकारांसह समीर इंदुलकर, सनातन रेडीज, प्रफुल्ल घाग, सौ. पूजा बावडेकर, श्याम मगदूम, विजय साळवी उपस्थित होते.
      कार्यक्रमात संगमेश्वनरी बोलीचा ११२ वा प्रयोग सादर करण्यात आला. पहिला प्रयोग आणि आताचा प्रयोग यात अनेक सुधारणा, नवीन स्कीट सादर केले. मृदंगाच्या तालावर सुरवात केल्यापासून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळू लागल्या. संकासुर प्रेक्षकांतून आणल्यानंतर प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचले. बाळकृष्णाचे पात्र रंगवणार्यां आठ वर्षीय रुद्र योगेश बांडागळे याला प्रेक्षकांकडून रोख पारितोषिके मिळाली. रसिकांमधून प्रत्येक क्षणाला प्रोत्साहन मिळत होते, असे कलाकारांनी सांगितले. सुनील देवळेकर यांच्या टीमने नेपथ्य, लाइट्सची व्यवस्था ५ मिनिटांत करून दिली. संमेलनात कल्पकतेने नेपथ्य केले होते. रंगवलेल्या जुन्या ट्रंकापासून कमानी बनवल्या होत्या. पताकांवर नाटकांची नावे लिहिली होती. वायफळ खर्चाला फाटा दिल्याचे दिसत होते. संमेलनात आदरातिथ्य, निवास, भोजनाची व्यवस्था व नियोजन सुरेख होते. हे परिषदेचे यश आहे, असेही कलाकारांनी आवर्जून नमूद केले. संगमेश्वारी बोलीचा कार्यक्रम छान झाला. पहाटेच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका होती. पण प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते. सर्व कलाकारांची कामे सुरेख झाली व नवखेपणा जाणवला नाही. पहिल्या मिनिटापासून प्रयोग रंगतदार झाला”, अशी प्रतिक्रिया मुंबईतील व्यावसायिक नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी दिल्याचा उल्लेख कलाकारांनी आवर्जून केला.
      संगमेश्वरी बाजच्या प्रयोगात सुनील बेंडखळे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण, सचिन काळे, योगेश बांडागळे, राज शिंदे, अथर्व सुर्वे, राहुल कापडे, सौरभ कापडे, गणेश कुवळेकर, हृषीकेश कुवळेकर, साहील सुर्वे, स्वप्नील सुर्वे, अंकुश तांदळे, सुरेंद्र गुडेकर, रुद्र बांडागळे, विश्वास सनगरे, प्रभाकर डाऊल, संजय गोताड, मिलिंद लिंगायत आणि अनिकेत गानू यांनी विविध भूमिका सादर केल्या.
.............
या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील खाली दिलेली लिंक क्लिक करा –








Tuesday, 5 June 2018

पर्यावरण दिनानिमित्ताने `जलवर्धिनी`चे जलवर्धनाचे आवाहन



      रत्नागिरी - कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले आहेत. प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाणी साठविण्याचे आवाहन जलवर्धिनीने केले आहे. पाणी साठविण्याची टाकी बांधण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि ठरावीक साहित्य जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पुरविले जाणार आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तुलनेने कमी खर्चात पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले असून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशा साठवण टाक्या प्रतिष्ठानने बांधल्या आहेत. जलवर्धिनीतर्फे फेरोसिमेंट आणि नैसर्गिक धाग्यांच्या वापरातून टाक्या तयार केल्या आहेत. त्यांचा ठिकठिकाणी चांगला उपयोग होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका गुहागर तालुक्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर फेरोसिमेंटच्या 18 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. आवश्यक तेथे गरजूंना जलवर्धिनी प्रतिष्ठानने मदतही दिली आहे. यापुढेही मदत दिली जाणार आहे. इच्छुक गरजूंकरिता 10 फूट व्यास आणि 4 फूट उंचीची सुमारे 9 हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेली टाकी बांधून दिली जाईल. त्याकरिता शेतकऱ्यांनी 12 फूट व्यासाचे जोते, बांधकामासाठी लागणारी रेती आणि मजुरी देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.

