Monday, 22 August 2016

लहानपणीच संगीत संस्कार केल्यास मुले मानसिकदृष्ट्या सशक्त : प्रा. अनिल सामंत

कुडाळ : संगीत आणि मनाचा थेट संबंध आहे. आजकालच्या अस्थिर वातावरणात मुलांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार केले, तर मुले मानसिकदृष्ट्या सशक्त होतील, असे प्रतिपादन गोवा कला अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी येथे व्यक्त केले.
-          कुडाळ – विद्याभारतीच्या संगीत प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
प्रास्ताविक करताना भाई उपाले. शेजारी डॉ. सौ. मेधा फणसळकर, प्रा. श्रीशरण
मडगावकर, प्रा. अनिल सामंत, डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, प्रा. अरुण मराठे.
सिंधुदुर्ग जिल्हा विद्याभारतीतर्फे शिशुवाटिका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी एक दिवसाची संगीत प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (ता. २१) आयोजित करण्यात आली होती. दामले मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लहान मुलांवर संगीताचा कसा परिणाम होतो, हे त्यांनी स्पष्ट केले. विद्याभारतीचे कोकण प्रांत संघटन मंत्री भाई उपाले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ज्या घरात लहान मुले मोठ्या प्रमाणावर दंगामस्ती करतात आणि अस्वस्थ असतात, अशा घरांमध्ये संगीताची जास्त आवश्यकता असते. संगीतामुळे मुले शांत व्हायला मदत होते, असेही त्यांनी सांगितले. ज्या घरात जात्यावरच्या ओव्या, अंगाईगीते, अभंग इत्यादींमधून संगीताचा आविष्कार होतो, त्यामधूनही मुलांवर संस्कार होतात. अलीकडे घरांमधील जात्यांची जागा अत्याधुनिक यंत्रांनी घेतली असल्याने ओव्याही कालबाह्य झाल्या आहेत. मात्र त्यामुळेच मुलांवर संस्कार करण्याचे साधनच आपण हरवून बसलो आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दीपप्रज्वलन आणि सामूहिक वंदनेनंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यशाळेत प्रा. सामंत यांच्याबरोबरच सौ. संध्या कामत, प्रा. अरुण मराठे, प्रा. श्रीशरण मडगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सामंत यांनी अनेक संगीत कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले असून ते कवी, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. सौ. संध्या कामत संगीत विशारद आणि संगीत शिक्षिका असून त्यांनी अनेक संगीत कार्यशाळांमध्ये अध्यापन केले आहे. प्रा. अरुण मराठे विद्याप्रबोधिनी महाविद्यालयात प्राध्यापक असून नाट्य आणि संगीत कार्यशाळांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांना ते मार्गदर्शन करतात. प्रा. श्रीशरण मडगावकर पुरुषोत्तम वालावलकर उच्च महाविद्यालयात हिंदी, मराठीचे प्राध्यापक  आहेत. ते उत्तम तबलावादक असून त्यांनीही अनेक संगीत कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, कणकवली आणि देवगड तालुक्यातील शिशुवाटिका आणि अंगणवाड्यांमधील ७४ कार्यकर्त्या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, सदस्य डॉ. सौ. माधुरी प्रभुदेसाई, डॉ. सौ. रश्मी कार्लेकर, राजू मराठे इत्यादी उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्याभारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्षा डॉ. मेधा फणसळकर यांनी केले.

.......
-          कार्यशाळेतील संगीतमय वातावरणात तल्लीन झालेल्या कार्यकर्त्या.

