Saturday 19 November 2016

पालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री रविवारी रत्नागिरीत      रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि. २० नोव्हेंबर) रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार असलेल्या त्यांच्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असल्याने त्यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रचाराला येत आहेत. जिल्ह्यात चार पालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
      जिल्ह्यात सर्व पालिका निवडणुकीमध्ये भाजपने रणनीती आखली आहे. काही ठिकाणी अनुभवी उमेदवार असून नवोदित आणि सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवारांनाही संधी दिली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या सभेमध्ये या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाच्या योजना अधिक सक्षमतेने रत्नागिरी जिल्ह्यातही राबवण्याचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने पालिकांवर सत्ता मिळवणे महत्त्वाचे असून याकरिता सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्याला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केली.
      दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांच्या जोरदार प्रचारफेर्‍या सुरू आहेत. आता प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार करण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवार, नेत्यांच्या मुलाखती व मतदानासाठी आवाहन गाड्यांमधील एलईडी स्क्रीनवर दाखविले जात आहे. शहरासाठी केल्या जाणार्‍या नव्या योजनांची माहितीही यात दिली जात आहे. रत्नागिरी शहराच्या विकासात भाजपने यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासासाठी नव्या योजना घोषित केल्या आहेत. नळपाणी योजना, रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादींचा फायदा रत्नागिरीकरांना मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने व विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. तसेच कोकणचे खास व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कल्पकतेमुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सुरू झाले आहे. कोकण विकासासाठी भाजप सरकारच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे यातून सिद्ध होत आहे. त्याचा भाजपला नक्कीच उपयोग होईल व भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर व सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केला.
      रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचून माहिती सांगणे, विकासयोजना पोहोचवणे, जाहीरनामा सांगणे असा प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सभा हायटेक प्रचारातून प्रचाराला खरी धार येणार आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार सुरू करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर हा प्रचार सुरू होणार आहे. आता निवडणुकीसाठी एकच आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून प्रचार करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.
..........


सभेचे थेट प्रक्षेपण
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा आविष्कार रत्नागिरीतही घडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजल्यापासून मोबाइलद्वारे कोठेही पाहता येणार आहे. त्याकरिता मोबाइलधारकांना  http://185.105.4.126/tgc  या लिंकवर लॉग इन करावे. ही सुविधा उपलब्ध करून देणारे ग्लोबल कनेक्ट सर्व्हिसेसचे प्रतिनिधी सचिन घोलप यांनी ही माहिती दिली.
.......................
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेला मंडपTuesday 25 October 2016

कोकणाच्या इतिहासाचा मागोवा नव्या पिढीने घ्यावा - ॲड. विलास पाटणे


रत्नागिरी – कोकण मीडियाच्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना
ॲड. विलास पाटणे, प्रमोद कोनकर, डॉ. किशोर सुखटणकर, प्रा. डॉ. रमेश कांबळे

-    प्रकाशन समारंभाला उपस्थित रसिक.
कोकण मीडियाच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

रत्नागिरी : कोकणातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाने घेतला आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध कोकणाच्या इतिहासाचा मागोवा नव्या पिढीने घ्यायला हवा, अशी अपेक्षा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी येथे व्यक्त केली. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशनाचा सोहळा मंगळवारी (२५ ऑक्टोबर २०१६) महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर, महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फेसबुकद्वारे लाइव्ह प्रसारणही करण्यात आले.