गरजू शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधावा. आपल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत याच मोबाइलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी, असे आवाहन जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक – ९८२०७८८०६१.
.....................
जलवर्धिनीचे तंत्र वापरून शेतीकरिता पाण्याचे कसे नियोजन केले, याबाबतचे परशुराम आगिवले (मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड) या शेतकऱ्याचे अनुभव ऐकण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलला भेट द्या. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/91SY946gFcE

जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

………………………..

जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक पान




Monday, 21 May 2018

रत्नागिरीत घ्या स्कुबा डायव्हिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद


पर्यटन क्षेत्राला गती देणारा स्कुबा डायव्हिंगचा थरार आता रत्नागिरीतही अनुभवायला मिळू लागला आहे. हर्षा स्कुबा डायव्हिंगने गेल्या डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा फायदा अवघ्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी घेतला आहे. स्कुबा डायव्हिंगच्या केंद्रामुळे रत्नागिरीचे नाव पर्यटनाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर पोहोचले आहे. आता हर्षातर्फे मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर डव्हेंचर स्पोर्ट्सचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.
.............

      लहान रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे सारख्याच रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे, रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणारे मासे, सुंदर मखमली रंगांच्या शिंपल्यांचा खच... पाण्याखालचे हे स्वच्छंदी जग न्याहाळायला मिळाले तर? अवतीभवती रंगीबिरंगी मासे फिरताहेत. मध्येच एखादे छोटेसे कासव नजरेसमोरून जात आहे. एरवी सहजासहजी न दिसणारे दगडगोटे नजरेस पडताहेत. पाण्याच्या खाली असलेल्या या स्वप्नवत दुनियेची सफर करण्यासाठी लोक स्कुबा डायव्हिंग करतात. अंदमान-निकोबार, गोवा आणि सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीतही स्कुबा डायव्हिंग सुरू झाले आहे.
      निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सतत वेगळे काही करण्याचा जणू छंदच असलेल्या रत्नागिरीतील मैत्री गमुपने त्यासाठी पुढाकार घेतला आणि वर्षभर पाठपुरावा करून हर्षा स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात यश मिळविले. अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात नेमके काय दडले आहे, समुद्रातील जीवसृष्टी कशी असते, याचे कुतूहल आता रत्नागिरीला येणार्‍या पर्यटकांना आणि अर्थातच समुद्राच्या कुशीत राहणार्‍या रत्नागिरीकरांनाही शमवता येणार आहे.
      मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, कांचन आठल्ये आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रत्नागिरीत ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी केटरिंग सर्व्हिस, हर्षा गार्डन हॉटेल, अंबर हॉल, मराठा रेसिडेन्सी हे शाही हॉटेल, मांडवी समुद्रकिनाऱ्यावर नव्यानेच सुरू केलेले सी फॅन्स हॉटेल अशा विविध उद्योगांमधील वैविध्यपूर्ण अनुभव घेतानाच मैत्री गमुपला बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या गरजा समजू लागल्या. याच दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मैत्री गमुपचे चौघे जण मुंबईत भरलेल्या टूर एक्झिबिशनला गेले होते. तेथे कोकणाची टूर चालवणारे कोणीही नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरी हेच पर्यटकांचे डेस्टिनेशन व्हावे, असे ध्येय मनाशी बाळगून त्या चौघांनी हर्ष हॉलिडेज नावाने टूर कंपनी सुरू केली. पर्यटक येथे आले पाहिजेत आणि थांबले पाहिजेत यासाठी रत्नागिरीच्या संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देणार्‍या काही योजना आखल्या. गणेशोत्सवादरम्यान केरळ येथून काही पर्यटक आले होते. त्यांना रत्नागिरीतील काही घरांमध्ये नेऊन आरती, नैवेद्य, अन्न यांची माहिती दिली. या सहलीचा त्यांनी खूप आनंद लुटला; मात्र हे सर्व करत असताना अजूनही काहीतरी कमी आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. काही अनुभवी सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरीत समुद्र असूनही, संबंधित साहसी खेळांची सुविधा नसल्याने आलेले पर्यटक येथे थांबत नाहीत, ही बाब समोर आली. गोव्यानंतर कोकणाला महत्त्व देणारे पर्यटक रत्नागिरीपेक्षाही सिंधुदुर्गात मालवण, तारकर्ली परिसराकडे अधिक आकर्षित होतात, याचीही नोंद करण्यात आली. सुमारे दहा वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसारखे साहसी समुद्री खेळ सुरू झाले, हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यावर चर्चा आणि विचारविनिमय करतानाच रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंग सुरू केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यातूनच