Saturday, 20 August 2016

पडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ गौरवास्पद – अशोक पत्की



गणेशोत्सवासाठी पावला गणराजाअल्बमचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : गायक कलाकारांप्रमाणेच त्यांना साथ देणाऱ्या पडद्यामागच्या असंख्य कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीच्या विधाता म्युझिकने संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ गौरवास्पद आहे. गौरांग आगाशे याने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला सर्वांनीच साथ दिली पाहिजे, असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, अशोक पत्की यांनी काल (ता. १९) मुंबईत काढले.
मुंबई – रत्नागिरीतील विधाता म्युझिक संस्थेच्या पावला गणराजा
ध्वनिफितीचे प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रकाशन करताना
आमदार उदय सामंत, शंकर अभ्यंकर, अशोक पत्की,
गौरांग आगाशे, अभिजित भट
गायकाचे गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या पडद्यामागच्या संगीत कलाकारांचा परिचय करून देणाऱ्या विधाताम्युझिकआरटीएन (www.vidhatamusicrtn.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन श्री. पत्की यांच्या हस्ते काल मुंबईत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सतारवादक शंकर अभ्यंकर आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. पत्की म्हणाले की, मी नेहमी भाषणातून सांगत आलो आहे की सर्व कलाकारांचा विचार झाला पाहिजे. पडद्यामागील कलाकारांना व्यासपीठ मिळायलाच हवे. रत्नागिरीच्या गौरांग आगाशे त्यासाठी प्रयत्न करत आहे, याचे मला कौतुक वाटते. त्याला या क्षेत्रातील सर्वांनीच मदत करायला हवी. श्री. अभ्यंकर यांनीही या कार्याला शुभेच्छा दिल्या. आमदार उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीच्या कलाकारांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरासारख्या नाट्यगृहात कार्यक्रम करणे हेच मोठे धाडसाचे आहे. यापुढे या उपक्रमासाठी आवश्यक असेल, ती सर्व मदत मी देणार आहे.
     
यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावला गणराजाअल्बमचेही प्रकाशन करण्यात आले. गौरांग आगाशे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. कोणतेही गीत परिपूर्ण करण्यासाठी संगीत संयोजक, वादकांसह पडद्यामागचे इतर अनेक हात झटत असतात. त्यांचा परिचय रसिकांना कधीच होत नाही. तो करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व विद्यमान आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यामुळे संधी मिळणार आहे. पावला गणराजाया ध्वनिफितीतील सर्व गाणीही संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक, १२ उदयोन्मुख आणि प्रथितयश गीतकार, १४ तरुण, नामवंत गायक, ८ लोकप्रिय गायिका, १३ यशस्वी तसेच उदयोन्मुख संगीतकार, १९ सुप्रसिद्ध वादक, २१ कोरस गायक, २ वेबसाइट डिझायनर, २ छायाचित्रकार, १ सीडी डिझायनर, मुंबई-पुणे, कोकणासह विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १२० जणांचे मोलाचे योगदान आहे. त्या सर्वांचा परिचयही संकेतस्थळावर करून देण्यात आला आहे.
      उद्घाटन समारंभाला रत्नागिरी आणि मुंबईतील संगीतप्रेमींनी गर्दी केली होती.  संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन होताच अनेकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

......................................................................................................................................

Friday, 19 August 2016

रत्नागिरीत आर्ट गॅलरी उभारणार : नगराध्यक्ष महेंद्र मयेकर


