Thursday 4 January 2018

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांची राष्ट्रभक्ती अलौकिक – चारुदत्त आफळे

रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला थाटात प्रारंभ

रत्नागिरी : जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनिटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनो हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व विजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्यासी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला. त्यांची राष्ट्रभक्ती अलौकिक होती, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
कीर्तनसंध्या संस्थेतर्फे येथील महाजन क्रीडासंकुलात कालपासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाला कालपासून (दि. ३ जानेवारी) स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महारराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, मथुरा एक्झिक्युटिव्हचे शांताराम देव, किर्तनसंध्याचे अध्यक्ष अवधूत जोशी, सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी बुवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. महोत्सवात आफळेबुवा दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा पाचही दिवस करणार आहेत. त्यानंतर उत्तररंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडणार आहेत.
     
काल आफळेबुवांनी स्वामी विवेकानंदांचा विषय उत्तररंगासाठी घेतला होता. ते म्हणाले, स्वामींनी अमेरिकेत ११ सप्टेंबरला धर्मसभेत जे भाषण दिले त्यानंतर जगभरातील लोक त्यांच्या प्रेमात पडले. अमेरिकेत हेल्पलाईनचा नंबर ९११ त्यावरून दिला गेला. हे खोडून काढण्यासाठी याच तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेतून परत येताना बोटीमध्ये हिंदू धर्माची व ग्रंथांची निंदा करणार्‍या व्यक्तीला स्वामींनी दोन हातांत उचलले आणि माझ्या हिंदुस्थानची निंदा करणार्‍याला समुद्रात फेकून देईन, असे ताडकन सांगितले. ब्रिटनमध्येही स्वामींनी हिंदू धर्मसंस्कृती कशी श्रेष्ठ आहे, याची भाषणे दिली. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसर्‍याला वाईट म्हणण्याची गरज नाही, असे सांगणारे स्वामी होते. यामुळेच स्वामींची सार्धशती जगभरातील ५१ देशांनी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्याचा दाखला आफळेबुवांनी दिला.
बुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. हा ग्रंथ ६५० पानांचा असून तो समजण्यास खूप कठीण आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान केले. समाजात मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला आणि गीताग्रंथाला नावे ठेवणार्‍या लोकांवर त्यांनी टीका केली. मुस्लिम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात. पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. रविवार किंवा मे महिन्याची सुट्टी इंग्रजांनी सुरू केली. कारण त्यांना चर्चमध्ये जायचे असते आणि उन्हाळा ते सहनच करू शकत नाहीत. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि हिंदुस्थानचा आदर केलाच पाहिजे, असे बुवांनी ठामपणे सांगितले.
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून बुवांनी उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणार्‍या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी त्यांनी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले, परंतु आईने, तू माणसात श्री शंकर पाहिलास, असे सांगितले. मोठेपणे ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या, असे स्वामींनी गुरूंना सांगितले. त्या वेळी गुरूंनी त्यांना हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव, अशी सूचना केली. मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे, असे मार्गदर्शन केले. ही जोडी सद्गुरु-सत्शिष्याची व लोकप्रबोधन करणारी एकमेव होती.
रामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट त्यांनी घेतली. समाजहिताची काळजी करणार्‍या या दोन सुधारकांची बहुधा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला, असे आफळेबुवांनी सांगितले.
आफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्‍वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हार्‍यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली.
...........

 