रत्नागिरीच्या हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला जन्म झाला. त्यासाठी तारकर्ली येथील सारंग कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. स्कुबा डायव्हिंगसाठी नेमकी ठिकाणे शोधण्यासाठी गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी पाहणी झाली. रत्नागिरीच्या परिसरात भाट्ये, कुर्ली, भगवती बंदर, गणपतीपुळे, गणेशगुळे ते गणपतीपुळे-तिवरी बंदरपर्यंत सर्व ठिकाणे तपासली आणि हवी तशी जागा जाकीमिर्‍या-अलावा येथे सापडली. अलावा येथे खडकाळ भाग असून स्वच्छ व शांत किनारा आहे. भरपूर प्रवाळ, मासे असून सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे याच ठिकाणाची निवड करण्यात आली. लाखो रुपये खर्चून हा प्रकल्प अखेर कार्यान्वित झाला आणि रत्नागिरीला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे. डायव्हिंगची सोय रत्नागिरीत नसल्याने अनेक रत्नागिरीकरही परदेशांमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत होते. आता पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू झाल्याने रत्नागिरीत पर्यटक खूष होईल आणि समुद्रातील अंतरंग अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने येईल, अशी अपेक्षा आहे. ती पहिल्या दोन महिन्यांत सुमारे दीड ते दोन हजार पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंग करून पूर्ण केली आहे.
      रत्नागिरीजवळच्या जाकीमिर्‍या-पाटीलवाडी येथे स्कुबा डायव्हिंग सेंटरचा लँडिंग पॉइंट आहे. तेथून बोटीने अलावा येथे जाण्यास 7 मिनिटे लागतात. बोटीतून जातानाच पर्यटक मिर्‍याचे निसर्गसौंदर्य पाहून तृप्त होऊन जातो. तेथे डायव्हिंग पॉइंट आहे. बारा वर्षांपासून अधिक वयाच कोणीही डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो. त्याकरिता पोहायला येण्याची गरज नाही. डायव्हिंग करण्यापूर्वी सर्व माहितीचा अर्ज भरून घेतला जातो. काही आजार, डॉक्टर्सचे मोन नंबर्स आदी माहिती घेतली जाते. तसेच प्रवाशांना डायव्हिंग कसे करावे याची परिपूर्ण माहिती दिली जाते. स्विमर्सचा गॉगल लावून समुद्रात जावे लागत असल्यामुळे तोंडाने श्वास कसा घ्यावा, सोडावा याची माहिती दिली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेब सूट परिधान करून व ऑक्सिजनचा सिलिंडर पाठीला लावून समुद्रात उतरायचे. तेथे काही मिनिटे सराव करून घेतला जातो. गाइडचे पूर्ण लक्ष पर्यटकांवर असते. पाण्याखाली बोलता येत नसल्याने खुणांनी ते वारंवार विचारतात व श्वास घेताना त्रास जाणवल्यास तत्काळ पाण्याच्या वर घेऊन येतात. उत्तम डायव्हर्समुळे समुद्री जीवन अगदी जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होते. तेथे अनेक प्रकारचे मासे, प्रवाळ, वनस्पती आणि समुद्री जीव ही सारी अद्भुत दुनिया समुद्रात खोलवर जाऊन पाहताना पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे मिटते.
      हर्षा स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख महेश शिंदे हे मरीन इंजिनियर असून चीनमध्ये बोटी बांधण्याच्या व्यवसायात ते होते. ते म्हणाले की, सध्या आमच्याकडे तारकर्ली येथून प्रशिक्षण घेतलेले आणि पॅडी (प्रोमेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्टिफाइड असलेले उमेश डोके, अजिम मुजावर, जितेंद्र शिरसेकर, अबमाव रॉड्रिक्स, प्रेमानंद पराडकर, विजय कोळंबकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहा डायव्हर्स आहेत. प्रत्येक पर्यटकासोबत एक डायव्हर असतो. हे डायव्हर्स आपत्कालीन वैद्यकीय सेवाही देऊ शकतात. वेगवेगळ्या 30 प्रकारच्या व्यक्तींना होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा वेब सूट उपलब्ध आहेत. डायव्हिंगसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही वेळ उत्तम असते. अर्थातच पावसाळा, वादळ इत्यादी नैसर्गिक बदलांच्या काळात डायव्हिंग करता येत नाही.
      हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साखर खामेला माणूस या नाटकाच्या चमूसोबत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले, पॅडी कांबळे यांनीही रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. अचलपूर (अमरावती) येथील आमदार बच्चू कडू रत्नागिरीच्या समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेऊन गेल्यानंतर अमरावती, वर्धा, बुलडाणा इत्यादी भागातूनही चौकशी होऊन तेथून पर्यटक येऊ लागले आहेत. त्यांच्यासह सर्वच पर्यटकांना प्रवास, निवास आणि भोजनासह विविध सुविधा मैत्री गमुपकडून पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी खास पन्नास टक्के सवलत दिली जात आहे.
      इतर भागात प्रसिद्धी झाल्यानंतर बाहेरचे पर्यटक रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद आवर्जून घेत आहेत. स्थानिक लोकांनी एकदा तरी हा आनंद लुटायला हवा. स्वतः अनुभव घेऊन तो इतरांना सांगितला, तर त्याचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल. पर्यटनाला आल्यावर रत्नागिरीत वेगळे आहे काय आहे, असा प्रश्न पडणार्‍या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग असे उत्तर आता द्यायला हरकत नाही.
............