ॲड. पाटणे पुढे म्हणाले, की मराठी माणसाला नाटके आणि दिवाळी अंकांचे वेड आहे. हे वेड पुरविलेही जाते. कोकण मीडियाच्या दिवाळी अंकानेही त्यात चांगली भर टाकली आहे. अंकात कोकणातील घटना आणि व्यक्तींचा समावेश आहे, हे स्तुत्यच आहे. पण त्यानिमित्ताने आणखी अनेक बाबींचा उल्लेख करावासा वाटतो. मूळचे राजापूर येथील आचार्य भागवत यांनी विवेकानंदांना संस्कृत शिकविले होते. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयाला दीडशे वर्षे झाली  आहेत. या न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे येऊन गेले. सेनापती बापट यांच्याविरुद्धचा खटला या न्यायालयात चालला. रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ जिल्हा न्यायाधीश होते. त्यानिमित्ताने रवींद्रनाथ रत्नागिरीत दहा दिवस मुक्कामाला होते. सुभाषचंद्र बोस यांचे सेनापती जगन्नाथराव भोसले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ बंदराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. अशा अनेक गोष्टी कोकणात घडल्या आहेत. नव्या पिढीने त्याचा अभ्यास करायला हवा. चुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इतिहास शिकायला हवा.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, आज आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो; पण जुन्या काळातली, मामाचं गाव अशी संकल्पना जपलेली काही घरं आजही कोकणात आहेत, याची माहिती साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकातून मिळते. हा अंक म्हणजे कोकणाबद्दलच्या सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचा एकत्रित असा दस्तऐवज आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात प्रिंट मीडियाचा वारसा चालवण्यासाठी कोनकर यांनी हे साप्ताहिक सुरू केले आहे. त्यांच्या या दिवाळी अंकात कोकणातल्या कला, शास्त्र, संस्कृती, इतिहास, व्यक्तिमत्त्वे, पूर्वीचा काळ आणि येणारा काळ अशा सगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत. आपण जेव्हा बाहेर जाऊ, तेव्हा कोकणाच्या संदर्भासाठी हा अंक जवळ असण्याची गरज आहे.

आपल्याकडचे वेगवेगळे लोक चांगले काम करत असतात. कोकणातही एक महत्त्वाची संस्था या नात्याने हे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही आमच्या संस्थेत हा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम करतो आहोत,' अशी भूमिका इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच. कांबळे यांनी मांडली. कोकणात घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना-घडामोडींची माहिती देणारे विस्तृत लेखन डॉ. कांबळे यांनी या अंकात केले आहे.

'दिवाळी अंकांना १०८ वर्षांची परंपरा आहे. 'मनोरंजन'चा पहिला दिवाळी अंक निघाला होता, त्यात सावंतवाडीची एक पानभर जाहिरात होती. त्यामुळे पहिल्या अंकापासूनच कोकणाचा सहभाग यात होता. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. तेही मूळचे कोकणातलेच. अशी ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून हे साप्ताहिक सुरू केलं आहे. आतापर्यंतचा कोकणाचा इतिहास असं सांगतो, की अनेक व्यक्ती कोकणातून बाहेर गेल्यानंतर त्यांनी नाव कमावलं. 'विको'च्या पेंढरकरांपासून आणखी अनेक क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची नावं त्यात सांगता येतील. अर्थात त्या वेळी कोकण आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य सर्वच बाबींत मागास असल्यामुळे तशी वेळ आली होती. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज रेल्वेपासून सगळी दळणवळणाची साधने कोकणात आहेत. कोकण आर्थिक मागास नाही. त्यामुळे कोकणातच काही तरी सुरू करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला आहे,' असे प्रतिपादन प्रमोद कोनकर यांनी केले.

आपल्याला मुंबई-पुण्यातल्या साहित्यावरच अवलंबून राहावे लागते. तिकडची वृत्तपत्रे, अन्य साहित्य आपल्याकडे येते. ते यावेच; पण आपल्याकडेही देण्यासारखे बरेच काही आहे, ते मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे या उद्देशाने साप्ताहिक कोकण मीडिया सुरू करण्यात आले आहे,' अशी भूमिका कोनकर यांनी मांडली.
.............
साहित्य ऑडिओ रूपातही

पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या संपूर्ण कोकणाला वाहिलेले साप्ताहिक कोकण मीडिया ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी सुरू केले आहे. दीपोत्सव विशेषांकाच्या रूपाने त्याचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. कोकणात गेल्या शतकात आणि त्यापूर्वी घडलेल्या महत्त्वाच्या घटना-घडामोडी, होऊन गेलेली लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू यांचा आढावा घेणाऱ्या 'मागोवा - शतकाचा, शतकापूर्वीचा' या संकल्पनेवर हा दिवाळी अंक आधारित आहे. या अंकातील निवडक साहित्य, कोकणातील प्रादेशिक बोलींतील कविता वेबसाइटवर (kokanmedia.webs.com) उपलब्ध करून  देण्याचा अनोखा प्रयोगही करण्यात आला आहे. त्यातील एक कविताही कार्यक्रमात उपस्थितांना ऐकवण्यात आली.
          