रत्नागिरी : रत्नागिरीच्या स्वा. सावरकर नाट्यगृहात आर्ट गॅलरी उभारण्याची घोषणा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आज येथे केली. या गॅलरीचा उपयोग फोटोग्राफर्ससाठी फोटोग्राफी प्रदर्शन व चित्रकारांना चित्रप्रदर्शनासाठी होणार आहे. आतापर्यंत छायाचित्रकारांनी माझ्याकडे गॅलरीची मागणी केली नव्हती. मात्र आज वर्ल्ड फोटोग्राफी डेनिमित्त ही मागणी झाली आहे. ती मी मंजूर केली आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले.
रत्नागिरीत जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फुगे सोडताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर,
प्रा. श्रीकांत मलुष्टे, महेश तावरे यांच्यासह छायाचित्रकार.
जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील फोटोग्राफर्सनी आजपासून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांचे उद्घाटन नगराध्यक्ष मयेकर यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नगरसेवक मुन्ना चवंडे, बिपिन शिवलकर, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रा. श्रीकांत मलुष्टे, महेश तावरे, अभिजित गोडबोले, अजय बाष्टे, संजीव साळवी, सचिन झगडे, गुर चौगुले, साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, चारुदत्त नाखरे, विनय बुटाला, प्रसाद जोशी, आदींसह शंभरहून अधिक छायाचित्रकार उपस्थित होते.
नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचे स्वागत रोपटे देऊन करताना विनय बुटाला.
शेजारी महेश तावरे, प्रा. श्रीकांत मलुष्टे, मुन्ना चवंडे, बिपिन शिवलकर.
दुसऱ्या सत्रात गप्पा-टप्पा कार्यक्रमात महेश तावरे व प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी मार्गदर्शन केले. श्री. तावरे म्हणाले की, कोकणात भरपूर निसर्गसौंदर्य आहे. याचा वापर कँडीड फोटोग्राफीसाठी कल्पकतेने करता येईल. फोटोग्राफरला आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी सातत्य, नियमिततेने अभ्यास करावा. स्टुडिओचा धंदा अलीकडच्या काळात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी काळानुसार बदलले पाहिजे. प्रा. मलुष्टे यांनी फोटोग्राफीतील अनुभव सांगितले. ते म्हणाले, आज भारतात अनेक प्रकारची फोटोग्राफी होते. मात्र कॅमेऱ्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. पुण्यात सिंबॉयसिस येथे भारतातील नंबर एकचा फोटोग्राफी कोर्स सुरू आहे.
दुपारच्या सत्रात दामले विद्यालयात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन विद्यार्थी करणार आहेत. सायंकाळी मनोहर पालकर यांनी मानसिक संतुलनावर मार्गदर्शन केले.
छायाचित्र प्रदर्शन पाहताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रा. श्रीकांत मलुष्टे.
फोटोग्राफी डे निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाने जिल्ह्यातील फोटोग्राफर्सची कला आज रत्नागिरीकरांना पहायला मिळाली. जुन्या रत्नागिरीतील ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रे सर्वांना भावली. नेहमी रंगीत फोटो पहायची सवय असते. त्यात कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट फोटो आल्यास जरा बरे वाटते. पण पूर्वीच्या काळात या फोटोंसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. त्यातले छायाचित्रकार म्हणजे पी. एम. काळे, गोपाळ मोरे, बी. एल. कदम, हरिश्चंद्र साळवी, नानूभाई शेठ, गोपीनाथ मलुष्टे, सूर्यकांत साळवी आदी. या छायाचित्रकारांची चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात फोटोवॉकचे आयोजन केले होते. त्यातील निवडक छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. तसेच निसर्गसौंदर्य, फुले, पूल व ऑफबीट छायाचित्रांनी मन वेधून घेतले.

