Saturday, 13 October 2018

कुरतडे येथील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू



संतोषीमाता
      रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला आहे.
      कुरतडे येथील पालवकरवाडीतील निसर्गरम्य परिसरात एकतीस वर्षांपूर्वी संतोषीमाता मंदिराची स्थापना करण्यात आली. परिसरातील ग्रामस्थांनी वर्गणी काढून मंदिराची उभारणी आणि सुशोभीकरण केले. त्यामध्ये चाकरमान्यांचा मोठा हातभार लागला. मंदिर स्थापन झाल्यापासून दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने गरबा नृत्यही आयोजित केले जाते. यावर्षीही नवरात्रोत्सव थाटात सुरू झाला आहे. पारंपरिक पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दररोज देवीची आरती केली जाते. त्यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग असतो. लहा मुले तसेच पुरुष आणि महिलांसाठीही दररोज फनीगेम्स घेतले जातात. तरुणांच्या आकर्षणाचा बिंदू असलेल्या गरबानृत्याचा कार्यक्रम दररोज रात्री आयोजित केला जातो. कोकणाची ओळख असलेल्या जाकडी नृत्याचे कार्यक्रमही केले जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
      नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जय संतोषीमाता नृत्य नाच नमन मंडळातर्फे नारायण पालवकर  आणि गोपाळ पालवकर यांनी केले आहे.
........
कुरतडे (ता. रत्नागिरी) पालवकरवाडीतील संतोषीमाता मंदिर.


-    ...................

Sunday, 7 October 2018

रत्नागिरीत दर महिन्याला सायकल फेरीचे आयोजन करावे – राहुल पंडित


      रत्नागिरी : सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग आवश्यक असून या उपक्रमाच्या प्रसारासाठी दरमहिन्याला रत्नागिरीत सायकल फेरीचे आयोजन केले पाहिजे. नगरपालिकेकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली.

वीरश्री ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत नव्यानेच स्थापन झालेल्या सायकल क्लबतर्फे रत्नागिरी शहर ते हातखंबा आणि परत अशा वीस किलोमीटरच्या पहिल्या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष श्री. पंडित यांनी रत्नागिरी ते हातखंबा आणि परत ही संपूर्ण फेरी पूर्ण केली. त्यानंत समारोप प्रसंगी ते बोलत होते.

तत्पूर्वी फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता झाले. शिवाजीनगर आठवडा बाजाराजवळ आयटीआयसमोर या फेरीचा प्रारंभ झाला. शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची भरपूर वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यांवरून सायकलस्वारांना जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता स्वतंत्र ‘सायकल ट्रॅक’ करावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांंनी त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी काही वेळ स्वतः सायकलने या फेरीत सहभागी झाले. वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी सायकल क्लबचे अध्यक्ष, रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यावेळी म्हणाले की, रत्नागिरी सुंदर शहर आहे. ते तसेच राहावे, हे एक नागरिक म्हणून मनापासून वाटते, तर एक डॉक्टर म्हणून सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये रत्नागिरीकरांचे आरोग्य उत्तम राहावे हीदेखील भावना आहे. त्यातूनच सायकल क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे उद्घाटन म्हणून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग ही सर्वांची सवय बनावी, हा आमचा प्रयत्न असेल.

