लांजा : तालुक्यातील साटवली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ चा
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव रविवारी (ता. २४) साजरा होत आहे.
शिवकालीन ऐतिहासिक गढी
असलेल्या साटवली गावात स्वातंत्र्यापूर्वी ८० वर्षे शाळा सुरू झाली. लोकमान्य
टिळकांच्या जन्माच्या वर्षीच सुरू झालेल्या या शाळेत राष्ट्रीय विचाराचे
विद्यार्थी तयार व्हावेत, हा उद्देश ठेवण्यात आला होता. इंग्रजांच्या राजवटीत
सर्वत्र इंग्रजी शिकविणाऱ्या शाळा असताना साटवलीतील या मराठी शाळेने वेगळा इतिहास
निर्माण केला होता. स्वातंत्र्यानंतर ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली. शाळेचा
फारसा इतिहास माहीत नसला, तरी यावर्षी शाळेला दीडशे वर्षे होत आहेत. हा महोत्सव
साजरा करण्याकरिता प्रसाद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली शतकोत्तर सुवर्ण महोत्सव
समिती स्थापन करण्यात आली आहे. आदेश आंबोळकर उपाध्यक्ष, तर महेंद्र आंबोळकर
समितीचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.
शाळेत साठ वर्षांपूर्वी
शिकणाऱ्या आणि साठी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महोत्सवाच्या
निमित्ताने करण्यात येणार आहे. साटवलीच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिराच्या
प्रांगणात रविवारी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. आमदार राजन साळवी, शिक्षण
समिती सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्या वृषाली कुरूप, शिक्षणाधिकारी एकनाथ
आंबोकर, लांजा पंचायत समितीच्या उपसभापती प्रियांका रसाळ, माजी जिल्हा परिषद
अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी आरोग्य सभापती दत्ता कदम, माजी उपसभापती आदेश
आंबोळकर, शिक्षण समन्वय समितीचे संदीप दळवी, लीला घडशी इत्यदी मान्यवर यावेळी
उपस्थित राहणार आहेत. साटवलीच्या या शाळेविषयी, माजी विद्यार्थ्यांविषयी कोणाला
माहिती असेल, तर ती त्यांनी या समारंभाच्या निमित्ताने सादर करावी आणि समारंभाला
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीने केले
आहे.
...........
(संपर्क – प्रसाद पंडित - ९४२०९१०२०६)