जिल्हाधिकार्‍यांचे प्रोत्साहन
      जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू करायला प्रोत्साहन दिले. रत्नागिरी नगरपालिका प्रशासन, मेरिटाइम बोर्ड यांचेही संपूर्ण सहकार्य लाभलेच, पण स्थानिक नागरिक, जाकीमिर्‍या ग्रामपंचायतीचेही विशेष प्रोत्साहन मिळाले. प्रकल्प सुरू झाल्यामुळे पाच-सहा कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर मिर्‍या गावात वर्दळ वाढल्याने महिला बचत गट, स्थानिक हॉटेल्सचा व्यवसाय होऊ लागला, हीसुद्धा जमेची बाजू आहे. हर्षातर्फे आता नाइट स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंगसह धाडसी खेळही मिर्‍या, अलावा परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळेही पर्यटकांचा रत्नागिरीकडे ओढा वाढेल. स्थानिकांना स्कुबाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
..........

रोजगाराच्या अनेक संधी

      स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याचीच ही काही उदाहरणे. मालवणचा भूषण परब हा तरुण तारकर्लीत गाइड म्हणून काम करतो. भूषणच्या घरची परिस्थिती बेताची होती. पण त्यावर मात करत या तरुण ओपन वॉटर (18 मीटर), अ‍ॅडव्हान्स ओपन वॉटर (30 मीटर), रेस्क्यू डायव्हर या प्रकारच्या डायव्हिंगचे धडे घेतले. त्यानंतर मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग या ठिकाणी तो डायव्हिंगमधला मार्गदर्शक म्हणून काम करतो.
      बारावीनंतर फुड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणारा मालवणचाच सूरज भोसले स्कुबा डायव्हिंगचे धडे देतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यासाठी जिद्दीने तो मेहनत करत आहे. गोव्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे त्याने तेथेच काम केले. लहानपणापासून पोहण्याची आवड होती. त्याचा करिअरसाठी उपयोग झाला. परदेशात नोकरीची संधी मिळाली होती, पण भारतातच राहून काम करायची त्याची इच्छा तो पूर्ण करतो आहे.
      ड्राय डॉकमध्ये बोटी आणून दुरुस्त करताना लाखो रुपये खर्च करावा लागतो. त्याऐवजी समुद्रात बोट असताना पाण्याखाली जाऊन म्हणजे स्कुबा डायव्हिंग करून बोट दुरुस्त करण्याचे काम कमी खर्चात होते. हे कौशल्याचे काम असते. आता रत्नागिरीमध्येही असे काम हर्षाचे डायव्हर्स करू शकतात. रत्नागिरीत प्रथमच अशी सुविधा देण्यात येत असल्याने कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे प्रशिक्षण घेण्याची आणि त्यातून रोजगाराची नवी संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे.
.........