फेरीच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभूते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या फेरीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले. या वेळी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते धरमसी चौहान यांनी फेरीला झेंडा दाखवला.
फेरीसोबत रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था 10 ठिकाणी केली होती. येथे सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे चिरायू हॉस्पीटलशेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा सायकलपटूंना दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय महाडिक यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, नितीन दाढे तसेच धन्वंतरी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, सामाजिक संस्थांनी या फेरीचे उत्तम नियोजन केले होते. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अॅधड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्विलिटी यांचे सहकार्य लाभले. सांगता कार्यक्रमात सहभागी मोठ्या व्यक्तींना मेडल्स देण्यात आली तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणार्या  सायकल फेरीमुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. असे उपक्रम दोन महिन्यांतून एकदा तरी व्हावे, अशी अपेक्षा सार्यां्नी व्यक्त केली.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्वतः वीस किलोमीटरची रॅली पूर्ण केली. हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी प्रदूषणमुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी इंधन बचत करणारी व फिटनेस राखणारी सायकल सर्वांनी चालवावी व ‘सायकल डे’ साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
सुदृढ आरोग्य, सुंदर शहर आणि वाढते इंधन दर यावर एकत्रित उपाय म्हणून सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्याकरिता क्लब स्थापन झाला. आजच्या रॅलीनंतर सभासद संख्या वाढू लागली आहे. दररोज सायकलिंग आणि दर रविवारी सायकल भ्रमण मोहीम सुरू करण्याचा मानस या क्लबचा आहे.
  
 

.............

सायकल फेरीच्या समारोप समारंभात बोलताना रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित. सोबत डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षेडॉ. नीलेश शिंदेडॉ. सौ. तोरल शिंदे.
..........


सायकल फेरीच्या आयोजनाविषयी डॉ. नीलेश शिंदे यांचे मनोगत पाहा कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा –



............


Saturday, 15 September 2018

कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवावे




साप्ताहिक कोकण मीडिया गेली दोन वर्षे रत्नागिरीतून प्रसिद्ध केले जाते. साप्ताहिकाबरोबरच दिवाळी अंक हेही कोकण मीडियाचे वैशिष्ट्य लागोपाठच्या दोन दिवाळी अंकांनी कोकणासह मुंबई-पुण्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ते कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगळेपणाचे पुढचे पाऊल उचलताना यावर्षीचा दिवाळी अंक जलवैभव विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला जाणार आहे.
विस्तीर्ण समुद्र, नद्या, धबधबे, तलाव, पाणवठे अशा अनेक स्रोतांनी कोकणाला जलसमृद्धी लाभली आहे. भरपूर पाऊस पडणार्या कोकणात उन्हाळ्यातली पाणीटंचाई ही एक समस्या असली, तरी याच कोकणात उंच डोंगरात, खार्या पाण्यात उभारलेल्या किल्ल्यांमध्ये, गावांच्या मध्यभागी बारमाही जलसाठे आढळतात. वेगवेगळ्या जलस्रोतांना पौराणिक, ऐतिहासिक परंपरा लाभली असून अनेक नवे तलाव नवा इतिहास निर्माण करत आहेत. अनेक मंदिरांनी धार्मिक अधिष्ठानातून जपलेले तलाव तेथील निसर्गसौंदर्यामुळे आता पर्यटनाची ठिकाणे झाली आहेत. कोणे एके काळी दुर्गम समजल्या जाणार्या कोकणातील दुर्गम ठिकाणचे धबधबे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. उंच धबधब्यांचा आनंद घेतानाच बॅकवॉटर जलविहाराची अनेक ठिकाणे गर्दीने गजबजून जात आहेत. स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत समुद्राच्या तळाचे सौंदर्य अनुभवले जात आहे.
वेगवेगळ्या स्वरूपात कोकणाचे जलवैभव ठरलेल्या अशाच काही ठिकाणांचा परिचय यावेळच्या दिवाळी अंकात करून देण्यात येणार आहे.
या अंकासाठी मजकूर पाठवावा. जलवैभवाविषयीचे लेखन पाठविताना सोबत छायाचित्रेही असावीत. विशिष्ट ठिकाणे असतील, तर त्याविषयी सविस्तर माहिती, ऐतिहासिक संदर्भ, ठिकाणाचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, वाहतुकीची व्यवस्था, ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा जवळचा रस्ता, अंतर, परिसरातील इतर ठिकाणे असा तपशील दिल्यास इच्छुक वाचकांना त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल.
मजकूर, छायाचित्रे ई-मेलने पाठविण्यासाठी सोबत पत्ता दिला आहे.
कळावे.
     आपला,
- प्रमोद कोनकर, संपादक
मजकूर पाठविण्याची अंतिम मुदत – १० ऑक्टोबर २०१८
पत्ता - कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
       कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), गांधी ऑटोमोबाइल्सच्या मागे,
       खेडशी, रत्नागिरी - ४१५६३९
ईमेल - kokanmedia1@gmail.com


