Thursday, 13 July 2017

रत्नागिरीत रविवारी गजानन भट स्मृती शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - रागार्पण


                रत्नागिरी - गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ येत्या रविवारी (ता. १६) रत्नागिरीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुग्धा भट-सामंत आणि त्यांचा शिष्यवर्ग रागार्पण हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालणारा रागसमयचक्र कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे.
                आईवडील हे सर्वांचेच पहिले गुरू असतात. त्यांच्यामुळेच त्यांची मुले यश संपादन करू
शकतात. सौ. मुग्धा भट-सामंत यांचीही तशीच धारणा असून त्यांचे वडील कै. गजानन भट यांच्या स्मृतीला अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वळावा, यासाठी हा कार्यक्रम करण्यात  आला आहे. गेल्या वर्षी १६ जुलै रोजी रागसमयचक्रावर आधारित अशा या कार्यक्रमाचा पहिला भाग अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला. गेल्या वर्षी निशिगंध ते प्राजक्त हा संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. रागसमयचक्रावर आधारित त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. रत्नागिरीत शास्त्रीय संगीताची साधना करणारे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांचे ८५ शिष्य गायन सादर करतील. संपूर्ण कार्यक्रमाला दहा साथीदार साथसंगत करतील. त्यामधे रत्नागिरीतील राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके तबलासाथ, तर मधुसूदन लेलेचैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले हार्मोनियम साथ करतील. सिंथेसाइजरसाथ वैभव फणसळकर आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार करणार आहेत.

                सकाळी ६ ते संध्याकाळी ६ असा दिवसभराच्या १२ तासांचा हा रागार्पण कार्यक्रम येत्या रविवारी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे.

No comments:

Post a Comment