            
               Thursday 29 September 2016

दिवाळीच्या मुहूर्तावर 'कोकण मीडिया'चे साप्ताहिक

सप्रेम नमस्कार.

आजवर ब्लॉग, फेसबुक आणि ट्विटवरून संपर्कात असलेल्या ‘कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस’तर्फे आता साप्ताहिक प्रसिद्ध केले जाणार आहे. पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणातले विविध विषय हाताळण्याच्या मुख्य उद्देशाने हे साप्ताहिक प्रसिद्ध होणार आहे. या साप्ताहिकाचा पहिलाच अंक येत्या दीपोत्सवाच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाची चर्चा नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून होत असते. आंबा-काजूसारखी परदेशवारी करणारी पिके, विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गसुंदर डोंगरदऱ्या आणि असेच वेगळेपण जपणाऱ्या कोकणात दीर्घ काळ टिकलेला, पण काळ बनून आलेला सावित्री नदीवरचा कोसळलेला पूल मोठ्या चर्चेचा विषय झाला. शंभर वर्षांहून अधिक काळ लोटलेला तो आणि तसेच इतर अनेक पूल, ऐतिहासिक ठिकाणे, वास्तू, वाचनालये, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि लोकोत्तर व्यक्ती कोकणात आहेत. त्यांच्या आठवणी जागविल्या जाव्यात आणि नव्या संदर्भात त्यांचे वेगळेपण पुन्हा चर्चेला यावे, या उद्देशाने ‘मागोवा : शतकाचा, शतकापूर्वीचा!’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला जाणार आहे.

या अंकाकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. माहितीसोबत छायाचित्रेही अपेक्षित आहेत. याशिवाय कथा, कविताही स्वीकारल्या जातील. मजकूर पाठवण्यासाठी दहा ऑक्टोबरची मुदत आहे. अंकाच्या वार्षिक वर्गणीसाठी नोंदणी सुरू असून, जाहिरातदारांचेही स्वागत आहे.

संपर्क : ९८२२२५५६२१, ९४२२३८२६२१

ब्लॉग : http://kokanmedia.blogspot.in

ई-मेल : kokanmedia@gmail.com

वेबसाइट : http://kokanmedia.webs.com

फेसबुक : https://facebook.com/kokanmedia

वार्षिक वर्गणीच्या नोंदणीसाठी फॉर्मची लिंक : https://goo.gl/forms/M1MdkiYbUNPrgFjT2

                                                                                                                       
                                                                                                                         आपला, 
                                                                                                                         प्रमोद कोनकर

Thursday 22 September 2016

गौरव की दिशाभूल?

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिल्या क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा ठरला आहे. केंद्र सरकारच्या क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया या केंद्रीय समितीच्या अहवालानुसार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांनी ही घोषणा केली. देशातील सर्वाधिक स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळणे अभिमानास्पद आहे. मात्र जिल्ह्याचा ग्रामीण भाग खरोखरीच स्वच्छ आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल तर होत नाही ना, असे वाटते.

...........