Friday, 10 August 2018

मठच्या लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात रविवारपासून श्रावणोत्सव


      लांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात दर रविवारी श्रावणोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या रविवारपासून (ता. १२ ऑगस्ट) श्रावणातील पहिल्या रविवारी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी श्रावण महिन्यात पाच रविवार येणार आहेत. शेवटचा रविवार ९ सप्टेंबर रोजी आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आले. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारले आहे. म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. यावर्षी करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराचे कलशारोहण झाले. मंदिरात नित्यविधी सुरू आहेत. श्रावणातील रविवारची पल्लीनाथी उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्याकरिता दर रविवारी पूजा, अभिषेक, लघुरुद्र आणि महारुद्र तसेच पवमान अभिषेक केला जाणार आहे. कुलोपासकांनी धार्मिक विधींसाठी शशिकांत गुण्ये, सुधाकर चांदोरकर किंवा संस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रेषक – सुधाकर चांदोरकर, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी. फोन - 9422646765

Monday, 16 July 2018

छोट्या संधी शोधून त्या मोठ्या करणारे उद्योजक होतात – डॉ. श्रीधर ठाकूर

      रत्नागिरी : स्पर्धेच्या आजच्या युगात यशाच्या संधी खेचून आणाव्या लागतात. छोट्या संधी शोधून काढून त्या मोठ्या करणारेच यशस्वी उद्योजक बनतात. त्याकरिता कठोर परिश्रम आणि चांगला संपर्कही निर्माण करावा लागतो, असे प्रतिपादन मुंबईतील इन्फिगो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
रत्नागिरी : केबीबीएफच्या बैठकीत
मार्गदर्शन करताना मुंबईतील इन्फिगो कंपनीचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर.

     कऱ्हाडे  ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी (ता. १५ जुलै) झालेल्या व्यावसायिक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कऱ्हाडे ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक, व्यावसायिक देवाणघेवाण आणि त्यामधून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. ठाकूर यांनी उद्योजक आणि व्यावसायिक या संज्ञांमधील फरक स्पष्ट करून यशस्वी होण्याची कौशल्ये यावेळी विशद केली. ते म्हणाले की, एखादा उद्योग मनात जन्मावा लागतो. त्यावर बुद्धी विचार करते. त्यावर अचूक आणि योग्य कृती केली गेली, तर उद्योग यशस्वी होतो. अनेकदा अपयश आले, तरी जो त्यातून शिकून आपल्यामध्ये बदल घडवून आणतो, तोच यशस्वी होतो. एकदाच अपयश आले, तर त्यापासून परावृत्त होऊन त्याबाबतच्या तक्रारी करणारे व्यवसाय करू शकत नाहीत. ते नोकरीच करत राहतात. देशातील तसेच जगभरातील विविध ठिकाणच्या उद्योगांचे दाखले देऊन त्यांनी कोकणातील सोनचाफा, फणस, कोकम इत्यादी अनेक फळांची लागवड आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांमधील संधी उलगडून सांगितल्या. स्मिथ अँड नेफ्यू कंपनीचे व्यवस्थापक मंगेश प्रभुदेसाई यांनी देवरूख येथील बाळासाहेब पित्रे आणि विमलताई पित्रे यांनी उभारलेल्या अॅडलर-सुश्रुत या बहुराष्ट्रीय कंपनीच्या यशाचा प्रवास उलगडला. अनेकदा अपयश येऊनही कोकणासारख्या दुर्गम आणि मागास भागात तयार केलेले वैद्यकीय उपकरणांची निर्यात जगातील सर्वांत प्रगत देशात करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना कोणती दिव्ये करावी लागली तसेच नवी कोणती मानके त्यांनी तयार केली, याची यशोगाथा श्री. प्रभुदेसाई यांनी सांगितली.
केबीबीएफच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष अॅड. संदेश शहाणे यांनी रत्नागिरी शाखेच्या वाटचालीचा, तर केबीबीएफ ग्लोबलचे सचिव अमित शहाणे यांनी अन्य विविध शाखांचा आढावा घेतला. व्यावसायिकांसाठी लवकरच पतसंस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या जोशी एन्टरप्रायझेसचे कौस्तुभ कळके यांनी या मेळाव्याचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. मेळाव्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे तसेच कोल्हापूरमधील उद्योजक उपस्थित होते. सर्व प्रतिनिधींनी आपापल्या व्यवसायांविषयीची माहिती सांगितली. प्रातिनिधिक स्वरूपात प्रशांत पाध्ये, योगेश मुळ्ये, सुहास ठाकूरदेसाई, अभय खेर यांनी संघटनेविषय़ीचे अनुभव सांगितले.
.................