अनुभवाचे बोल...

अजब गजब दुनियेची सफर...
      दिल तो बच्चा है जीमच्या प्रयोगाच्या निमित्ताने रत्नागिरीला आमची टीम गेली होती. त्यावेळी मिर्‍या बीचवरील हर्षा स्कुबा डायव्हिंगवाल्यांनी एक कायमचा अविस्मरणीय अनुभव दिला. स्कुबा डायव्हिंगबद्दल ऐकून होतो. पण दर वेळी काही ना काही कारणाने मिस व्हायचं. शेवटी तो योग हर्षाच्या निमित्ताने जुळून आला. पाण्याखालच्या एका वेगळ्याच अजब गजब दुनियेची सफर केली. एवढी रंगीबेरंगी दुनिया तर आता जमिनीवर पण नाही राहिली .... आणि मुळात कौतुक करेन ते हर्षा स्कुबा डायव्हिंगचे. उत्तम अशी वेल इक्विप्ड सगळी साधनसामग्री, अतिशय उत्कृष्ट वेल ट्रेण्ड डायव्हर्स, जे तुमच्या सुरक्षिततेचा विचार करतातच पण त्यासोबत उत्तम अशी माहितीसुद्धा देतात.... संपूर्ण स्टाफही जिभेवर जवळ जवळ साखर ठेवूनच असावेत असा....  रत्नागिरीला गेलात तर नक्की अनुभव घ्या.
- प्रसाद खांडेकर

* समुद्राखालील अनोखी दुनिया प्रथमच पाहिली. असंख्य प्रकारचे लहान, मोठे मासे पाहिले आणि खूपच आनंद झाला. रत्नागिरीकरांनी स्कूबा डायव्हिंग करून हा आनंद घ्यावा.
- शौनक मुळ्ये
(वय वर्षे 12)
.....................

आता साहसी खेळांचा थरार
      तरुणाईचे साहसी खेळांचा थरार अनुभवण्याचे वेड लक्षात घेऊन Harsha Adventure Park च्या प्रयत्नाने मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत प्रगल्भतेने कॅम्पिंग साइट विकसित करण्यात आली आहे.
      अॅडव्हेंचरचा अविभाज्य भाग असलेले रोप क्टिव्हिटी, ऑब्स्टॅकल्स, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, तिरंदाजी, झोर्बिंग बॉल इत्यादी विविध साहसी ११ क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
      अॅडव्हेंचर हे नुसते शारीरिक परिश्रमाचे किंवा सुदृढ मानसिकतेची परीक्षा घेणारे माध्यम राहिलेले  नाही. मुलांना पिकनिक स्पॉटवर नेण्यापेक्षा दोन दिवसांच्या अॅडव्हेंचर पार्कला पाठवणेसुद्धा योग्य आहे. पूर्वी जमिनीवरील साहस खेळांपुरत्या मर्यादित असलेल्या अॅडव्हेंचरला आता वेगळी दिशा मिळाली आहे. मिऱ्या बंदरावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरीतील नामवंत जिद्दी माउंटेनीअरिंगचे प्रमुख धीरज पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे क्रीडाप्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
.................
हर्षाचा आस्वाद घेण्यासाठी...

