Monday, 17 July 2017

मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन

`रागार्पण`चे औचित्य :  रागसमयचक्रावर आधारित बारा तासांचा कार्यक्रम

रत्नागिरी – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी (ता. १६) रत्नागिरीत पार पडलेल्या गजानन भट स्मृती रागार्पण कार्यक्रमात सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते झाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
मुग्धनाद संगीत ॲकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी सौ. मुग्धा भट-सामंत, सौ. स्मिता सातपुते,
श्रीमती सुजाता भट, नगराध्यक्ष राहुल पंडित, श्री. सातपुते, योगेश सामंत
गजानन भट यांची कन्या आणि ज्येष्ठ गायिका सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या सहा ते ६० वयोगटातल्या ८५ शिष्यांनी रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी याच दिवशी निशिगंध ते प्राजक्त हा रागसमयचक्रावर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग पार पडला. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ अशा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांचे सादरीकरण झाले. त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर करण्यात आला. यावेळी दिवसाच्या बारा तासांच्या रागांवर आधारित सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मावशी सौ. स्मिता सातपुते, श्री. सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. बिलासखानी तोडी रागाने सौ. सामंत यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमात भैरव, शिवमत भैरव, नट भैरव, अहिर भैरव, अल्हय्या बिलावल, रामकली, कालिंगडा, बैरागी, बिभास, आसावरी, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मधमाद सारंग, गौड सारंग, सामंत सारंग, नूज सारंग, मियाँकी सारंग, भीमपलासी, काफी असे विविध राग सादर करण्यात आले. त्यातील बंदिशी विलंबित एकताल, विलंबित तिलवाडा, मध्यलय झपताल, मध्यलय मत्तताल, द्रुत एकताल, द्रुत त्रिताल या तालातील होत्या. अखेरच्या सत्रात हिंडोल गावत सब ही रागमाला सादर करण्यात आली. राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पोषाखात मुलांनी भैरवी रागात सादर केलेल्या मिले सुर मेरा तुम्हारा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके यांनी तबलासाथ,  मधुसूदन लेले,  चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले यांनी हार्मोनियम साथ केली. वैभव फणसळकर यांनी सिंथेसाइजरसाथ आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार केली.
रागार्पण कार्यक्रम सादर करणारे कलाकार.
मध्यंतरी एका तासाचे चर्चासत्र झाले. सौ. सामंत यांनी सर्व शिष्य आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. मुले आणि पालकांनी अनेक शंकांचे प्रश्न विचारून निरसन करून घेतले. एरवी मुले आणि पालकांशी निवांत गप्पा मारता येत नाहीत. त्यासाठी अशा गप्पांचे आयोजन केले होते. चर्चासत्रात रियाज कसा करायचा, ख्याल कसा मांडायचा, तालाचा अभ्यास कसा केला पाहिजे, इत्यादी मुद्द्यांची चर्चा झाली.
समारोपाच्या सत्रात सौ. सामंत यांच्या मातोश्री सुजाता भट, मावशी सौ. स्मिता सातपुते, काका श्री. सातपुते, यांचा सत्कार सौ. सामंत यांचे पती योगेश सामंत यांनी केला. लवकरच मुग्धनाद संगीत ॲकॅडमीतर्फे संगीताच्या पुस्तकांची आणि सीडीची लायब्ररी सुरू करणार असल्याची माहिती सौ. सामंत यांनी यावेळी दिली.
............

रियाज केला असता, तर राजकारणात आलोच नसतो – राहुल पंडित
मला लहानपणी गायक बनण्याची इच्छा होती. तेव्हापासून रियाज सुरू ठेवला असता, तर मी राजकारणात आलोच नसतो. संगीताच्या क्षेत्रातच मी राहिलो असतो. आता मुग्धनाद ॲकॅडमीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा संगीताशी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्यच आहे, असे उद्गार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रागार्पण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात काढले. मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. संगीताची पार्श्वभूमी असलेल्या रत्नागिरीत संगीताच्या विद्यार्थ्यांना रियाजाकरिता आणि कार्यक्रमाकरिता नगरपालिकेने वास्तू बांधून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी सौ. स्मिता सातपुते यांनी नगराध्यक्षांना केली. संगीताची आवड असलेल्या नगराध्यक्षांनी कर्तव्य म्हणून हे काम मनावर घ्यावे, असे सौ. सातपुते यांनी सांगितले. सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट यांनी सहा ओळींची कविता सादर केली.
...........
राष्ट्रध्वजाच्या रंगातील वेषात भैरवी सादर करताना विद्यार्थी. (छायाचित्रे – दिलीप केळकर)

No comments:

Post a Comment