डॉ. ठाकूर यांचे संपूर्ण भाषण कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/PuYrKD0hgug


Monday, 18 June 2018

संगमेश्वरी बाजचा प्रयोग नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतल्याने कलाकार भारावले



      रत्नागिरी : मुलुंड (मुंबई) येथे नुकत्याच पर पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचा साज संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकतेचा कोणताही अऩुभव नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक लोककलांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा प्रयोग नाट्यरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अशा प्रतिसादामुळे हुरूप आला आहे, अशी भारावलेली प्रतिक्रिया या कार्यक्रमातील कलाकारांनी दिली.
      यावर्षीच्या नाट्य संमेलनात व्यावसायिक नाटकांच्या ऐवजी सलग साठ तास राज्यभरातील लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेकडून कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली होती. ती मंजूर करण्यात आली. गेल्या १४ जून रोजी पहाटे पाच वाजता हे सादरीकरण करण्यासाठी वेळ मिळाला. रसिकांच्या प्रचंड टाळ्या आणि शिट्या कार्यक्रमाला मिळाल्या. कोकणातील जाखडी, नमन आणि त्यातील गणपती, संकासूर, गणगवळण, कृष्ण ही पात्रे दाखवली. तेथे आलेले अनुभव सांगण्यासाठी कलाकारांनी रत्नागिरीत आल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संमेलनाच्या दरम्यान आलेले अनुभव सांगण्यात आले. कार्यक्रमाला गर्दी होईल का, याची शंका वाटत होती. नामवंत कलाकारांसमोर कार्यक्रम सादर करण्याचे दडपण वाटत होते. पण पहिल्या मिनिटापासूनच कार्यक्रम रंगू लागला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षागृहातील नामवंत कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. ज्या कलाकारांसोबत आम्ही कार्यक्रमापूर्वी सेल्फी काढत होतो, तेच कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढत होते. या क्षणानेच आम्ही सर्वजण धन्य झालो, आमचा परफॉर्मन्स सार्यांोना आवडला व शेवटच्या क्षणी उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी नाट्यसृष्टीतील प्रसाद कांबळी, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, संतोष पवार, अविनाश नारकर, मधुरा वेलणकर, मंगेश कदम आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे रत्नगिरी शाखाध्यक्ष उदय सामंत, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यामुळेच मुंबईत कार्यक्रमाची संधी मिळाल्याचे या कलाकारांनी आवर्जून सांगितले. नाट्य परिषदेच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कलाकारांसह समीर इंदुलकर, सनातन रेडीज, प्रफुल्ल घाग, सौ. पूजा बावडेकर, श्याम मगदूम, विजय साळवी उपस्थित होते.
      कार्यक्रमात संगमेश्वनरी बोलीचा ११२ वा प्रयोग सादर करण्यात आला. पहिला प्रयोग आणि आताचा प्रयोग यात अनेक सुधारणा, नवीन स्कीट सादर केले. मृदंगाच्या तालावर सुरवात केल्यापासून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळू लागल्या. संकासुर प्रेक्षकांतून आणल्यानंतर प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचले. बाळकृष्णाचे पात्र रंगवणार्यां आठ वर्षीय रुद्र योगेश बांडागळे याला प्रेक्षकांकडून रोख पारितोषिके मिळाली. रसिकांमधून प्रत्येक क्षणाला प्रोत्साहन मिळत होते, असे कलाकारांनी सांगितले. सुनील देवळेकर यांच्या टीमने नेपथ्य, लाइट्सची व्यवस्था ५ मिनिटांत करून दिली. संमेलनात कल्पकतेने नेपथ्य केले होते. रंगवलेल्या जुन्या ट्रंकापासून कमानी बनवल्या होत्या. पताकांवर नाटकांची नावे लिहिली होती. वायफळ खर्चाला फाटा दिल्याचे दिसत होते. संमेलनात आदरातिथ्य, निवास, भोजनाची व्यवस्था व नियोजन सुरेख होते. हे परिषदेचे यश आहे, असेही कलाकारांनी आवर्जून नमूद केले. संगमेश्वारी बोलीचा कार्यक्रम छान झाला. पहाटेच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका होती. पण प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते. सर्व कलाकारांची कामे सुरेख झाली व नवखेपणा जाणवला नाही. पहिल्या मिनिटापासून प्रयोग रंगतदार झाला”, अशी प्रतिक्रिया मुंबईतील व्यावसायिक नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी दिल्याचा उल्लेख कलाकारांनी आवर्जून केला.
      संगमेश्वरी बाजच्या प्रयोगात सुनील बेंडखळे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण, सचिन काळे, योगेश बांडागळे, राज शिंदे, अथर्व सुर्वे, राहुल कापडे, सौरभ कापडे, गणेश कुवळेकर, हृषीकेश कुवळेकर, साहील सुर्वे, स्वप्नील सुर्वे, अंकुश तांदळे, सुरेंद्र गुडेकर, रुद्र बांडागळे, विश्वास सनगरे, प्रभाकर डाऊल, संजय गोताड, मिलिंद लिंगायत आणि अनिकेत गानू यांनी विविध भूमिका सादर केल्या.
.............
या कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील खाली दिलेली लिंक क्लिक करा –