उद्या (दि. २० ऑगस्ट) सकाळी १० वाजता आरोग्य शिबिर,  ११ वाजता फोटोग्राफीच्या मार्केटिंगबाबत सुनील जाधव, १२ वाजता आव्हानांबाबत उदय देसाई मार्गदर्शन करतील. सायंकाळी रत्नागिरीतील फोटोग्राफीवर डॉक्युमेंटरी दाखवण्यात येईल. .३० वाजता सावनी रवींद्र, रोहित राऊत आणि शमिका भिडे यांच्या गीतांचा बहारदार संगीत कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व आमदार उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मँगो इव्हेंटचे अभिजित गोडबोले यांनी केले आहे.

Tuesday, 16 August 2016

संगीत कलाकारांचा परिचय करून देणारे नवे संकेतस्थळ लवकरच

गणेशोत्सवासाठी नव्या कोऱ्या गाण्यांच्या पावला गणराजा अल्बमचेही मुंबईत प्रकाशन

रत्नागिरी : प्रभावी गायनाने रसिकांना मोहविणाऱ्या आणि मुख्यत्वे गायकाचे गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या पडद्यामागच्या संगीत कलाकारांचा परिचय करून देणारे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे. रत्नागिरीच्या विधाता म्युझिक संस्थेच्या या संकेतस्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, अशोक पत्की यांच्या हस्ते येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी कोरी गाणी असलेल्या पावला गणराजा अल्बमचेही प्रकाशन यावेळी होणार आहे.
                संगीत विश्वरूप मानले, तर या विश्वातील कलाकार ताऱ्यांसमान असतात. ते लुकलुकणारे, स्वतेजाने तळपणारे पण स्वयंप्रकाशितही असतात. त्यामुळे गायकाला लोकप्रियता मिळते. आपली तपश्चर्या गायक त्या गीतात ओतत असल्याने तो गायक त्या गीताचा, ध्वनिफितीचा चेहरा बनतो. पण ते गीत परिपूर्ण करण्यासाठी संगीत संयोजक, वादकांसह पडद्यामागचे इतर अनेक हात झटत असतात. त्यांचा परिचय रसिकांना कधीच होत नाही. तो करून देण्यासाठी www.vidhatamusicrtn.com हे संकेतस्थळ रत्नागिरीच्या विधाता म्युझिकतर्फे सुरू करण्यात येत आहे. सर्व विद्यमान कलाकारांना, उदयोन्मुख कलाकारांना त्यामुळे संधी मिळणार आहे.
                रत्नागिरीत २०१० साली सुरू झालेल्या विधाता म्युझिकने संकेतस्थळ तयार करण्यापूर्वी दोन ध्वनिफिती प्रकाशित केल्या आहेत. त्यापैकी एक प्रथमेश लघाटेच्या आवाजातील आहे. विधातातर्फे आणखी एका ध्वनिफितीची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. कोकणातील ज्या ज्या ताऱ्यांनी आज कलाक्षेत्रात अढळपद मिळविले आहेत, त्यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली आहे. यावर्षीचा गणेशोत्सव लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या स्वागतासाठीच २१ गीतांची पावला गणराजा ही ध्वनिफीत तयार करण्यात आली आहे. या ध्वनिफितीमधील सर्व कलाकारांची नाळ कोकणाशी जोडली आहे. ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक, १२ उदयोन्मुख आणि प्रथितयश गीतकार, १४ तरुण, नामवंत गायक, ८ लोकप्रिय गायिका, १३ यशस्वी तसेच उदयोन्मुख संगीतकार, १९ सुप्रसिद्ध वादक, २१ कोरस गायक, २ वेबसाइट डिझायनर, २ छायाचित्रार, १ सीडी डिझायनर, मुंबई-पुणे, कोकणासह विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १२० जणांचे मोलाचे योगदान आहे.
                संकेतस्थळाचे उद्घाटन तसेच ध्वनिफितीचे प्रकाशन अशोक पत्की यांच्या हस्ते १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे. संकेतस्थळावर प्रत्येक कलाकाराची संक्षिप्त ओळख होईल. प्रत्येक गाण्यामागे जे लोक कष्ट घेतात, त्यांचीही ओळख होऊ शकेल. त्याच्या प्रयत्नांची माहिती रसिकांना होईल. आनंदाची अनुभूती निर्माण करणारी संपूर्ण शृंखला रसिकांसमोर उलगडण्याचे लक्ष्य समोर ठेवून संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. कोणताही कलाकार या संकेतस्थळावर स्वतःबद्दलची माहिती, व्हिडीओ, ऑडिओ किंवा लेखी माहिती विनामूल्य देऊ शकेल. पावला गणराजा ध्वनिफितीवरील सर्व २१ गाणी संकेतस्थळावर असून तीही रसिकांना विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.
............


Sunday, 14 August 2016

स्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले दिवस


गांधीजींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे अजूनही तेव्हाच्या आठवणींनी रोमांचित होतात आणि मंतरलेले ते दिवस त्या आजही जगत असल्याची जाणीव होते.
     