Friday 2 September 2016

प्र. ल. मयेकरांवरील लघुपटाची रत्नागिरीत निर्मितीरत्नागिरी : प्रख्यात नाटककार, लेखक प्र. ल. मयेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने त्यांच्यावरील लघुपट तयार केला आहे. दुर्गेश आखाडे यांची संकल्पना आणि पटकथा असलेल्या या लघुपटाची निर्मिती श्रीकांत पाटील यांनी केली असून रत्नागिरीतील ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. रत्नागिरीत आज (दि. २ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील आडिवरे-कोंभेवाडी हे प्रभाकर लक्ष्मण मयेकर ऊर्फ प्र. ल. मयेकर यांचे मूळचे गाव. वडिलांच्या बेस्टमधील नोकरीमुळे ते मुंबईत गेले. कालांतराने त्यांनाही बेस्टमध्ये नोकरी मिळाली. ती सांभाळतच त्यांनी विपुल नाट्यलेखन केले. निवृत्तीनंतर सुमारे दहा वर्षे ते रत्नागिरीत राहिले होते. त्या काळात त्यांचा रत्नागिरीतील अनेकांशी स्नेह प्रस्थापित झाला. त्यापैकी पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी मयेकरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी लघुपटाची संकल्पना मांडली. समर्थ रंगभूमीने ती उचलून धरली आणि ४७ मिनिटांचा हा लघुपट निर्माण झाला. त्यामध्ये प्रलंची व्यावसायिक नाटके, राज्य नाट्य स्पर्धेतील नाटके, एकांकिका, दूरचित्रवाणी मालिका, कथा, चित्रपट आणि लघुपट इत्यादींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्या मुलाखती आणि भाषणांमधील काही क्षण, रत्नगिरीतील कार्यक्रमातील दृश्ये, आडिवरे येथील त्यांचे घर, मयेकरांना राज्य नाट्य स्पर्धेत पहिले यश मिळवून देणाऱ्या मा अस साबरिनचे दुर्मिळ छायचित्र, बेस्ट कला क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्रयोगांची छायचित्रे, नाटक आणि चित्रपटांतील काही दृश्ये इत्यादींचाही समावेश आहे. लघुपटाचे संकलन धीरज पार्सेकर यांनी केले असून ध्वनिमुद्रण रत्नागिरीतील उदयराज सावंत यांनी, तर पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांनी केले आहे. सजावट विवेक वाडिये यांचे असून अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि मयूरा जोशी यांनी निवेदन केले आहे. श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी दिग्दर्शन केले असून देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांनी निर्मितीसाठी साह्य केले आहे. लघुपटामध्ये अभिनेता अरुण नलावडे, संजय मोने, चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, शीतल शुक्ल, माधवी जुवेकर, निर्माता कुमार सोहनी, प्रसाद कांबळी, नाट्यलेखक गंगाराम गवाणकर, पटकथाकार कांचन नायक, चंद्रलेखा संस्थेच्या पद्मश्री मोहन वाघ, डॉ. रवी बापट, विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे, ध्वनिसंयोजक अविनाश बोरकर, नेपथ्यकार प्रकाश मयेकर तसेच श्रीकांत पाटील यांनीही मयेकरांसोबतचे अनुभव कथन केले आहेत.
      लघुपटाच्या छायाचित्रणासाठी अत्याधुनिक 5 डी कॅमेरा वापरण्यात आला असून अजय बाष्टे यांनी उत्तम चित्रीकरण केले आहे.
......................
लघुपटनिर्मितीची समर्थ रंगभूमीची भूमिका
प्र. ल. मयेकर आणि समर्थ रंगभूमीचे अतिशय जवळच नाते होते. मयेकरांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी २००७ मध्ये समर्थ रंगभूमीसाठी कुंतीप र्थिवा हे नाटक लिहिले होते. त्याचबरोबर प्र. लं.च्या पाच एकांकिकांच्या पुस्तकाचे प्रकाशनही समर्थ रंगभूमीने २००७ मध्ये केले होते.
      प्र. ल. मयेकर यांचे १८ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यानंतर प्र. लं.चे जवळचे मित्र पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी प्र. लं.वर लघुपट करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी घेतलेल्या प्र. लं.च्या मुलाखती आणि विविध कार्यक्रमांची दृश्ये आखाडे यांनी संग्रहित केली होती. त्याचा उपयोग करून घेऊन लघुपट करण्याचा निर्णय झाला. समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील आणि आखाडे यांनी प्र. लं.च्या लघुपटावर काम करण्यास सप्टेंबर २०१५ मध्ये सुरुवात केली. लघुपटाची संकल्पना आणि उपलब्ध असलेले प्र. लं.चे व्हिडिओ घेऊन अभिनेता अविनाश नारकर यांची दुर्गेश आखाडे यांनी मुंबईत जाऊन भेट घेतली. नारकर यांना लघुपटाची संकल्पना आवडली. लघुपटाची कथा आणि पटकथा आखाडे यांनी लिहिली.