Tuesday, 5 June 2018

पर्यावरण दिनानिमित्ताने `जलवर्धिनी`चे जलवर्धनाचे आवाहन



      रत्नागिरी - कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले आहेत. प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाणी साठविण्याचे आवाहन जलवर्धिनीने केले आहे. पाणी साठविण्याची टाकी बांधण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि ठरावीक साहित्य जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पुरविले जाणार आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तुलनेने कमी खर्चात पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले असून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशा साठवण टाक्या प्रतिष्ठानने बांधल्या आहेत. जलवर्धिनीतर्फे फेरोसिमेंट आणि नैसर्गिक धाग्यांच्या वापरातून टाक्या तयार केल्या आहेत. त्यांचा ठिकठिकाणी चांगला उपयोग होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका गुहागर तालुक्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर फेरोसिमेंटच्या 18 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. आवश्यक तेथे गरजूंना जलवर्धिनी प्रतिष्ठानने मदतही दिली आहे. यापुढेही मदत दिली जाणार आहे. इच्छुक गरजूंकरिता 10 फूट व्यास आणि 4 फूट उंचीची सुमारे 9 हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेली टाकी बांधून दिली जाईल. त्याकरिता शेतकऱ्यांनी 12 फूट व्यासाचे जोते, बांधकामासाठी लागणारी रेती आणि मजुरी देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.

गरजू शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधावा. आपल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत याच मोबाइलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी, असे आवाहन जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक – ९८२०७८८०६१.
.....................
जलवर्धिनीचे तंत्र वापरून शेतीकरिता पाण्याचे कसे नियोजन केले, याबाबतचे परशुराम आगिवले (मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड) या शेतकऱ्याचे अनुभव ऐकण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलला भेट द्या. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/91SY946gFcE

जलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

………………………..

जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक पान