यंदा भारतीय स्वातंत्रयाचं सत्तरावं आणि चले जाव चळवळीचं पंचाहत्तरावं वर्ष आहे. त्यानिमित्तानं आकाशवाणीनं याद करो कुर्बानीया सदराखाली विशेष कार्यक्रम प्रसारित केले. त्याकरिता आपापल्या भागातल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी शब्दबद्ध करून पाठविण्याची सूचना प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीला आकाशवाणीकडून करण्यात आली होती. शक्य असेल तर स्वातंत्र्यसैनिकांचे बाइट्स घ्यायलाही सांगण्यात आलं होतं. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती घेऊन पाठवायची जबाबदारी माझी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नारळ मंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आशाताई पाथरे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या हयात असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आहेत. पण त्या मुलीकडे जामनगरला असतात, असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात आशाताईंची भेट झाली होती. त्यांची एकदोन भाषणंही ऐकली होती. भारत छोडो आंदोलनात भाग घेण्याचं आणि पहिला स्वातंत्र्यदिन पाहण्याचं भाग्य आशाताई पाथरे यांना लाभलं होतं, हे माहीत होतं. त्या चळवळीच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आज हयात असल्या, तरी त्या जामनगरला राहायला गेल्याची माहिती नव्हती. त्यांच्याशी कसा संपर्क साधता येईल, असं ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि सध्याचे भाजपचे नेते टी. जी. ऊर्फ बाळ शेट्ये यांचा आशाताईंशी घरोबा आहे. मग कोकजेंच्या बरोबरच बाळासाहेबांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांच्या पत्नी माणिक शेट्ये यांनी आशाताईंची गुजरातमध्ये जामनगरला राहणारी कन्या अरुंधती राजा यांचे संपर्क क्रमांक दिले. त्यातून आशाताईंशी संपर्क करणं सोपं गेलं. अरुंधतीताईंशी बोलणं झालं. आकाशवाणीसाठी आशाताईंची माहिती हवी आहे, असं सांगताच त्यांनी ती द्यायला आनंदानं होकार दिला. त्यांची माहिती दिली. त्यांचे अनुभव प्रसिद्ध झालेल्या ते मंतरलेले दिवसया पुस्तकातील उतारा उपलब्ध करून दिला. तसंच आपल्या आईचा बाइट द्यायची तयारीही त्यांनी दर्शविली.
रत्नागिरीत १५ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या आशाताई पाथरे (पूर्वाश्रमीच्या इंदुताई भिकशेठ गांधी) यांना त्यांच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत प्रतिगामी विचार असलेल्या त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीला पाठवलं. तिथं विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाच्या दिवशी निघालेल्या मोर्चात त्या सहभागी झाल्या. पोलिसांनी मोर्चा अडविला. लाठीमार केला. तेव्हा त्यांचा सहकारी मित्र मधू पोंक्षे याला वाचविण्याचा प्रयत्न आशाताईंनी केला. मात्र या आंदोलनात सहभागी झाल्यानं त्यामुळे सांगलीचं कॉलेज सोडावं लागलं. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. महात्मा गांधींनी डांबून ठेवलेल्या आगाखान पॅलेसवर मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात त्या सहभागी झाल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि येरवडा इथं महिला कारागृहात कारावास भोगावा लागला. तिथून सुटका झाल्यानंतर आंदोलकांना गुप्त पत्रकं पोहोचविण्याचं जोखमीचं कामही त्यांनी केलं.
आशाताईंनी वयाची ९५ वर्षं नुकतीच पूर्ण केली आहेत. एवढ्या वयातही स्वातंत्र्यलढ्याचा विषय काढताच त्या अतिशय रोमांचित झाल्या. तेव्हाचे दिवस किती मंतरलेले होते, ते त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या मोर्चाविषयी अतिशय खणखणीत आवाजात त्या म्हणाल्या,
९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीचा डोंब उसळला, महात्माजींनी देशाला ब्रिटिशांना चले जावचा आदेश दिला. आम्ही मिनू मसानींच्या मोर्चात सहभागी झालो. ब्रिटिशांनी चालतो व्हा, इन्किलाब झिंदाबाद, करेंगे या मरेंगे, ब्रिटिशांनो, चालते व्हा अशा घोषणा देत मोर्चा निघाला होता. मोर्चा चालू असताना आमची धरपकड झाली. तिथून मला येरवड्याच्या महिला जेलमध्ये नेण्यात आलं. तिथे नेल्यानंतर स्पेशल मॅजिस्ट्रेटपुढे केस चालविण्यात आली आणि मला देशद्रोहाच्या आरोपाखाली ३ महिने शिक्षा झाली. सक्तमजुरीची. मग मला जेलमध्ये डांबण्यात आलं. बाहेरून मोठं कुलूप होतं. जेलमध्ये पाण्याचा अभाव होता. खाण्याला बटाट्याची भाजी. त्यात किडी. त्या काढून टाकायच्या आणि खायचं. दुसरं काही मिळायचंच नाही. अशा तऱ्हेने आम्ही दिवस काढले. अशा तऱ्हेने देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आम्ही त्रास घेतला. नवीन पिढीनं देशाशी एकनिष्ठ राहून हे स्वातंत्र्य यावचंद्रदिवाकरौ टिकवावं, अशी माझी इच्छा आहे. नवी पिढीनं जगामध्ये देशाला उच्च स्थान द्यावं. देशाची प्रामाणिक राहून देशाची मान जगात उच्च स्थानावर न्यावी.
जय हिंद. जय हिंद.

आशाताईंचा संदेश प्रत्यक्ष त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

-          प्रमोद कोनकर
-          pramodkonkar@yahoo.com
................
संदर्भ – ते मंतरलेले दिवस. संकलन – डॉ. रोहिणी गवाणकर, नंदा आपटे. प्रकाशक – मणि भवन गांधी संग्रहालय, १९, लॅबर्नम रोड, मुंबई – ४००००७. (किंमत १०० रुपये)

Saturday, 13 August 2016

अनाथ, आर्थिक मागास, निराधारांसाठी निवास-भोजनासह मोफत शिक्षण

राज्यभरातील विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी जिल्ह्यात तळगाव येथे हक्काचे ठिकाण