Wednesday 13 December 2017

यावर्षीच्या कीर्तनसंध्येत उलगडणार १८५७ पासून १९२० पर्यंतचा इतिहास


              
 रत्नागिरी : रत्नागिरीत यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात १८५७ पासून १९२० पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा उलगडणार आहेत. येत्या ३ ते ७ जानेवारी २०१८ या काळात हा महोत्सव होणार आहे.
      रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. गेल्या सात वर्षांत संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर कीर्तने झाली. यावर्षी क्रांतीपर्वाचा दुसरा भाग म्हणजेच १८५७ ते १९२० या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला जाणार आहे. कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा करणार आहेत. उत्तररंगात १८५७ ते १९२० या कालावधीतील लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या शिक्षणाची ही पर्वणी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), राजा केळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन), उदयराज सावंत (ध्वनिव्यवस्था) यांची साथसंगत लाभणार आहे.
      चारुदत्तबुवा आफळे यांचे वडील गोविंदबुवा आफळे यांच्या शताब्दीच्या निमित्ताने एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ कीर्तनसंध्या महोत्सवात होईल. महोत्सवात जमिनीवरील बैठकव्यवस्था नेहमीप्रमाणेच मोफत असेल. खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली असून त्याकरिता संपूर्ण महोत्सवाची देणगी सन्मानिका ३०० रुपयांना उपलब्ध होईल. या सन्मानिकांसाठी अवधूत जोशी (मानस जनरल स्टोअर्स, माळ नाका, रत्नागिरी. ९०११६६२२२०, ८६६८२६३४९६), नितीन नाफड (सोहम मेडिकल, पोतदार हॉस्पिटल, शिवाजीनगर. ९५०३९४६६१७), उमेश आंबर्डेकर (धन्वंतरी आयुर्वेद, मारुती मंदिर. ९४२३२९२४३७, ९८५०८२४३७), गौरांग आगाशे (आगाशे यांचे दुकान, साळवी स्टॉप. ९७३०३१०७९९), रत्नाकर जोशी (डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ. ९०७५०५२६१३, ९४२२०५२६१३), योगेश हळबे (गुरुकृपा रेडिओ हाऊस, टिळक आळी. ९८९०८२७००६) आणि मकरंद करंदीकर (करंदीकर उपाहारगृह, शिवाजीनगर. ९४२३०४७०४७) यांच्याकडे उपलब्ध होतील. आहेत. महोत्सवाच्या ठिकाणीही दैनंदिन देणगी सन्मानिका उपलब्ध होणार आहेत.
      महोत्सवाच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून दररोज रात्री कीर्तन संपल्यानंतर मजगाव, कुवारबाव आणि नाचणे मार्गावर शहर वाहतुकीच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.


Friday 17 November 2017

कोट येथे रविवारी राणी लक्ष्मीबाई जयंती

            लांजा :  झाशीची राणी लक्ष्मीबाईची जयंती कोट (ता. लांजा) येथे येत्या रविवारी (दि. १९ नोव्हेंबर) साजरी करण्यात येणार आहे. कोटे हे राणी लक्ष्मीबाईचे सासरचे मूळ गाव आहे.
      जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाने लक्ष्मीबाईच्या जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. परिसरातील शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात येईल. निमंत्रित मान्यवर यावेळी आपले विचारही व्यक्त करतील. राज्य शासनातर्फे राणीचे स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्याबाबतच्या बैठका झाल्या आहेत. स्मारक उभारण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीविषयीची माहिती यावेळी देण्यात येईल. पुण्याच्या सौ. रोहिणी माने-परांजपे सादर करणार असलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित कीर्तनाने जयंती समारंभाचा समारोप होईल.
      कोट येथे बाळूकाका नेवाळकर यांच्या निवासस्थानी होणार असलेल्या या समारंभाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राणी लक्ष्मीबाई जयंती समिती आणि कोट येथील ग्रामस्थांनी केले आहे.
............

(संपर्क – राजू नेवाळकर, (०२३५१) २३३५०४, ९२७०९६३५७४)

Monday 21 August 2017

कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवावे

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. तसाच उत्कृष्ट दिवाळी अंक यावर्षीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
       कोकणाला स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे, किल्ले आणि वास्तू कोकणात आहेतपालघर जिल्ह्यातील ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला जव्हारमधील जुना राजवाडा, चारशे वर्षांचा वसईचा किल्ला, मुंबईतील सव्वाशे वर्षे पूर्ण करणाऱ्या महापालिका आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या इमारती, रत्नागिरीचा शतकोत्सवी थिबा राजवाडा, रत्नागिरीचा थिबा राजवाडा, चारशे वर्षांपूर्वीचा २५०० चौरस फूट विस्ताराचा तीनमजली २७ खोल्यांचा रहस्यमय मांडणीचा प्रशस्त आणि शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा मालवणातील भक्कम कुशेवाडा, नेरूरच्या चौपाटीवरचा वाडा, सावंतवाडीचा राजवाडा अशा अनेक वास्तू सांगता येतील. अशा वास्तूंचा अभ्यास आपल्याला संस्कृती आणि परंपरा उलगडवून सांगतो.
          अशाच काही वास्तूंचा ऐतिहासिक, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्रीय अशा विविध अंगांनी परिचय यावर्षीच्या दिवाळी अंकात करून दिला जाणार आहे. आपणही कोकणातील आपल्या परिसरातील किंवा आपण माहिती देऊ शकाल, अशा वास्तूची परिपूर्ण माहिती आणि छायाचित्रे पाठवावीत. याशिवाय या विषयाला समर्पक कथा, कवितांचेही स्वागत केले जाईल.

         कोकणातील बोलीभाषांमधील साहित्याला साप्ताहिक कोकण मीडियामध्ये नेहमीच आवर्जून स्थान दिले जाते. दिवाळी अंकासाठीही कथा, कविता, स्फुट लेख, विनोदी लेखासारखे मालवणी, आगरी, संगमेश्वरी, बाणकोटी अशा कोकणातील विविध बोलीभाषांमधील साहित्य अवश्य पाठवावे.
          आपला मजकूर आणि छायाचित्रे kokanmedia1@gmail.com या ई-मेलवर किंवा कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), खेडशी, रत्नागिरी-४१५६३९ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत पाठवावीत.