त्यानंतर प्र. लं.सोबत काम केलेल्या कलाकारांचे संपर्क क्रमांक मिळवण्यास सुरुवात केली. प्र. लं. ची मुलगी विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे आणि मयेकरांचे स्नेही अविनाश बोरकर यांचे या कामात मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर मयेकरांच्या लघुपटाची कथा तयार करण्यात आली. छायचित्रणाची जबाबदारी रत्नगिरीतील नामवंत छायचित्रकार अजय बाष्टे यांनी उचलली. 5 डीसारखा अत्याधुनिक कॅमेरा त्यांनी या लघुपटासाठी वापरला. लघुपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले आहे. डिसेंबरमध्ये कलाकारांच्या डेटस घेऊन दोन दिवस मुंबईत चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर जानेवारीत प्र. लं.चे मूळ गाव राजापूर तालुक्यातील आडिवरे कोंभेवाडीतील त्यांचे जन्मघर आणि शाळेचे चित्रीकरण करण्यात आले. लघुपटाचे निवेदन दिग्गज अभिनेता अविनाश नारकर आणि मूळची रत्नागिरीची आणि प्र. लं.च्या पाठिंब्याने मुंबईत जाऊन व्यावसयिक रंगभूमीवर आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री मयूरा जोशी हिनेही केले आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये लघुपटाचे निवेदन चित्रीत करण्यात आले. मे महिन्यात रत्नगिरीतील उदयराज सावंत यांच्या एस. कुमार स्टुडिओमध्ये व्हॉइस ओव्हर ध्वनिमुद्रित करण्यात आला. नामवंत निवेदक आणि अभिनेते प्रमोद पवार यांचा खणखणीत आवाज या लघुपटाला मिळाला आहे.  व्हॉइस ओव्हरसाठी प्रमोद पवार खास रत्नागिरीत आले होते.
      लघुपटाचा सर्वांत महत्त्वाचा भाग होता तो संकलनाचा. आज फायनल कट प्रो हे सॉफ्टवेअर मालिका आणि चित्रपटांसाठी वापरतात. प्र. ल. लघुपटाची उंची वाढण्यासाठी त्या सॉफ्टवेअरमध्ये संकलन करण्याचा निर्णय घेतला. हे सॉफ्टवेअर रत्नागिरीत उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये संकलन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. लघुपटाचे संकलन मुंबईत धीरज पार्सेकर यांनी उत्तमरीत्या करून लघुपटाचा दर्जा उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. नाट्यलेखक राजेश मयेकर आणि मनीष कदम यांचे संकलनासाठी मोलाचे योगदान लाभले. लघुपटाचे शीर्षक आणि डीव्हीडी कव्हरची सजावट विवेक वाडिये यांनी अतिशय अप्रतिम केली आहे. लघुपटासाठी देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांचे निर्मिती साह्य लाभले. या सर्वांच्या मेहनतीमधून ४७ मिनिटांचा प्र. ल. हा लघुपट जन्माला आला. रत्नागिरीतील कलाकारांनी व्यावसयिक कलाकारांबरोबर काम करत लघुपट तयार करण्याचा हा यशस्वी प्रयत्न समर्थ रंगभूमीने केला आहे. या लघुपटाच्या निमित्ताने प्र. ल. मयेकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न नाटकाकाराचा इतिहास जगासमोर आला आहे. नव्या पिढीला प्र. लं.ची माहिती होणार आहे.

 ..............
संपर्कासाठी –
श्रीकांत पाटील - ९४२३०४९७०५
दुर्गेश आखाडे - ९४२२६३६९५०
अजय बाष्टे - ९९७५५५१६५५

Thursday 1 September 2016

पडद्यामागच्या कलाकारांना व्यासपीठ

प्रभावी गायनाने गायक रसिकप्रिय होतात. त्यामागे गायकाबरोबरच गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या असंख्य कलाकारांची मेहनत असते.  काही अपवाद वगळता असे कलाकार पडद्यामागेच राहतात. त्यांच्या कलेला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्यांनाही पुरेसा वाव मिळत नाही. अशा कलाकारांचा परिचय करून देणारे अभिनव संकेतस्थळ रत्नागिरीच्या विधाता म्युझिक संस्थेने सुरू केले आहे. पडद्यामागच्या कलाकारांसाठी ते हक्काचे व्यासपीठ आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या मते एक चळवळ ठरणार आहे.

..............

......................