-    तळगाव (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील परिमल गुरुकुल
रत्नागिरी : राज्यभरातील अनाथ, आर्थिक मागास आणि निराधारांसाठी निवास-भोजनासह मोफत माध्यमिक शिक्षणाची सुविधा रत्नागिरी जिल्ह्यात तळगाव (ता. राजापूर) येथे उपलब्ध झाली आहे. शिकण्याची आस असूनही आर्थिक स्थितीमुळे ते थांबवावे लागणाऱ्यांसाठी हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे. जातपात, धर्म, पंथ अशा कोणत्याही अडथळ्यांविना या परिमल गुरुकुलात मोफत प्रवेश मिळणार आहे. वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्रात आजही सामान्य कष्टकरी व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकर्‍यांची वाताहत होत आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि अनाथ, निराधार मुलांसाठी श्री वारणा शिक्षण संस्थेने विनामूल्य शिक्षण, भोजन या सामाजिक उपक्रमांतर्गत वसतिगृह योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. या योजनेनुसार शिक्षणासाठी तसेच भोजन आणि निवासासाठीही कोणतीही फी आकारली जाणार नाही. तळगाव (ता. राजापूर) येथे आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
बाजीराव बाळाजी पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ७१ मध्ये वारणा शिक्षण संस्था सुरू केली. गेल्या ४५ वर्षांत या छोट्याशा गावात डोनेशन मिळणाऱ्या शाखांची किंवा शहरामधील शाखांची निर्मिती न करता शिक्षणापासून वंचित असलेल्या ग्रामीण परिसरातील मुलामुलींसाठी शिक्षणाची दालने खुली करण्याचा प्रयत्न कोणतेही राजकीय अथवा संस्थात्मक पाठबळ नसलेल्या वारणा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला गेला. १९९५ नंतर संस्थेचे सचिव डॉ. प्रताप पाटील यांच्या प्रयत्नांतून वारणकाठच्या डोंगरी भागातील ऐतवडे खुर्द (जि. सांगली) या साडेसात हजार लोकसंख्येच्या गावात शैक्षणिक कार्याला चालना देण्यात आली. मुलींना शिक्षणाची गरज म्हणून १९९५ मध्ये कनिष्ठ आणि २००० मध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे या परिसरातील मुली पदवीधर होऊ लागल्या. निमशासकीय आणि शासकीय सेवेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुली यशस्वी होऊ लागल्या. तेथेच गेल्या १० वर्षांपासून विनामूल्य शिक्षण, विनामूल्य भोजन योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा जोपासली आहे.
संस्थेने तळगाव येथे सन २००१ मध्ये ग्रामीण डोंगरी भागातील मुलांसाठी आठवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली. या सर्वांना मोफत शिक्षण दिले जाते. सध्या येथे ८४ विद्यार्थी शिकत आहेत. आता नव्याने वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. परिमल गुरुकुल असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तेथे राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून शिक्षणापासून वंचित, अनाथ विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षणासह निवास, भोजन व्यवस्था देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात अकरावी, बारावी व तंत्रशिक्षण दिले जाणार आहे.
या संस्थेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृह प्रवेशासाठी डॉ. सूरज चौगुले (३७१४५६२८), प्रा. भारत उपाध्ये (९९२१८०८२८६) यांच्याशी संपर्क साधावा.
      संस्थेने आजवर घेतलेल्या दत्तक विद्यार्थ्यांविषयीची माहिती www.parimalgurukul.org या संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच parimalgurukull@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
..................

Sunday, 7 August 2016

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... सावित्रीच्या दुर्घटनेने निर्माण केलेले!