संपर्क ः 9099025533
हर्षा हॉलिडेज - 9619246419
सुहास ठाकुरदेसाई - 9822290859
कौस्तुभ सावंत - 9822988080
..........
(डव्हेंचर स्पोर्ट्सकरिता संपर्क – धीरज पाटकर - ८३९०७६४४६४)

डव्हेंचर स्पोर्ट्सविषयी अधिक माहितीसाठी कोकण मीडियाच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/tXuxFVj4M2g
....................
(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक कोकण मीडिया, ता. ३ मार्च २०१८)
………

























Friday, 11 May 2018

वानरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपकरण



      लांजा :  वानर आणि माकडांना पळवून लावून शेतीचे संरक्षण करणारे घरगुती उपकरण सूर्यकांत गणेश पंडित ऊर्फ राजू पंडित या साटवली (ता. लांजा) येथील तरुण शेतकऱ्याने तयार केले आहे. घरच्या घरी तयार केलेल्या या उपकरणाचा चांगला फायदा झाल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.
      कोकणात अलीकडे वानर आणि माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी वानरमारे नावाची जमात वानरांना आपल्या तिरकमठ्याने मारत असे. नंतर वानरांना मारण्यावर कायद्याने बंदी आली. वानरमाऱ्यांची जमातही रोजगाराच्या इतर उद्योगांमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची भटकंती बंद झाली. त्यामुळे वानरांची हत्या थांबली.
दरम्यानच्या काळात जंगतोडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वानरांसह अनेक प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. परिणामी वानरांचा मानवी वस्तीकडचा राबता वाढला. नारळीपोफळीसह सर्वच फळांची लागवड आणि भाजीपाल्याची नासधूस त्यांनी सुरू केली. एखाद्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर बसावेत, अशा पद्धतीने वानरांच्या टोळ्या भाजीपाल्याच्या पिकांमध्ये वावरू लागल्या. त्यांचा बंदोबस्त करणे जिकिरीचे बनले. शेतीच्या रक्षणासाठी बंदुकांचे परवाने दिले जात असले, तरी ते सरसकट मिळत नाहीत. शिवाय त्यांचा वापर करून वानरांना मारणे हा गुन्हा ठरविला गेला. त्यामुळे हाकारणे, फटाके वाजविणे, डबे वाजविणे, आरडाओरडा करून त्यांना हाकलणे एवढेच हाती राहिले.
मोठ्या आवाजाला वानरे घाबरतात, हे लक्षात घेऊन राजू पंडित यांनी एक उपकरण तयार केले आहे. वानरांना पळवून लावण्यासाठी आवाज करणारे एक यांत्रिक उपकरण एका प्रदर्शनात पाहिल्यानंतर राजू पंडित यांना असे उपकरण स्वतःच तयार करण्याची कल्पना सुचली. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाइपचा वापर करून ते तयार करण्यात आले आहे. या पाइपची बंदुकीसारखी विशिष्ट रचना करण्यात आली आहे. त्याला घरगुती गॅस पेटविण्याचा लायटर बसविण्यात आला आहे. बंदुकीच्या नळकांड्याच्या बाजूने कांदा किंवा बटाटा आत खोलवर बसवायचा. त्यानंतर लायटरची ठिणगी जेथे पडते, तेथे परफ्युमसारख्या गॅसच्या बाटलीतून थोड्याशा गॅसची फवारणी करायची आणि तो कप्पा बंद करून बंदूक दूरवर रोखायची. त्यानंतर लायटरचे बटन दाबून ठिणगी पाडायची. ठिणगी पडताच कांदा-बटाटा साधारणतः तीस मीटर अंतरापर्यंत दूरवर उडून जातो. जाताना तो मोठा आवाज करतो. या आवाजाने वानर उडून जातात. काही तास तरी ते परत येत नाहीत, असा अनुभव राजू पंडित यांनी घेतला आहे.
हे उपकरण तयार करायला एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे श्री. पंडित यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर घरच्या घरी हे उपकरण तयार करता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी राजू पंडित यांचा संपर्क क्रमांक - 9422322075
..............
उपकरणाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या खालील यूट्यूब चॅनेलवर क्लिक करा.