रत्नागिरी – कोकण मीडियाच्या दिवाळी विशेषांकाच्या
प्रकाशन समारंभात बोलताना
ॲड. विलास पाटणे,
प्रमोद कोनकर, डॉ. किशोर सुखटणकर, प्रा. डॉ. रमेश कांबळे
|
- प्रकाशन
समारंभाला उपस्थित रसिक.
|
रत्नागिरी : कोकणातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाने घेतला आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध कोकणाच्या इतिहासाचा मागोवा नव्या पिढीने घ्यायला हवा, अशी अपेक्षा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी येथे व्यक्त केली. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशनाचा सोहळा मंगळवारी (२५ ऑक्टोबर २०१६) महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फेसबुकद्वारे लाइव्ह प्रसारणही करण्यात आले.
ॲड. पाटणे पुढे म्हणाले, की मराठी माणसाला नाटके आणि दिवाळी अंकांचे वेड आहे. हे वेड पुरविलेही जाते. कोकण मीडियाच्या दिवाळी अंकानेही त्यात चांगली भर टाकली आहे. अंकात कोकणातील घटना आणि व्यक्तींचा समावेश आहे, हे स्तुत्यच आहे. पण त्यानिमित्ताने आणखी अनेक बाबींचा उल्लेख करावासा वाटतो. मूळचे राजापूर येथील आचार्य भागवत यांनी विवेकानंदांना संस्कृत शिकविले होते. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयाला दीडशे वर्षे झाली आहेत. या न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे येऊन गेले. सेनापती बापट यांच्याविरुद्धचा खटला या न्यायालयात चालला. रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ जिल्हा न्यायाधीश होते. त्यानिमित्ताने रवींद्रनाथ रत्नागिरीत दहा दिवस मुक्कामाला होते. सुभाषचंद्र बोस यांचे सेनापती जगन्नाथराव भोसले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ बंदराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. अशा अनेक गोष्टी कोकणात घडल्या आहेत. नव्या पिढीने त्याचा अभ्यास करायला हवा. चुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इतिहास शिकायला हवा.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, आज आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो; पण जुन्या काळातली, मामाचं गाव अशी संकल्पना जपलेली काही घरं आजही कोकणात आहेत, याची माहिती साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकातून मिळते. हा अंक म्हणजे कोकणाबद्दलच्या सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचा एकत्रित असा दस्तऐवज आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात प्रिंट मीडियाचा वारसा चालवण्यासाठी कोनकर यांनी हे साप्ताहिक सुरू केले आहे. त्यांच्या या दिवाळी अंकात कोकणातल्या कला, शास्त्र, संस्कृती, इतिहास, व्यक्तिमत्त्वे, पूर्वीचा काळ आणि येणारा काळ अशा सगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत. आपण जेव्हा बाहेर जाऊ, तेव्हा कोकणाच्या संदर्भासाठी हा अंक जवळ असण्याची गरज आहे.
आपल्याकडचे वेगवेगळे लोक चांगले काम करत असतात. कोकणातही एक महत्त्वाची संस्था या नात्याने हे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही आमच्या संस्थेत हा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम करतो आहोत,' अशी भूमिका इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच. कांबळे यांनी मांडली. कोकणात घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना-घडामोडींची माहिती देणारे विस्तृत लेखन डॉ. कांबळे यांनी या अंकात केले आहे.
'दिवाळी अंकांना १०८ वर्षांची परंपरा आहे. 'मनोरंजन'चा पहिला दिवाळी अंक निघाला होता, त्यात सावंतवाडीची एक पानभर जाहिरात होती. त्यामुळे पहिल्या अंकापासूनच कोकणाचा सहभाग यात होता. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. तेही मूळचे कोकणातलेच. अशी ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून हे साप्ताहिक सुरू केलं आहे. आतापर्यंतचा कोकणाचा इतिहास असं सांगतो, की अनेक व्यक्ती कोकणातून बाहेर गेल्यानंतर त्यांनी नाव कमावलं. 'विको'च्या पेंढरकरांपासून आणखी अनेक क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची नावं त्यात सांगता येतील. अर्थात त्या वेळी कोकण आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य सर्वच बाबींत मागास असल्यामुळे तशी वेळ आली होती. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज रेल्वेपासून सगळी दळणवळणाची साधने कोकणात आहेत. कोकण आर्थिक मागास नाही. त्यामुळे कोकणातच काही तरी सुरू करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला आहे,' असे प्रतिपादन प्रमोद कोनकर यांनी केले.
आपल्याला मुंबई-पुण्यातल्या साहित्यावरच अवलंबून राहावे लागते. तिकडची वृत्तपत्रे, अन्य साहित्य आपल्याकडे येते. ते यावेच; पण आपल्याकडेही देण्यासारखे बरेच काही आहे, ते मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया सुरू करण्यात आले आहे,' अशी भूमिका कोनकर यांनी मांडली.
.............
साहित्य ऑडिओ रूपातही
पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या संपूर्ण कोकणाला वाहिलेले साप्ताहिक कोकण मीडिया ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी सुरू केले आहे. दीपोत्सव विशेषांकाच्या रूपाने त्याचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. कोकणात गेल्या शतकात आणि त्यापूर्वी घडलेल्या महत्त्वाच्या घटना-घडामोडी, होऊन गेलेली लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू यांचा आढावा घेणाऱ्या 'मागोवा - शतकाचा, शतकापूर्वीचा' या संकल्पनेवर हा दिवाळी अंक आधारित आहे. या अंकातील निवडक साहित्य, कोकणातील प्रादेशिक बोलींतील कविता वेबसाइटवर (kokanmedia.webs.com) उपलब्ध करून देण्याचा अनोखा प्रयोगही करण्यात आला आहे. त्यातील एक कविताही कार्यक्रमात उपस्थितांना ऐकवण्यात आली.
No comments:
Post a Comment