गेल्या सोमवारी रात्री महाडमध्ये अत्यंत भीषण असा अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात अनेक कुटुंबांनी आपली कर्ती-सवरती, जवळची माणसं गमावली. त्यांचं हे दुःख कधीही भरून न येणारं आहे. या अपघातानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा वेळी कसं वागायला नको, याचं उत्तमदर्शनही अनेक घटकांनी घडवलं आहे.
मनामनांत हर्ष खुलवणाऱ्या श्रावण महिन्याचं आगमन यंदा निदान महाराष्ट्रासाठी  तरी दुःखद आणि धक्कादायक बातमीनं झालं. महाडला सावित्री नदीला आलेल्या पुराचा ताण सहन न झाल्यानं तीवरचाब्रिटिशकालीन पूल वाहून गेला आणि सोबत अनेक कुटुंबांच्या आशा-आकांक्षा, नातीगोतीही  पुराच्या लोटात घेऊन गेला. एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठया ओळींची तीव्रता प्रकर्षानं जाणवली आणि कितीही  प्रगती झाली असली, तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचायाचीही सत्यता पटली.
झालेला अपघात नक्कीच कल्पनेच्या पलीकडचा आणि दुर्दैवी होता; मात्र तरीही या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या अपघातांची कल्पना कदाचित सामान्य माणूस करू शकत नसला, तरी सरकारी यंत्रणांना ती असायलाच हवी. तशी ती  आपल्याकडच्या यंत्रणांना नाही, हे या अपघातामुळे उघड झालं. हा पूल वाहून गेल्यानंतर अचानक जाग आल्याप्रमाणे राज्यातल्या सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी  दिले. सांगलीतला आयर्विन पूल, मुंबईतला कळवा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मग ही दुर्घटना घडलीच नसती, तर काय झालं असतं, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. कारण हा अपघात झालाच नसता, तरी यंत्रणेला जाग आणण्यासाठी पुढे एखादा अपघात घडावाच लागला असता, असं म्हणायला पुरेपूर वाव आहे. वास्तविक ज्या मुंबई-गोवा महामार्गावरचा हा पूल वाहून गेला, त्याच महामार्गावरचे किमान वीस ते बावीस पूल ब्रिटिशकालीन किंवा जुने आहेत. सावित्रीसह जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, बाव, काजळी, अर्जुना, पियाळी, गड, भंगसाळ, पीठढवळ अशा अनेक नद्या या महामार्गाला छेदून जात असल्यामुळे एवढे पूल ही या मार्गाची अपरिहार्यता (आणि सौंदर्यही) आहे.
हा संपूर्ण महामार्ग कोकणातून जातो आणि कोकण-गोवा हा वार्षिक सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडणारा प्रदेश असल्यामुळे तिथल्या नद्यांना पूर येणं, पुरात पूल पाण्याखाली जाणं या गोष्टी नव्या नाहीत. (सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचा पीठढवळ पूल हे याचं एक चांगलं उदाहरण आहे.) हे सगळेच पूल जीर्ण झाले नसले, तरीही महाडसारखा अपघात कोकणात कोणत्याही जिल्ह्यात कधीही घडू शकतो, अशी स्थिती आहे. शिवाय अलीकडे कोकणातल्या पर्यटनाचं प्रमाणही वाढीला लागलेलं असल्यानं या मार्गावर कायमच वर्दळ असते. गणपती, नवरात्र, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात तर ही वर्दळ कित्येक पटींनी वाढीला लागते. अशी परिस्थिती असतानाही या मार्गावरच्या पुलांचं ऑडिट होण्यासाठी महाडचा अपघात घडण्याची वेळ यावी लागली.
महाडच्या नागरिकांनी या पुलाबाबत अनेकदा यंत्रणेला सावध केलं होतं. असं असतानाही पुरेशी काळजी घेऊन हा पूल वाहतुकीसाठी वेळीच बंद का करण्यात आला नाही, हा नागरिकांचा सवाल नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शिवाय पर्यायी पूल बांधून तयार असताना आणि वाहतुकीसाठी खुलाही असताना असं का करण्यात आलं, या प्रश्नाचं ठोस उत्तर सरकारकडे नाही. संगमेश्वरातल्या शास्त्री आणि सोनवी नदीवरच्या पुलांच्या नव्यानं उभारणीसाठीही तिथले नागरिक, स्थानिक वृत्तपत्रं यांच्या माध्यमातून सातत्यानं मागणी केली जात आहे; पण आतापर्यंत तरी त्यातून केवळ त्या नागरिकांनाच आपल्या समस्येची उजळणी होण्यापलीकडे  काहीही साध्य झालेलं नाही.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शोधकार्य सुरू केल्यानंतर पहिला संपूर्ण दिवस केवळ घटनास्थळाजवळच सर्व यंत्रणा शोध घेत होत्या. घटनास्थळावरून थोड्याच अंतरावर खाडी आहे आणि तिथून ती नदी अरबी समुद्राला मिळते. अपघात घडला त्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत नदीच्या प्रवाहाला प्रचंड वेग होता. तरीही ती गोष्ट लक्षात न घेता शोधकार्याची व्याप्ती चार-पाच किलोमीटरपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा उद्देशच कळला नाही. तिसऱ्या दिवशी दापोली तालुक्यातल्या आंजर्ल्यात एसटी चालकाचा मृतदेह सापडल्यानंतर शोधाची व्याप्ती वाढवण्यात आली. पाण्याच्या वेगामुळे अधिकाधिक मृतदेह किंवा वाहने लांब अंतरावरच जातील, ही गोष्ट कोणत्याच यंत्रणेच्या कशी लक्षात आली नाही?
