Saturday, 19 November 2016

पालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री रविवारी रत्नागिरीत



      रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि. २० नोव्हेंबर) रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार असलेल्या त्यांच्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असल्याने त्यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रचाराला येत आहेत. जिल्ह्यात चार पालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
      जिल्ह्यात सर्व पालिका निवडणुकीमध्ये भाजपने रणनीती आखली आहे. काही ठिकाणी अनुभवी उमेदवार असून नवोदित आणि सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवारांनाही संधी दिली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या सभेमध्ये या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाच्या योजना अधिक सक्षमतेने रत्नागिरी जिल्ह्यातही राबवण्याचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने पालिकांवर सत्ता मिळवणे महत्त्वाचे असून याकरिता सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्याला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केली.
      दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांच्या जोरदार प्रचारफेर्‍या सुरू आहेत. आता प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार करण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवार, नेत्यांच्या मुलाखती व मतदानासाठी आवाहन गाड्यांमधील एलईडी स्क्रीनवर दाखविले जात आहे. शहरासाठी केल्या जाणार्‍या नव्या योजनांची माहितीही यात दिली जात आहे. रत्नागिरी शहराच्या विकासात भाजपने यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासासाठी नव्या योजना घोषित केल्या आहेत. नळपाणी योजना, रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादींचा फायदा रत्नागिरीकरांना मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने व विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. तसेच कोकणचे खास व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कल्पकतेमुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सुरू झाले आहे. कोकण विकासासाठी भाजप सरकारच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे यातून सिद्ध होत आहे. त्याचा भाजपला नक्कीच उपयोग होईल व भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर व सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केला.
      रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचून माहिती सांगणे, विकासयोजना पोहोचवणे, जाहीरनामा सांगणे असा प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सभा हायटेक प्रचारातून प्रचाराला खरी धार येणार आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार सुरू करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर हा प्रचार सुरू होणार आहे. आता निवडणुकीसाठी एकच आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून प्रचार करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.
..........


सभेचे थेट प्रक्षेपण
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा आविष्कार रत्नागिरीतही घडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजल्यापासून मोबाइलद्वारे कोठेही पाहता येणार आहे. त्याकरिता मोबाइलधारकांना  http://185.105.4.126/tgc  या लिंकवर लॉग इन करावे. ही सुविधा उपलब्ध करून देणारे ग्लोबल कनेक्ट सर्व्हिसेसचे प्रतिनिधी सचिन घोलप यांनी ही माहिती दिली.
.......................
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेला मंडप



No comments:

Post a Comment