Sunday 6 August 2017

निराधारांना मदत करण्याची रत्नागिरीकरांना आज संधी

जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया फाउंडेशन या सामाजिक संस्थेने रविवार, ६ ऑगस्ट रोजी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने संस्थेला मदत करण्याची संधी रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे.

संविता आश्रम स्थापन करणाऱ्या संदीप परब यांची आणि त्यांच्या अनोख्या कार्याची ओळख करून देणारा विशेष लेख वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर. त्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

.. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4830959351638911950

Monday 17 July 2017

मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन

`रागार्पण`चे औचित्य :  रागसमयचक्रावर आधारित बारा तासांचा कार्यक्रम

रत्नागिरी – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी (ता. १६) रत्नागिरीत पार पडलेल्या गजानन भट स्मृती रागार्पण कार्यक्रमात सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते झाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
मुग्धनाद संगीत ॲकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी सौ. मुग्धा भट-सामंत, सौ. स्मिता सातपुते,
श्रीमती सुजाता भट, नगराध्यक्ष राहुल पंडित, श्री. सातपुते, योगेश सामंत
गजानन भट यांची कन्या आणि ज्येष्ठ गायिका सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या सहा ते ६० वयोगटातल्या ८५ शिष्यांनी रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी याच दिवशी निशिगंध ते प्राजक्त हा रागसमयचक्रावर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग पार पडला. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ अशा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांचे सादरीकरण झाले. त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर करण्यात आला. यावेळी दिवसाच्या बारा तासांच्या रागांवर आधारित सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मावशी सौ. स्मिता सातपुते, श्री. सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. बिलासखानी तोडी रागाने सौ. सामंत यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमात भैरव, शिवमत भैरव, नट भैरव, अहिर भैरव, अल्हय्या बिलावल, रामकली, कालिंगडा, बैरागी, बिभास, आसावरी, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मधमाद सारंग, गौड सारंग, सामंत सारंग, नूज सारंग, मियाँकी सारंग, भीमपलासी, काफी असे विविध राग सादर करण्यात आले. त्यातील बंदिशी विलंबित एकताल, विलंबित तिलवाडा, मध्यलय झपताल, मध्यलय मत्तताल, द्रुत एकताल, द्रुत त्रिताल या तालातील होत्या. अखेरच्या सत्रात हिंडोल गावत सब ही रागमाला सादर करण्यात आली. राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पोषाखात मुलांनी भैरवी रागात सादर केलेल्या मिले सुर मेरा तुम्हारा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके यांनी तबलासाथ,  मधुसूदन लेले,  चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले यांनी हार्मोनियम साथ केली. वैभव फणसळकर यांनी सिंथेसाइजरसाथ आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार केली.
रागार्पण कार्यक्रम सादर करणारे कलाकार.
मध्यंतरी एका तासाचे चर्चासत्र झाले. सौ. सामंत यांनी सर्व शिष्य आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. मुले आणि पालकांनी अनेक शंकांचे प्रश्न विचारून निरसन करून घेतले. एरवी मुले आणि पालकांशी निवांत गप्पा मारता येत नाहीत. त्यासाठी अशा गप्पांचे आयोजन केले होते. चर्चासत्रात रियाज कसा करायचा, ख्याल कसा मांडायचा, तालाचा अभ्यास कसा केला पाहिजे, इत्यादी मुद्द्यांची चर्चा झाली.
समारोपाच्या सत्रात सौ. सामंत यांच्या मातोश्री सुजाता भट, मावशी सौ. स्मिता सातपुते, काका श्री. सातपुते, यांचा सत्कार सौ. सामंत यांचे पती योगेश सामंत यांनी केला. लवकरच मुग्धनाद संगीत ॲकॅडमीतर्फे संगीताच्या पुस्तकांची आणि सीडीची लायब्ररी सुरू करणार असल्याची माहिती सौ. सामंत यांनी यावेळी दिली.
............

रियाज केला असता, तर राजकारणात आलोच नसतो – राहुल पंडित
मला लहानपणी गायक बनण्याची इच्छा होती. तेव्हापासून रियाज सुरू ठेवला असता, तर मी राजकारणात आलोच नसतो. संगीताच्या क्षेत्रातच मी राहिलो असतो. आता मुग्धनाद ॲकॅडमीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा संगीताशी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्यच आहे, असे उद्गार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रागार्पण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात काढले. मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. संगीताची पार्श्वभूमी असलेल्या रत्नागिरीत संगीताच्या विद्यार्थ्यांना रियाजाकरिता आणि कार्यक्रमाकरिता नगरपालिकेने वास्तू बांधून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी सौ. स्मिता सातपुते यांनी नगराध्यक्षांना केली. संगीताची आवड असलेल्या नगराध्यक्षांनी कर्तव्य म्हणून हे काम मनावर घ्यावे, असे सौ. सातपुते यांनी सांगितले. सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट यांनी सहा ओळींची कविता सादर केली.
...........
राष्ट्रध्वजाच्या रंगातील वेषात भैरवी सादर करताना विद्यार्थी. (छायाचित्रे – दिलीप केळकर)

रागार्पण नव्हे, अमृतानुभव!!!

      गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची कन्या सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या शिष्यांनी रविवारी (ता. १६ जुलै) रत्नागिरीत रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका रसिकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया.

      'शास्त्रीय संगीत हे गंभीर स्वभावाच्या आणि रागाचं ज्ञान असणाऱ्यानंच पहायचा कार्यक्रम' असं सर्वसामान्यांप्रमाणे माझंही मत होतं, पण माझी संकल्पना बदलून गेली ती सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या 'रागार्पण' या कार्यक्रमानं!!
सौ. मुग्धा भट-सामंत यांना शुभेच्छा अमित सामंत
   निमित्त होतं कै. गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहातील 'रागार्पण' कार्यक्रमाचं!! माझ्या परिचयाच्या एका सहावर्षीय बालिकेच्या ठाम आग्रहावरून खरं तर मी कार्यक्रमाला गेलो, अन्यथा मला गाण्यातल्या रागाचं फार ज्ञान नाही. गाणी ऐकायला मात्र आवडतात..
    तिथला माहोल म्हणजे निव्वळ तृप्ती!! अमृतानुभव होता. सहा ते साठ वर्षं वयाचे शिष्यगण असणाऱ्या मुग्धा भट-सामंत यांचं गाणं जरी मला एकता आलं नाही तरी त्यांच्या शिष्यानीं केलेली कमाल पाहण्याचं भाग्य मात्र लाभलं!! रागसमयचक्रावर (त्या त्या वेळी तो तो राग) आधारित कार्यक्रम, श्रोत्यांनी तुडुंब भरलेला हॉल, शेवटपर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून कार्यक्रमाचं यश लक्षात येतं.
   प्रत्येक शिष्याचा रियाजानं तयार झालेला सूर, प्रत्येक रागाची माहिती देणारं निवेदन आणि संयोजनातील शिस्त यामुळे कार्यक्रम नादमधुर बनला!! बाहेर भर जुलै महिन्यात आकाश कोरडं असताना हॉलमध्ये मात्र मधुरस्वरधारा अक्षरशः बरसत होत्या!! शेवटी ६-७ वर्षांच्या चिमुकल्यानी म्हटलेलं भैरवीतलं मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत तर कार्यक्रमाला चार चाँद लावून गेलं!!
  अप्रतिम वाद्यवृंद, वक्त्यांच्या बोलण्यातून समजलेला मुग्धाताईंचा प्रवास, त्यांचे परिश्रम, शिस्त आणि त्यांना मिळालेली त्यांचे पती योगेश सामंत यांची साथ हे सर्वच प्रेरणादायी आहे. (मुग्धताईंचे पती आपली डबल ड्युटी करून कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सहापासून ते कार्यक्रम सायंकाळी संपेपर्यंत अविश्रांत मेहनत घेत होते, ही माहितीही एका वक्त्यानं सांगितली.)
एकूणच गायनातलं समर्पण, गुरू-शिष्य परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयोग, पित्याविषयी कृतज्ञता आणि कुटुंबीयांची समर्थ साथ या सगळ्या पायावर उभा राहिलेला आणि शिष्यांच्या सुरेल गायनानं आणि श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादानं कळस गाठणारा 'रागार्पण' हा केवळ एक सांगीतिक कार्यक्रम न राहता अमृतानुभव बनला!!
-    अमित सामंत, रत्नागिरी

.............


सौ. मुग्धा भट-सामंत यांना आणखी एका रसिकाने कवितेतून दिलेली दाद

तू साक्षात गुरू...

स्वरांसारखी किती माणसं,
जवळ केली मुग्धा!
स्वर्गामधून कौतुक करत
असतील देवसुद्धा!

धाग्यामधे फुलं तशी,
माणसं ओवतेस स्वरात!
गंधर्वांचा वावर असेल,
नक्की तुझ्या घरात!

छप्पर सगळा पाऊस देतं,
ओंजळ भरून मातीत!
तुझं तेज उजळू लागतं,
शिष्यांच्याही वातीत!

हातचं राखल्याशिवाय जे
देणं ठेवतात सुरू!
त्यांना कसं माणूस म्हणू,
तूच साक्षात गुरू!

                     प्रमोद जोशी, देवगड