आणखी एक गोष्ट म्हणजे विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे एखादी यंत्रणा, जीपीएस यंत्रणा, तसेच आपोआप आपत्कालीन संदेश पाठवणारी यंत्रणा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या, किंबहुना प्रत्येक वाहनातच असायला हवी, अशी गरज या अपघातामुळे अधोरेखित झाली आहे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळण्यास, वाहनांचा शोध घेण्यास नक्कीच हातभार लागू शकतो.
आणखी एक प्रश्न आहे तो राजकीय नेत्यांचा. असा एखादा अपघात झाल्यावर किंवा काहीतरी विचित्र घटना घडल्यावर सरकारला कोंडीत कसं पकडता येईल याचाच विचार विरोधक करत असतात, हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं. चंद्रकांत पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसंच परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं, अशी टीकाही करण्यात आली. सरकारचं दुर्लक्ष झालं नसतं, तर हा अपघात टळला असता, हे शंभर टक्के खरं आहे. त्यामुळे अपघात नैसर्गिक आपत्तीमुळे झाला असला, तरी सरकारही निश्चितच दोषी आहेच; पण दोन वर्षांपूर्वी कोणाचं सरकार सत्तेत होतं, ही गोष्ट विरोधी पक्ष सोयीस्करपणे विसरले. कारण सावित्री नदीवरच्या या पुलाचा प्रश्न साधारणतः तीनेक वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हाच्या सरकारने तरी कोणती कार्यवाही केली होती? त्यामुळे खरं तर आताच्या सरकारला या मुद्द्यावरून दोषी धरण्याचा नैतिक अधिकार विरोधी पक्षाला नाही. आताचं आणि मागचं अशा दोन्ही सरकारांचा यात तितकाच दोष आहे. अर्थात नैतिकता-अनैतिकतेच्या गोष्टी करण्यासारखे दिवस अजून शिल्लक आहेत का, असाही एक प्रश्न आहेच.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी घटनास्थळाला भेट दिली, त्या वेळी हा नैसर्गिक आपत्तीचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत कुठे ना कुठे तरी असे प्रकार होतच असतातअसंही ते म्हणाले. त्या वेळी मुंबई हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी उच्चारलेल्या बडे बडे शहरों मे ऐसे छोटे छोटे हादसे होते हैंया वाक्याची आठवण झाली. या अपघाताला नैसर्गिक आपत्ती तर कारणीभूत आहेच; पण सगळी जबाबदारी निसर्गाच्या गळ्यात मारून सरकारची जबाबदारी संपत नाही, याचा गीते यांना विसर पडला का?
आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा. २४ तास प्रसारण दाखवण्याच्या स्वतःच घालून घेतलेल्या अवाजवी आणि (सरसकट) गरज नसलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आपण काय दाखवतो आहोत, याचेच भान राहिलेले नाही. अर्थात ही बाब याआधीच्याही अनेक अपघात, दुर्घटनांच्या कव्हरेजवेळी दिसून आली आहे. अपघातात जी माणसं बेपत्ता झाली आहेत, त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना तुम्हाला आत्ता काय वाटतंयहा प्रश्न ही माध्यमं कसा काय विचारू शकतात? असा प्रश्न विचारण्याची आणि त्यापुढे जाऊन त्याचं लाइव्ह टेलिकास्टकरण्याची काय गरज आहे? त्यांना भावनावेग आवरत नसल्याचं समोर स्पष्ट दिसतंय, तरी त्या व्यक्तींना प्रश्न विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची काय आवश्यकता आहे? एवढीही संवेदनशीलता माध्यमांकडे असू नये? आजच्या काळात याच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातात, सर्वदूर पोहोचतात आणि बऱ्याचदा अपेक्षित परिणामही साध्य होतो; पण म्हणून त्यांनी ऊठसूट कशाचेही प्रसारण करावे, हे चुकीचेच आहे.
हे आणि असे अनेक छोटे-छोटे, पण महत्त्वाचे प्रश्न अलीकडे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना पडत असतात; पण त्यांची उत्तरे मिळण्याचे त्यांचे भाग्य नाही….मग सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना!


 http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/imouse/questions-questions-and-questions/

.....................