Wednesday, 23 November 2016

रिक्षाचालकांनी कौस्तुभ सावंत यांच्याकडे मांडल्या आपल्या व्यथा




    
  रत्नागिरी : वडाप वाहतुकीचा त्रास होत असल्याने तेवढे बंद करता आले तर पहा आणि रत्नागिरीतल्या रस्त्यांची अवस्था सुधारली तर आम्हांला बराच फायदा होऊ शकेल, या रस्त्यांवर गाड्या चालवणं अगदी कठीण होऊन बसलंय अशा शब्दांत ऑटोरिक्षा चालकांनी आपली व्यथा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांच्याशी बोलताना व्यक्त केली. यावर काही तोडगा काढता आला तर पहा अशी विनंतीही त्यांनी यावेळी श्री. सावंत यांच्याकडे केली.
      जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी आज आपल्या प्रचारफेरीदरम्यान ऑटोरिक्षा चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यावेळी काही चालकांनी आपण ग्रामीण भागात राहत असल्याने आमचे प्रश्न तुमच्यासमोर कसे मांडावे, अशी शंका उपस्थित केली. मात्र कौस्तुभ सावंत यांनी त्याचे निराकरण करत आपण व्यवसाय रत्नागिरी नगर परिषद हद्दीत करत असल्याने तुमची सोय पाहणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे रिक्षाचालकांनी कौतुक केले.
      रत्नागिरी शहरात रिक्षा व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना चालकांनी प्रामुख्याने खराब रस्त्यांचा आणि वडापचा मुद्दा मांडला. शहरातले रस्ते खराब असल्याने वाहतुकीदरम्यान बरेच इंधन वापरले जाते. शिवाय खड्डयांचा त्रास जाणवतो तो भाग वेगळाच! रस्ते सुधारण्याची मागणी त्यांनी यावेळी प्रामुख्याने मांडली. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत वडापचा फटकासुद्धा आपल्या व्यवसायाला बसत असून वडाप बंद व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      शहरातील रिक्षांची संख्या ध्यानात घेता रिक्षा थांबे कमी आहेत. त्यामुळे निर्धारित रिक्षसंख्येपेक्षा अधिक रिक्षा थांब्यांवर लावल्या जातात आणि त्याचा परिणाम व्यवसायावर होतो असेही रिक्षाचालकांनी आपले म्हणणे श्री. सावंत यांच्याकडे मांडले. रिक्षसंदर्भातील शासकीय कागदपत्रे, टॅक्स वगैरे संदर्भातील पूर्ततेमध्ये सुलभता यावी असे मत रिक्षाचालकांनी यावेळी व्यक्त केले.
      यावेळी त्यांना दिलासा देताना श्री. सावंत म्हणाले की, रिक्षासंदर्भातील कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आपण नक्की लक्ष घालू. शहरातील मोक्याच्या जागा हेरून रिक्षा थांबे वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. राम आळीत होणारा ट्रॅफिक जाम लक्षात घेता तेथे रिक्षाचालक व नागरिक दोघांच्या दृष्टीने सोयीची ठरेल अशी एखादी विशेष योजना राबवण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रिक्षाचालकांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता त्यांच्यासाठी टॉयलेट बांधण्याचा आपला मानस असल्याचे सांगुन कौस्तुभ सावंत यांनी रिक्षाचालकांना दिलासा दिला.

No comments:

Post a Comment